Friday, May 22, 2009

घराला घरपण देणारी माणसं

माझं डोकं खाऊ नकाऽऽऽ!!!
सहधर्मचारिणीचे निर्वाणीचे बोल कानावर पडले आणि बंडू शांत बसला.

बंड्‌याला मागच्या आठवड्‌यात झालेला भयंकर प्रसंग आठवला.

त्याची बायको त्याच्यावर ओरडली होती, " तुझ्या डोक्यात शेण भरलंय शेण!"

बंड्‌याची विनोदबुद्धी नको त्या प्रसंगी जागी झाली. तो बायकोला म्हणाला,"आता मला कळलं, तू माझं डोकं का खात असतेस ते!"..

आणि बंडोबाचे पुढील चार-पाच दिवस हाल झाले हे वेगळे सांगायला नको.


परस्परांचे डोके खाण्यासाठी लग्न करतात हे शाश्वत सत्य आहे.

"नातिचरामि" (अतिरेक करणार नाही) हे वचनसुद्धा बिचारा नवराच लग्नात स्त्रीला देत असतो. अशी प्रतिज्ञा स्त्रियांना घेण्याची कल्पना त्या काळी कुणाला सुचली नाही हे आश्चर्यच आहे.

सॉक्रेटिस एकदा म्हणाला होता. "लग्न जरूर करा. कारण जर पत्नी समजदार मिळाली तर तुम्ही चांगले नागरिक बनाल आणि जर भांडणारी मिळाली तर तुम्ही चांगले तत्वचिंतक बनाल".
तर निष्कर्ष काय? तर तत्वज्ञानाचा प्रांत सुसमॄद्ध करणाचे थोर्थोर कार्य नवरा-बायकोच्या भांडणाने आजवर केले आहे.

असं म्हणतात की नवरा बायकोच्या भांडणात ब्रम्हदेवसुद्धा पडत नाही.
बुद्धीचं देणं माणसानं नीट वापरलं नाही की बोंबाबोंब झालीच संसाराची.

शिकल्या सवरल्या लोकांपेक्षा अडाणी लोकांचे संसार नेटके होतात त्याला कारण बुद्धीचा फाजील अहंकार नसतो तिथे. बुद्धी हे तो देणे ईश्वराचे. पण परस्परांच्या बुद्धीचे अन्‌ कर्तॄत्वाचे कौतुक न वाटता अभिमान आड आला की मग सारेच मुसळ केरात !

माउलींची ओवी आठवली.
नवल अहंकाराचिये गोठी । न लगे अज्ञानाचिया पाठी ।
सज्ञानाच्या झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ॥
अहंकाराच्या गोष्टीचे नवल कसे विलक्षण ! अज्ञानी, आडाणी माणसाला नसतोच मुळी अहंकार.. पण सज्ञान माणसाच्या कंठात नेकटाय सारखा लोंबतो आणि अनेक संकटांना आमंत्रण देतो.

बंड्‌याच्या बायकोचे उद्या स्त्रीमुक्ती चळवळींसमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान आहे.
त्याला जावं की नाही हा प्रश्न पडलाय? बघू या !!!
आधी जेवतो पोटभर मग त्यावर विचार करेन म्हणतो.
सी या. बायऽऽऽ !!

Wednesday, May 20, 2009

भजन करावे गाढवाचे .. पाय धरावे बायकाचे ...

अहोऽऽऽऽ, ऐकलं काऽऽ ?
ऐकलं काऽऽ ?ऐकलं काऽऽ ?ऐकलं काऽऽ ?
( कोरा कागज था ये मन मेरा हे गाणं आठवा अन्‌ मग त्यातील तेरा तेरा तेरा प्रमाणेच इथलं ऐकलं का? ऐकलं का? ऐकलं का? गॄहित धरा.)

कुटुंबाच्या हातात वर्तमानपत्र..
मी चाट पडलो.
आश्चर्यातिरेकाने मला काहीच सुचेनासे झाले.

हातात लोकमत चे हेडलाईन कुटुंबाने सस्मित चेह-याने दाखविले.

बायकोचे ऐका अन्यथा पस्तावाल ..
"बीवी जो बोलती है वो सुनो" हा दस्तुरखुद्द सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असल्याची हेडलाईन पेपरात दाखवताना कुटुंबाच्या चेह-यावर आनंदाचा वसंत फुलला होता.

शहाण्या माणसाने बायकोचे ऐकावे, हा संदेश आजवर प्रत्येक धर्मग्रंथाने दिला आहे.

कांचनमॄगाची शिकार करण्यासाठी स्वये प्रभू रामचंद्र गेले होते तिथं आपण किस झाड की पत्ती?? असो.

पत्नीच्या उपहासाला उत्तर द्यावे म्हणून महाकवी कालिदास घर सोडून बाहेर पडला. जर तो बाहेर पडला नसता तर कुमारसंभव संभवले असते का?

तात्पर्य बायकोने जे सांगितले ते निमूट ऐकावे..

बायकोचे ऐकून माणूस अनेक भानगडींमध्ये अडकतो पण न ऐकण्यामुळे नित्य डोकेदुखीचा त्रास जडू शकतो.
त्यामुळे, दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाने ऐकायला काय बिघडते.

नाथांचे एक भारूड आहे,,
भजन करावे गाढवाचे .. पाय धरावे बायकाचे ..

बहुजन समाज चेतवण्यासाठी नाथांनी सर्वसामान्य माणसाच्या भाषेत जीवनमुल्यांची मांडणी केली.
त्याला भारुडांचं रुप दिलं.
भारुडं ऐकताना त्यातील विचित्र शब्दरचनेकडे लक्ष वेधून घेतात नाथ आणि मग निरुपण..

"गाढ वाचे(ने) भजन करा, आणि बा "येकाचे" पाय धरा".

प्रपंच हे तो भोलेनाथाचं ब्रीद..
जरी त्याचं बहिरंग प्रपंचाचं असलं तरी अंतरंग परमार्थरुप होवू शकतं..

बाय दि वे तुम्ही,महादेवाची आरती ऐकली आहे का??
होय होय, महादेवाची आरती??

त्या ओळी आठ्वा.. "ऐसा शंकर शोभे, उमा वेल्हाळा..."..

आदिनाथ शंकर सुद्धा बायकोचे वेल्हाळ वेल्हाळ आहेत.
मग आपण किस झाड की पत्ती..
बायकोच्या सोबत जगलेल्या ,सत्व रज तमाच्या संसाराचं बिल्वदल अर्पण करावं त्याचे चरणी आणि शाश्वताचा शोध घ्यावा.. नाही का?

जय भोलेनाथऽऽ चलो सी या. हॅप्पी बायको, हॅप्पी प्रपंच"....

Saturday, May 2, 2009

मोनोलॉग आणि जादूचा दिवा

एकदा असं झालं...
अतिप्राच्यवस्तू खरेदी विक्री केंद्रात (अज्ञ जीव त्याला भंगाराच्या दुकानात,असा शब्द देखील वापरतात) काही कलात्मक पहावयास मिळते का हे पहावे म्हणून मी गेलो.
तिथं एक सुंदर दिवा पाहिला.
घरात येणारे पाहुणे माझ्या कलात्मक दॄष्टीकोनाचे कौतुक करतात.
पण मी मॉडेस्टी सोडत नाही. मी कुटुंबाकडे बोट दाखवतो..म्हणतो हे सर्व श्रेय़ आमच्या अर्धांगाचे!!! असो..

कुटुंबाच्या मुखातून कौतुकाचे आणि दुर्मिळ असे चार शब्द कानावर पडावे हा एक उदात्त हेतु.
संसार म्हणजे कसा डाय़लॉग हवा, मोनोलॉग नसावा... असा आमच्या मनाचा प्रांजळ मोनोलॉग आहे. पण असो...

तो दिवा मी घरी आणला.
घरी आल्या आल्या मी तो स्वच्छ करावयास घेतला.
कुटुंबाच्या एका "प्रेमळ दॄष्टीसाठी" आम्ही तो दिवा स्वच्छ करावयास घेतला.

कदाचित्‌ आपत्‌कालेषुsssss आमच्या भांडी घासणा-या काकू आल्या नाहीत की त्यांची उणीव मी आमच्या संसाराला कधीच भासू देत नाही.
"वर्षाव पडो" भांड्‌याचा, एक क्षण पुरे प्रेमाचा.." अशी एक स्वगत कविता ती भांडी घासताना आम्हाला सुचली होती. असो..

मुख्य मुद्याकडे वळतो. दिवा घासल्याबरोबर त्यातून एक आक्राळविक्राळ देह विकट हास्य करीत प्रकट झाला.
हुकूम मेरे आकाऽऽऽऽ. त्याचा आवाज आसमंतात गरजला ..

मी त्याला फरमान सोडले "जावऽऽ स्वयपाकघर के कट्‌टेपर जितने भांडे है वो धुउन पुसून जागचे जागी रख दो."
पुढच्या क्षणी तो हे सर्व आटोपून हजर..
म्हणाला हुजूरऽऽ कुछ और हुक्म?
मी त्याला म्हणालो, जाव पोटमें कावळे कोकल रहे हैं, कुछ खानेको लावऽऽ (आमचे खाण्यावर प्रेम) ..
पुढच्या क्षणी जिन्न हातात मॅक्डॊनाल्ड चे पार्सल घेवून हजर. आय ऍम लव्हींग इट ( हे वाक्य एरवी कुटुंबासमोर म्हणताना सुद्धा माझी फॅ फॅ उडते ).. पर जमाना बदल रहा है..

मला त्या जिन च्या मल्टी-टास्कींग चे हसू आले.
मी त्याला विचारलं, "तू इतकं मल्टी-टास्कींग कसं करू शकतोस?"॥ किंबहुना त्यामुळंच तू जिन्न झाला असशील।
एरवी अक्राळ विक्राळ भासणारा जिन्न रडवेला झाला.
कातर आवाजात मला म्हणाला.. " माझी बायको मानसशास्त्राची प्राध्यापिका होती.. तिच्य़ा टॅलेंटचं मला कौतुक भारी..
ती मला नेहेमी म्हणायची, " संसार म्हणजे मोनोलॉग नको, डायलॉग हवा.
तिच्या या शब्दाला होकाराची मान हलवत हलवत तो पुन्हा कधी मोनोलॉग झाला हे मला कळलंच नाही...
फक्त मी बोलायचो तेही स्वगत...
लग्नाच्या वाढदिवशी एकदा तिच्यासाठी गजरा आणि पैठणी घेवून आलो. ती कॉलेजातून परत येण्याआधी घर मस्त फुलांनी सजवलं.."

मी जिन्न ला म्हणालो "त्यात काय अवघड. तू ते क्षणार्धात्‌ केलं असणार... तू बोलून चालून जिन्न" ..

तो माझ्या अज्ञानाला वैतागून म्हणाला.." नाहीऽऽ आकाऽऽ [:x}तेव्हा मी जिन्न झालो नव्हतो, जीवंत होतो.. उगाच माझं बोलणं तोडू नका".

तर झालं असं की लग्नाच्या वाढदिवशी मी गजरा आणि पैठणी घेवून आलो.
ती घरी परत येण्यापूर्वी मी सारं घर फुलांनी सजवलं.
डायनिंग टेबलवर कॅंडल-लाईट ची तयारी केली.
ती घरात आली .. मी केलेल्या सा-या तयारीकडे तिने एक कटाक्ष टाकला.
म्हणाली तुझं मल्टी-टास्कींग हल्ली वाढत चाल्लंय.. दाखवून घे कुणाला तरी.."

घराच्या गॅलरीत गेलो..
आफाट पसरलेल्या आभाळाकडे नजर टाकली. पडणा-या ता-याकडे पाहून म्हणालो "देवा, या पढतमूर्खांच्या संगतीतून सोडव. अगदी भूत झालो तरी चालेल पण जिन्न बनव, कुणाला उपयोगी तरी पडू शकेन"..

आपला मोनोलॉग ऐकवून जिन्न केव्हा दिव्यात निघून गेला हे कळलंच नाही.
माझ्या पण डोळ्‌याच्या कडा नकळत पाणावल्या..