Monday, October 27, 2008

धनु राशीचा स्वामी, गुरु असल्यामुळे, मी रेसीपी-गुरु डॉट कॉम हे नाव रजिस्टर करु का? :O
बघा, लगेच तुमच्या मनात आले ना, हे नाव आपण पटकन उचलू म्हणून.. :P.. खाणे आणि गाणे स्वात्मसुखासाठी असावे !!! {कलाकॄती, रसिक, मेजवानी, फ़र्माईश आणि सादरीकरण} हे खाणे आणि गाणे या दोन्हीचे "पंचांग" आहे.. या पाच अंगाने खवैय्या आणि गवैय्या खुलत जातो !!! माझ्या गॄहलक्ष्मीची रास "तुळ" असल्यामुळे मला कायम "वजन" आणि "संतुलित आहार" असा फ़ालतू उपदेश ऐकावा लागतो.. :( ::शरदभाऊ उपाध्येंनी एकदा तिचं बौद्धिक घेतले तर बरे.. माझ्या राशीचे वर्णन करताना, विकीपेडियाकार म्हणतात की ऍम्बिशिअस, डिव्होटेड टू "गोल्स"... हे वाचून उमजले की मला, गुलाब-जाम, लाडू, रसगुल्ला, छेना अंगूर इत्यादि "गोल" पदार्थ का आवडतात.. पंचांग लिहीणे लगेच थांबवतो एवढ्यावरच.. "अंधश्रद्धा निर्मुलन समिती वाले" फराळाला बोलवायचे नाहीत कदाचित..परत मला त्यांची चांद्रयान मोहिमेची बडबड ऐकून घ्यावी लागेल.. तिथं तुर्तास तरी फराळाची सोय नाही..फ़क्त दगड आणि माती.. मी त्यांना वॄशभ राशीचे म्हणालो हे ऐन दीवाळीत सांगू नका त्यांना..

Saturday, October 25, 2008

फराळाचे जिन्नस..

मला उमजलेले संजीव कपूर, विष्णू मनोहर यांच्या अमर कलाकॄती, झटपट करा स्वयंपाक, मराठमोळ्या फराळाचे एकशे एक प्रकार, सुबोधच्या सासूबाई आणि दुर्बोध रेसिपीज, अश्या अनेक नावांना मी माझ्या आय पी आर कन्सल्टंट ला कळवायचे ठरवले आहे.. ही माझी अनेक दिवसांची इच्छा, दीवाळीच्या सणात आणखी तीव्र होवू लागते ! सणाच्या अनेक रेसिपीज बनवताना, मी किचनमध्ये असा "गंधभरला श्वास" घेतोय, तितक्यात, बायकोची सूचना आली, उचला आधी तो तुमचा डब्बा... :x [ लॅपटॉप चा इतका घोर अपमान :( ] अन बाहेर हॉलमध्ये बसा.. :( असोऽऽऽऽ.. :( पण चिवडा बनवतानाची फोडणी, चकलीचा तो मोहक आकार, बाहेरून ग्लॅमर नसलेली पण आतून गोऽऽड अशी करंजी, शेव तळत असतानाचा मस्त सुवास, आणि गुलाबजाम कढईत सोडतानाचे संगीत, तसे बाहेर हॉलमध्ये पण ऐकू शकतो आपण.. असे मनाशीच म्हणून उठतो बाबा एकदाचा ....

ग्राफ़िक यूजर इंटरफेस बनवताना बहुतेक मायक्रोसॉफ्ट ने पाकशास्त्रापासून प्रेरणा घेतली असावी...खरी पाककुशल गॄहिणी ती जी कोंड्याचा मांडा करते. हाच नियम संगणक शास्त्राला देखील लागू आहे.. साधं सॉफ्टवेअर वापरून जो कलाकॄतीचं चीज करतो, तो खरा मल्टीमिडीया आर्टिस्ट! पाककलेचा उत्कट आविष्कार हा सुद्धा मल्टीमिडियाचाच एक प्रकार आहे! किती साधनं वापरावी लागतात हे पहा ना! फाईल फोटोशॉप मधून घ्या आफ्टर इफेक्ट्स मध्ये ..एखादा इमेज सिक्वेन्स मॅक्स किंवा मायामधून घ्या आफ्टर इफेक्ट्स मध्ये.. तिला पुन्हा एखादं प्लग इन जोडून प्रीमिअर मध्ये न्या..अनेक सोपस्कार करून मग एखादं ऍनिमेशन तयार होतं..तसंच गोड, तुरट, आंबट, तिखट या मल्टी मिडीया चा कौशल्यपूर्ण वापर एखादी गॄहिणी करत असते.. दिवाळीच्या दिवसात, कलावंतांचा स्टूडिओ आणि गॄहिणींचं स्वयंपाकघर या दोन्ही ठिकाणी मल्टीमिडिया ची तन्मयतेने साधना चाललेली असते, यातूनच उभे रहातात अफलातून आर्टवर्क्स आणि अप्रतिम फराळाचे जिन्नस..... :)

Monday, October 20, 2008

आमटी या शब्दात जरी आम असला तरी असते मात्र खास...
गाईचं दूध धारोष्ण प्यावं अन आमटी वाफ़ाळत असलेली असावी असं एका थोर्थोर माणसाचं म्हणणं आहे.. " You might have understood so far, How modest I am .. :P

त्या विरघळलेल्या चिंच गुळाची शपथ तुला आहे" अशी कविताच मग जीभेवर येते.. अहो, जीभेवर आमटी ठेवणं ही कल्पनाच मुळात कशी काव्यपूर्ण वाटते .. नाही का? भुईमुग किंवा कच्च्या शेंगांची आमटी, कटाची आमटी, मिश्र डाळींची आमटी..या महाराष्ट्रातील एंडेमिक आणि क्रिटीकली एंडेंजर्ड प्रकारांना आपणच जोपासले पाहिजे! जर पाकशास्त्राचे "रेड डेटा बुक" पुढे मागे चापले क्षमस्व "छापले" गेले तर त्यासाठी हे सायटेशन मी माझ्याकडून करुन ठेवत आहे.... आणखी एक महत्वाचे म्हणजे "मॅनर्स" च्या श्रोणीपॄष्ठावर सरळ सरळ लत्ताप्रहार करून , भाकरी एकतर आमटीत कुस्करून खावी किंवा मग पाची बोटांचे "इंटीग्रेशन" करुन सरळ त्याचा भुरका मारावा या दोन्ही संकल्पनांची एखादी कार्यशाळा घेऊ या का आपण?

Wednesday, October 8, 2008

पनीर

पनीर हे नांव ऐकले, की माझ्या तोंडात नीर दाटून येते....

उत्तम पनीर बाजारात निवडता येणे, ही पण एक क्राफ़्ट आहे. तेथे पाहिजे जातीचे!

तुम्ही कधी क्राफ़्ट्स-उमन असं ऐकलंय का ? नेमका शब्द आहे "क्राफ़्ट्समॅन".. भाजी आणण्याचे सत्कर्म सुखी कुटुंबात पुरुषांना करावे लागते, हे सुद्धा क्राफ़्ट म्हणण्याचे एक कारण आहे..उत्तम पनीर ते "जे हाताल चिकटत नाही आणि थोडंसं चिमटित धरताच सहज मोकळं होऊन जातं"... या मुद्यावर अनेक दॄष्टीकोन असू शकतात परंतु, पनीर निवडणं एक क्राफ़्ट आहे हे निश्चित.. पनीर उत्तर भारतात नेमके दिल्लीच्या आसपास भरपूर आणि ताजे मिळते असे ऐकून आहे. अर्थातच तसा "योग" येण्याची मी वाट पहात आहे.पनीर फ़ेस्टीव्हल सारख्या अनेक कल्पना अजून मी लपऊन ठेवल्या आहेत कारण फ़क्त आय पी आर आणि परक्याच्या कल्पनेवर डोळा असणारे अनेक लोक मला अक्षरशः माहिती आहेत..असोऽऽऽऽ..

पनीर बटर मसाला, मी जवळपास भेटी दिलेल्या सर्व शहरांमधून चाखलाय आजवर..पण औरंगाबाद च्या "लाडली" सारखा कुणाला जमणार नाही, यावर आपली पैज.. बोलाऽऽऽऽ... सिडको मधलं हे तसं मध्यमवर्गीयांचं प्यारं हॉटेल.. पण पंजाबी डिशेस अश्या बनतात इथं की अक्खा पंजाब फिदा होऊन जाईल. आता हॉटेल औरंगाबाद चं म्हणून नाकं मुरडू नका.. अस्मिता अशी जपावी, खाण्यात सुद्धा.. माझ्या मराठवाड्यावर माझं प्रेम आहे.. इथल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पदार्थांचा मला अभिमान आहे.. त्यांची चव किमान एकदा तरी घेण्याची पात्रता माझे अंगी यावी म्हणून मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन..असोऽऽऽऽ

धाबा आणि पनीर म्हणजे, ठुमरी आणि हिमेश.. न जमणारं गणित.. सर्व नियम धाब्यावर बसवून, धाबेवाले शिळ्या पनीराचे असे पदार्थ बनवतात की कडकडीत वैराग्य उत्पन्न व्हावे...

पनीर मंचूरिअन पासून थाय पनीर चिली पर्यंत या पदार्थाचा कॉस्मोपोलिटीअन संचार बघितला की अन्न हे पूर्णब्रम्ह आणि "स्थलःत्रयातीतः" असल्याची खात्री पटते. पनीर भुर्जी , पालक पनीर, पनीर टिक्का मसाला, एकापाठोपाठ एक पनीरच्या डिशेस ची नांवं घेणारा वेटर बघून मी एकदा एकाचं कौतुक केलं होतं. त्याला टीप देताच तो मला गहिवरुन म्हणाला, "गुरुजी मला पैसे नकोत.. फ़क्त जीभेवरती पनीर ठेवा आणि "वाऽऽह म्हणा"..

Thursday, October 2, 2008

श्रीखंड


श्रीखंड बनवणे ही सहासष्टावी कला आहे याबाबत कुणाचेच दुमत नसेल. रेडीमेड श्रीखंड हा एक ऐनवेळेचा पर्याय झाला. पण श्रीखंडाची माझी स्वतःची रेसिपी मी थोडा भीत भीतच देतोय... लगेच कुणीतरी त्यावर बौद्धिक मालकी सांगायला येईल.. हा प्रांत तसा आय पी आर पासून दूर असलेला बरा. असोऽऽऽऽऽ.. रेसिपी सांगतो..

उत्तम दही घ्या. मातीच्या मडक्यात बनवलेले असले तर क्या बात है.. त्याला रात्री कापडात बांधून टांगा..(वाहन असा अर्थ येथे घेऊ नये) सकाळी त्यातील चक्का बाजूला काढा..अन आता त्याच्या आकारमानाच्या अर्धे किसमिस घ्या.. दगडावर वाटता आले तर उत्तम अन्यथा मिश्रणयंत्र(आंग्लभाषेत मिक्सर) चालेल. ती पेस्ट, चक्क्यात मिसळून चमच्याने २० मिनिटे घोटा.. त्यात थोडाफ़ार सुकामेवा टाका..आणि पुन्हा तेवढेच घोटा... श्रीखंड तयार!

महाराष्ट्राच्या श्रीखंडाचा जुळा भाउ तुम्हाला आढळेल बंगालमध्ये. ते त्याला मिष्टी दोही म्हणतात. बंगाल जादूसाठी प्रसिद्ध आहे. मिठाईचे विश्व हा देखील जादूचा प्रांत आहे. येथे अनेक लहान लहान ट्रीक्स असतात ज्या जिभेला चवीच्या विलक्षण वैविध्याने सुखाऊन जातात. मिठाई तीच, पण वेलची किंवा केशर यांच्या सहवासात अमुलाग्र बदलून जाते. श्रीखंड सुद्धा कधी आम्रखंड तर कधी व्हॅनिला, रास्पबेरीच्या संगे जुन्या युगाची कात टाकून "इंटरकॉन्टीनेन्टल" होऊन जातं. या पदार्थाची थोरवीच इतकी की देव सुद्धा संत एकनाथांच्या घरी या नांवानं वर्षानुवर्षे राहिला. नाथांघरी राबणारा श्रीखंड्या हे ईश्वराचं मनोहारी रुप, पूर्णयोगी श्रीएकनाथांना पण कळलं नाही..

दादर स्टेशनचा दादरा उतरून खाली येताच हसतमुखानं स्वागत करणारं कैलास मंदीर... तिथं चमच्यानं लस्सी "खातात".. सोनी वाल्यांनी "लस्सी जैसी कोई नहीं" बनवायला घेतल्यानंतर स्टॊरीत थोडासा चेंज झाला हे माझ्या एका मित्रानं मला सांगितलं होतं म्हणून शेवटी "ल चा ज केला" असोऽऽऽऽऽऽऽऽ.. पण मी ऐकलंय की कित्येक श्रीखंड विक्रेते तिथून लस्सी घेऊन जात आणि श्रीखंड म्हणून विकत असत. याच श्रीखंडावर अनेक माजघरातल्या "आर अँड डी" टीम्स राब राबल्या.. त्यातून जिव्हासुखोपनिषदातील अनेक रह्स्यं उलगडली. श्रीखंड पुरी चं नातं, हीर रांझा, लैला मजनू सारखं चिरंतन आहे.. दोघांना एकमेकांशिवाय अस्तित्वच नाही मुळी!