Saturday, December 20, 2008

देणा-याने देत जावे

ये उन दिनों की बात है..

लग्नानंतर आम्ही काही दिवसांनी सासुरवाडी मुक्कामी पोहोचलो.
कुटुंब खुश्श्श्श!!!

एक दिवस नरसोबा-वाडी आणि दुसरे दिवशी औदुंबरला गेलो.
औदुंबर ला भगवान दत्तात्रेयांचं दर्शन घेवून आम्ही जवळच असलेल्या कवी "सुधांशुंच्या" घरी गेलो.
ज्याला दत्तसांप्रदायाची ओळख आहे त्यानं पराडकरांची भजनं ऐकली नाहीत असं शक्यच नाही.
त्यापैकी बहुतांशी रचनांचे रचनाकार, श्री.ह. जोशी म्हणजेच सुधांशु..

"त्रैमुर्ती अवतार मनोहर..यतिरुपे नटले, आज मी दत्तगुरु पाहिले.."
यासारख्या अनेक अप्रतिम भजनांचे रचनाकार..

सत्वगुणाचा संस्कार असल्यानं अनोळखी लोकांचं आतिथ्य पण कसं प्रेमानं होतं ना!

गीतेचा श्लोक आहे..."सत्वात संजायते ज्ञानं"...

या सत्वगुणातून येणारी जाणीव जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत खरे ध्यान नाही.
जोपर्यंत खरे ध्यान नाही तोपर्यंत जगाचे खरे रुप आकळत नाही.
जोपर्यंत जगाचे खरे रुप कळत नाही, तोपर्यंत त्याग खरा होत नाही..
जर त्याग खरा झाला तरच "त्यागात शांती निरंतरं" असा गीतेचा संदेश आहे..


माणसं भरपूर काही देतात.
मोठमोठ्या देणग्या सामाजिक संस्थांना देतात.
अर्थात त्याला काही महत्व नाही असे नाही. पण ते एक "स्टीरीओटाईप" बनून जाते अखेर..
देणारे हात आपले नाहीत याचं भान जोपर्यंत नाही तोपर्यंत "इदं न ममः" आकळत नाही.

एका मित्रानं मला एक मस्त किस्सा सांगितला होता.
स्काऊटचे मास्तर एकदा विद्यार्थ्यांना म्हणाले.."बाळांनो, आज समाजसेवा करा!"
बच्चेकंपनीनं विचारलं कशी करतात ती सेवा??
मास्तर म्हणाले, आंधळ्या म्हातारीला रस्ता ओलांडण्यासाठी मदत करायची.."
पोरं उत्साही... त्यांनी एक आंधळी म्हातारी धरून आणली.
चाळीस विद्यार्थीसंख्या एकूण..
वीस रस्त्याच्या या बाजूला आणि वीस त्या बाजूला...
एक म्हातारीला धरुन इकडे आणायचा आणि दुसरा तिला धरून पलीकडे पोहोचवायचा...
अशी थाटात समाजसेवा घडली..

तात्पर्य- सेवेचे खरे रुप कळले पाहिजे...
सेवा स्वतःचा विसर पडल्याशिवाय घडत नाही.
बाबा आमटेंसारख्या आभाळाइतक्या उत्तुंग लोकांनापण सोडून काही कार्यकर्ते निघून गेले..
एन. जी. ओ. हा शब्द वापरण्याऐवजी शिवी दे, असं एकदा माझा एक मित्र मला म्हणाला होता..
सेवेचा पंथ अनाम वीरांचा आहे.
सुनिताबाईंनी
लिहिलं नसतं तर पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे नावाचा कलंदर, समाजपुरुषाचा कसा विलक्षण सेवक होता हे कळलेच नसते.

संस्कृत काव्याच्या अभिजात प्रासादाची रचना भास, कालीदासांसारख्या प्रतिभावंतांनी केली पण त्यांची जीवनं अज्ञाताच्या पडद्याआड! त्यांनी आत्मचरित्रं लिहून ठेवली नाहीत.. त्यांना वाग्विलासिनीच्या सेवेपुढे स्वतःची प्रतिमा शून्य वाटली कदाचित..

रणजीत देसाईंच्या श्रीमान योगी मध्ये वाचलेला प्रसंग आहे.
शिवछत्रपतींनी मिर्झाराजेंना विचारलं, "या ताजमहालाचा पाया संगमरवरी आहे का?"
मिर्झाराजे म्हणाले.. "नाही, पण आपण असं का विचारता?"
राजे म्हणाले" आम्ही या स्वराज्याच्या ताजमहालाच्या संगमरवरासारखे आहोत. पण त्याचा पाया ज्या अनेक मावळ्यांनी रचला ते मात्र कातलेल्या पाषाणासारखे.. कुणाच्या नजरेला पडत नाहीत कधी!!

समर्थांनी शिवरायांच्या या गुणाचं पराकोटीच्या प्रेमानं कौतुक केलं आहे..
"आठवावा साक्षेप शिवरायांचा"..
शिवकल्याणराजा.. शिवशंभूराजा..


असो....
मुख्य मुद्याकडे वळतो.
सुधांशुंच्या घरी प्रेमळ आतिथ्य अनुभवलं..
मी माझी डायरी त्यांच्या समोर दिली..
निघताना..
स्वाक्षरी संदेशासाठी.. "
त्यावर त्यांनी एक कविता लिहून स्वाक्षरी केली.

रे यज्ञातून फुलते जीवन..
यज्ञकुंड हे धगधगते..
निजस्वार्थांच्या समिधांतून फुलते..
तप्त तेजाळू दे अवघे यौवन..
रे यज्ञातून फुलते जीवन"..

इदं न ममः हा या भूमीचा उदघोष आहे..

हे माझे नाही... "इदं न ममः"..


हे माझे नाही..हे माझे नाही...हे माझे नाही.. म्हणत म्हणत..
देणा-याने देत जावे..देणा-याने देत जावे..

पण देणारे हात आपले नाहीत याचं भान विसरू नये..

अश्या लोकांच्या इदं न ममः चा प्रवास शेवटी, शरीरापर्यंत येऊन ठेपतो..

अभिषेकीजींचे शब्द कानात तरळून गेले..
"पूजेतल्या पाना-फुला,
मॄत्य़ू सर्वांगसोहळा,
धन्य निर्माल्याची कळा..

नाही पुण्याची मोजणी .
नाही पापाची टोचणी..
जीणे गंगौघाचे पाणी....

खरं तर मरण असं असावं..
जेव्हा येईल तेव्हा येवो पण तोपर्यंत "मना चंदनाचे परि त्वा झिजावे!!!"...


कर्म करताना ही संधी आहे म्हणून.. त्याचा शॊ न करता.. अनाम राहून..
मग मरणे नाहीच.. अंतरीच्या चैतन्यनाथाचा प्रसाद होतो..
****************************************************
वरील थाटात लिहिलेलं असं हे लेखन माझ्या डायरीत वाचून एकदा बायको ओरडली..
"तुम्ही हे लिहीणं बंद करा.. मेलं लोका सांगे ब्रम्हज्ञान..

असोऽऽऽ माणूस जगासमोर "सिंग इज किंग"
पण बायकोसमोर त्याचा अनाडी नंबर वन होऊन जातो..
रब ने कशी बना दी जोडी????? हे त्या रब ला माहिती..

चलो.. निघतो आता..
हॅप्पी जोडी..
सी या...

3 comments:

Asha Joglekar said...

Dattachee bhajan wachayala aale pan tumacha lekh wachoon anikach chan watal.

रमण ओझा said...

khup khup Dhanyawad Ashaji. :)

Snehit Baheti said...

Thanks for sharing!!!!