प्रसंगी क्रांतीकारी विचारांनी पेटलेला, महाराष्ट्राचा तमाम युवा कार्यकर्ता वर्ग रचनात्मक असे काही करू लागेल..
अथवा येखादे समयी पाकिस्तानात अथवा स्वात खो-यात झरदारीदादा अर्धोन्मिलीत नेत्रांनी शांतीच्या शोधात जातील..
अथवा मुशर्रफकाका झेन कथांवर व्याख्याने देतील....
प्रसंगी साखरेचे आणि तुरीचे भाव प्रचंड घसरतील....
शक्य आहे की देशाचा कानाकोपरा वीजेने उजळून निघेल...
कदाचित तब्बल दोन महिने मुंबईवर ढग प्रचंड पाऊस पाडत रहातील...
परंतु आमचे कुटुंंब सुधारेल तर शप्पथ!
तर प्रसंग असा बाका की आमच्या नेहमीच्या स्वभावास अनुसरून आम्ही स्वगत व्यक्त करत होतो.
आम्ही प्रचंड निर्भीड आहोत हे जरी त्रिवार सत्य असले तरीही कुटुंबकबीलेवाले आहोत.
आमची जीभ सुद्धा फक्त खाण्यासाठी नाही तर "ब्र" म्हणण्यासाठी कधीकधी पुढे येत असते.
तथापि कोणाला तरी प्रत्यक्ष बोलावे अथवा त्याचे प्रबोधन किंवा उद्बोधन करावे असा बाणेदार विचार डोक्यात येतो न येतो तोपर्यंत आमच्या औकातीचे आम्हास तीव्र स्मरण होते आणि कसेबसे हसून आम्ही चिंतनात मग्न होवून जातो.
प्रचंड महागाईच्या काळातसुद्धा नमनलाच घडाभर तेल ओतण्याचे कारण एक की आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनसुद्धा आम्ही स्वगतावर भागवत असतो.
लोक नीट सांगितलेले ऐकत नाहीत म्हणून मुल्ला नसरूद्दीन गाढवाशी बोलायचा.
आम्ही मात्र स्वतःशीच बोलत असतो.
येकूण येक तेच ते. गाढवाचा एक विशेष गुण असा की ते विनातक्रार जगतं.
आम्हाला पण कोणाविषयीच कसलीच तक्रार नाही.
फक्त स्वतःशी बोलत असलो की कुटुंब भडकते.
येखाद्या दुष्ट ग्रहाची दशमस्थानी तेवढी वक्री नजर नसेल,जेवढी आमच्या कुटुंबाची आमच्या खाण्यावर आणि बोलण्यावर म्हणजेच जीभेवर असते.
या तमाम लेखनप्रपंचाचा गोषवारा असा की आम्हाला स्वतःसोबत बोलण्यापुरतेसुद्धा अभिव्यक्तिस्वातंत्र्य उरले नाही.
खरंच "मी" कोणीही नाही..
फक्त एक गॄहीतक..
एका मित्राने ऐकवलेली गोष्ट आठवली.
एकदा मुल्ला नसरुद्दीन त्याच्या गाढवाबरोबर राजवाड्यात गेला आणि सरळ सिंहासनावर बसला.
राजसिंहासनावर बसलेला मुल्ला पाहून पहारेकरी चमकला.
तो मनाशीच म्हणाला कदाचित् हा खूप मोठा किंवा राजाच्या मर्जीतला असला पाहिजे.
त्याने मुल्लास नम्रतेने सवाल केला ..
आपण कोणीतरी मोठी हस्ती दिसता.
त्यावर मुल्लाने मान हलवली.- होय़.. आहे.. मी मोठाच आहे.
पहारेकरी- म्हणजे कोण सेनापती का?
मुल्ला- नाही त्याहून मोठा आहे मी.
पहारेकरी- मग तुम्ही प्रधान असणार..
मुल्ला- नाही.. त्याहून मोठा!
पहारेकरी- मग तुम्ही राजे आहात? वेष बदलून आलेले???
मुल्ला- नाही. मी त्याहून मोठा आहे.
पहारेकरी यावर हसत हसत म्हणाला- राजापेक्षा मोठा कोणीही नाही.
त्यावर मुल्ला लगेच उसळून म्हणाला...
होयऽऽ बरोब्बरऽऽ तेच ते.. मी "कोणीही नाही" आहे.
जोपर्यंत "मी कोणीतरी आहे असे वाटत असते तोपर्यंत खरे मोठेपण नाही जेव्हा मी कोणीही नाही असे वाटते तेव्हा मात्र राजाहून मोठेपण सहजच येते."
चलाऽऽ तर मग आपण कोणीही नाही असे रहावे...
माउलींची ओवी आठवली-
येथ जाणीव करी तोचि नेणे ।
आथिलेपण मिरवी तेचि उणे।
आम्ही झालो ऐसे म्हणे ।
तो काहीचि नव्हे ॥
असो...
हॅप्पी गाढव. हॅप्पी नसरुद्दीन.. !!!