Tuesday, December 23, 2008

भेळ

सासुरवाडीत आमचा निवास असतो ते वेळी आम्हास अनेक उत्तमोत्तम पदार्थ मिळत असतात.

स्वशुरगॄही करी वास, तो येक मूर्ख।

असा दासबोधाचा अभिप्राय असोनही आम्ही आत्यंतिक नाईलाजाने कधी कधी जात असतो तेथे.

मुख्य म्हणजे मला त्या परिसराची ओढ आहे.
वाडी आणि औदुंबर आहेच आहे.
कृष्णामाईच्या कुशीत बहरलेला रम्य परिसर पहाण्याची मौज वेगळीच आहे.
परंतु या सर्वांपेक्षा अति-महत्वाचे व अतिगोपनीय म्हणजे तिथे खाण्याची चंगळ असते.

सांगलीच्या भोरे बंधूंचे आमचे विश्वबंधुत्वाचे नाते आहे.
"भडंग" हा प्रकार जर आपणास माहिती नसेल तर आपले जीणे व्यर्थच नाही तर "भणंग" होय असे आमचे निश्चयात्मक आणि निःसंशय मत आहे.

एकट्या सांगली शहरात भडंग बनवणारे अनेक उद्योजक आहेत.
पण भोरे आणि गोरे हे दोन तिथले सर्वेसर्वा...पैकी "भोरे-भडंग" आम्ही जिव्हाळ्याने खात असतो. सांगलीचा आणखी एक उत्तम पदार्थ म्हणजे तिथली भेळ..

भेळ म्हणजे या विश्वाच्या पसा-यासारखी.
हे विश्व तसे विश्वकर्म्याच्या अनेक रचनांची भेळ आहे.

हॅल्डेन नांवाचा वैज्ञानिक होवून गेला.
तो म्हणाला होता की हे विश्व नुसतेच भासते तितके अजब नाही तर आपण कल्पना करू शकू त्याहीपेक्षा अधिक अजब आहे. निसर्ग आपल्या दुराग्रहाला जिरवत असतो. आपण निसर्गावर मात करु शकू या भ्रमात त्याला नाकरण्याचा, "डिग्नीफाईड गाढवपणा" करत रहातो.

निसर्गाशी मैत्री केली तर ती जास्त फलदायी!

डॉर्विनसारखा अत्यंत निरीश्वरवादी वैज्ञानिकसुद्धा म्हणालाय "निसर्गाशी अनुकूल व्यवहार करावा तर जीवन उत्क्रांत होते"..त्या विश्वात्मक शक्तीला तुम्ही देव म्हणा अथवा निसर्ग म्हणा किंवा चार शिव्या द्या. तिला काय फरक पडतो? एक मात्र खरे की त्या शक्तीला प्रेमानं वंदन केलं तर ती वात्सल्याचा वर्षाव करते. " भावशून्य डिग्नीफाईड गाढवपणापेक्षा भावमयी अडाणीपण चांगलं..

हे विश्व प्रचंड अजब आहे, हे हॅल्डेनचं म्हणणं तसं खरं आहे.

पण जरा भारतीयतेच्या जाज्वल्य अस्मितेने बघा मग दिसेल की विश्वाकडे पहाण्याचा ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टीकोन कसा स्वच्छ आहे..

"हे विश्व नव्हे रे माया, ही तर प्रभूची काया"...

माउलींच्या ओव्यांमध्ये पदोपदी ही ओळ येते.. "विश्वात्मके देवे..... सर्वात्मका ईश्वरा... वगैरे वगैरे.."

साक्षर असलेल्या पण संकुचितपणा न सोडणा-या बुद्धीजीवी लोकांचा हा भ्रम असतो की धर्म वाटोळे करतो.
यूरोपचे वाटोळे जीझस ने केले नाही.
प्रेमाची मूर्ती होता ख्रिस्त
.
येशू ख्रिस्ताच्या "कार्यकर्त्यांना" तो कळाला नाही.
कानडा राहिला ख्रिस्त
..पंढरीच्या राजासारखा..
Queerer to understand..
difficult to percieve...
आपली चर्चेस मधून थाटलेली दुकानं कशी चालणार या भयापोटी गॅलिलीओ सारख्या निष्पाप लोकांना चर्च ने त्रास दिला. पण तो ज्यानी दिला त्यांना ख्रिस्त कळाला नाही. बायबल उमजले नाही.
ख्रिस्ताचे चरित्र फक्त दोनच शब्दांत लिहीता येते..
"लव्ह" आणि "फर्गिव्हनेस"..


धर्म कुणाचेच वाईट करत नाही. फक्त आमचा दुराग्रह वाईट असतो.
मग कधी कधी तो विज्ञानाचा दुराग्रह असेल.

मेंडेल सारखा वैज्ञानिक उपेक्षित राहिला आणि हे जग अज्ञाताचे वस्त्र पांघरुन सोडून गेला. त्याला कारण वैज्ञानिकांचे दुराग्रह!!!!!!!!!!!!!!!!!!!! नॅगेली ने विनाकारण केलेला मेंडेलचा द्वेष आणि डॉर्विनची प्रसिद्धी यामुळे मेंडेल दुर्लक्षित अवस्थेत मेला. त्याच्या मृत्य़ूच्या सतरा वर्षांनंतर तो जगाला माहिती पडला. वैज्ञानिक दुराग्रहाचा हा सगळ्यात मोठा "बळी" आहे.

मॅक्स प्लॅंक चे एक वाक्य मला खूप आवडते....
Science is what "it"is.. and Religion is what "it "should be!!"

विज्ञान म्हणजे वास्तवाचे प्रकट दर्शन होय, आणि ते वास्तव कसे असावे याचे मार्गदर्शन मात्र धर्म करतो"..

विज्ञानाला स्वतःची चव नाही.
भेळेतल्या चुरमु-यासारखी विज्ञानाला स्वतःची चव नाही ....

पण महत्वाचा घटक चुरमुरेच असतात. त्यात जीवन-रसाचा आत्मरसाचा मसाला टाकून मस्त भेळ बनवावी.. आणि चव घेऊन खावी..

चलो, निघतो आताऽऽऽऽ.. हॅप्पी भेळ... आणि मेरी क्रिस्मस...
सी या..

Saturday, December 20, 2008

देणा-याने देत जावे

ये उन दिनों की बात है..

लग्नानंतर आम्ही काही दिवसांनी सासुरवाडी मुक्कामी पोहोचलो.
कुटुंब खुश्श्श्श!!!

एक दिवस नरसोबा-वाडी आणि दुसरे दिवशी औदुंबरला गेलो.
औदुंबर ला भगवान दत्तात्रेयांचं दर्शन घेवून आम्ही जवळच असलेल्या कवी "सुधांशुंच्या" घरी गेलो.
ज्याला दत्तसांप्रदायाची ओळख आहे त्यानं पराडकरांची भजनं ऐकली नाहीत असं शक्यच नाही.
त्यापैकी बहुतांशी रचनांचे रचनाकार, श्री.ह. जोशी म्हणजेच सुधांशु..

"त्रैमुर्ती अवतार मनोहर..यतिरुपे नटले, आज मी दत्तगुरु पाहिले.."
यासारख्या अनेक अप्रतिम भजनांचे रचनाकार..

सत्वगुणाचा संस्कार असल्यानं अनोळखी लोकांचं आतिथ्य पण कसं प्रेमानं होतं ना!

गीतेचा श्लोक आहे..."सत्वात संजायते ज्ञानं"...

या सत्वगुणातून येणारी जाणीव जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत खरे ध्यान नाही.
जोपर्यंत खरे ध्यान नाही तोपर्यंत जगाचे खरे रुप आकळत नाही.
जोपर्यंत जगाचे खरे रुप कळत नाही, तोपर्यंत त्याग खरा होत नाही..
जर त्याग खरा झाला तरच "त्यागात शांती निरंतरं" असा गीतेचा संदेश आहे..


माणसं भरपूर काही देतात.
मोठमोठ्या देणग्या सामाजिक संस्थांना देतात.
अर्थात त्याला काही महत्व नाही असे नाही. पण ते एक "स्टीरीओटाईप" बनून जाते अखेर..
देणारे हात आपले नाहीत याचं भान जोपर्यंत नाही तोपर्यंत "इदं न ममः" आकळत नाही.

एका मित्रानं मला एक मस्त किस्सा सांगितला होता.
स्काऊटचे मास्तर एकदा विद्यार्थ्यांना म्हणाले.."बाळांनो, आज समाजसेवा करा!"
बच्चेकंपनीनं विचारलं कशी करतात ती सेवा??
मास्तर म्हणाले, आंधळ्या म्हातारीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करायची.."
पोरं उत्साही... त्यांनी एक आंधळी म्हातारी धरून आणली.
चाळीस विद्यार्थीसंख्या एकूण..
वीस रस्त्याच्या या बाजूला आणि वीस त्या बाजूला...
एक म्हातारीला धरुन इकडे आणायचा आणि दुसरा तिला धरून पलीकडे पोहोचवायचा...
अशी थाटात समाजसेवा घडली..

तात्पर्य- सेवेचे खरे रुप कळले पाहिजे...
सेवा स्वतःचा विसर पडल्याशिवाय घडत नाही.
बाबा आमटेंसारख्या आभाळाइतक्या उत्तुंग लोकांनापण सोडून काही कार्यकर्ते निघून गेले..
एन. जी. ओ. हा शब्द वापरण्याऐवजी शिवी दे, असं एकदा माझा एक मित्र मला म्हणाला होता..
सेवेचा पंथ अनाम वीरांचा आहे.
सुनिताबाईंनी
लिहिलं नसतं तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा कलंदर, समाजपुरुषाचा कसा विलक्षण सेवक होता हे कळलेच नसते.

संस्कृत काव्याच्या अभिजात प्रासादाची रचना भास, कालीदासांसारख्या प्रतिभावंतांनी केली पण त्यांची जीवनं अज्ञाताच्या पडद्याआड! त्यांनी आत्मचरित्रं लिहून ठेवली नाहीत.. त्यांना वाग्विलासिनीच्या सेवेपुढे स्वतःची प्रतिमा शून्य वाटली कदाचित..

रणजीत देसाईंच्या श्रीमान योगी मध्ये वाचलेला प्रसंग आहे.
शिवछत्रपतींनी मिर्झाराजेंना विचारलं, "या ताजमहालाचा पाया संगमरवरी आहे का?"
मिर्झाराजे म्हणाले.. "नाही, पण आपण असं का विचारता?"
राजे म्हणाले" आम्ही या स्वराज्याच्या ताजमहालाच्या संगमरवरासारखे आहोत. पण त्याचा पाया ज्या अनेक मावळ्यांनी रचला ते मात्र कातलेल्या पाषाणासारखे.. कुणाच्या नजरेला पडत नाहीत कधी!!

समर्थांनी शिवरायांच्या या गुणाचं पराकोटीच्या प्रेमानं कौतुक केलं आहे..
"आठवावा साक्षेप शिवरायांचा"..
शिवकल्याणराजा.. शिवशंभूराजा..


असो....
मुख्य मुद्याकडे वळतो.
सुधांशुंच्या घरी प्रेमळ आतिथ्य अनुभवलं..
मी माझी डायरी त्यांच्या समोर दिली..
निघताना..
स्वाक्षरी संदेशासाठी.. "
त्यावर त्यांनी एक कविता लिहून स्वाक्षरी केली.

रे यज्ञातून फुलते जीवन..
यज्ञकुंड हे धगधगते..
निजस्वार्थांच्या समिधांतून फुलते..
तप्त तेजाळू दे अवघे यौवन..
रे यज्ञातून फुलते जीवन"..

इदं न ममः हा या भूमीचा उदघोष आहे..

हे माझे नाही... "इदं न ममः"..


हे माझे नाही..हे माझे नाही...हे माझे नाही.. म्हणत म्हणत..
देणा-याने देत जावे..देणा-याने देत जावे..

पण देणारे हात आपले नाहीत याचं भान विसरू नये..

अश्या लोकांच्या इदं न ममः चा प्रवास शेवटी, शरीरापर्यंत येऊन ठेपतो..

अभिषेकीजींचे शब्द कानात तरळून गेले..
"पूजेतल्या पाना-फुला,
मॄत्य़ू सर्वांगसोहळा,
धन्य निर्माल्याची कळा..

नाही पुण्याची मोजणी .
नाही पापाची टोचणी..
जीणे गंगौघाचे पाणी....

खरं तर मरण असं असावं..
जेव्हा येईल तेव्हा येवो पण तोपर्यंत "मना चंदनाचे परि त्वा झिजावे!!!"...


कर्म करताना ही संधी आहे म्हणून.. त्याचा शॊ न करता.. अनाम राहून..
मग मरणे नाहीच.. अंतरीच्या चैतन्यनाथाचा प्रसाद होतो..
****************************************************
वरील थाटात लिहिलेलं असं हे लेखन माझ्या डायरीत वाचून एकदा बायको ओरडली..
"तुम्ही हे लिहीणं बंद करा.. मेलं लोका सांगे ब्रम्हज्ञान..

असोऽऽऽ माणूस जगासमोर "सिंग इज किंग"
पण बायकोसमोर त्याचा अनाडी नंबर वन होऊन जातो..
रब ने कशी बना दी जोडी????? हे त्या रब ला माहिती..

चलो.. निघतो आता..
हॅप्पी जोडी..
सी या...