Thursday, July 2, 2009

आषाढस्य एकादश दिवसे

आषाढस्य एकादश दिवसे माझा जीव कसा चिंब चिंब असतो.
त्याला तसे महत्वाचे कारण आहे.
उत्तम भिजलेल्या साबूदाण्याची उसळ , फळ फळावळ , बटाटा वेफर्स, भगर, उत्तम दही आणि सायंकाळी साबूदाणा वडा.. ..इत्यादि भरगच्च कार्यक्रम झाला की माझा उपवास कॄतार्थ होतो.

दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली । गौळणी गोरसु म्हणो विसरली ।
गोविन्दु घ्या कोणी दामोदरू घ्या वो ।तव तव हासती मथुरेच्या वो ॥

प्रेमाचा प्रांतु असाच बाप्पाऽऽ.. एकदा प्रेम वसले की धंदा विसरतो अन्‌ उद्योगही विसरतात..

आमच्या जिव्हेचे तस्सेच झाले आहे.
भाविक लोक आषाढीची वाटुली पहातात..
चैतन्याचा पुतळा नेत्री साठवावा म्हणून पण आमच्या चोचलेबाज जिव्हेने घात केला .. काय करावे?

तुकोबा म्हणतात-
माता के चित्त पुत्र बैठा, कामिनी के चित्त काम ।
लोभी के चित्त धन बैठा, तुका के मन में राम ॥

पण आम्हास खुणावतात ते गुळ शेगदाण्यांचे लाडू आणि साबूदाण्याचे वडे
काय करावे उमजत नाहीऽऽ बाप्पाऽऽ !!

प्रेमाची जातीच ऐसी.. एकदा जीव जडला की मग तो परत कैसा फिरावा?
आमचे जिव्हासुखावरचे प्रेम तकलादु नोहे.

सासू साठी रडे सून । परि भाव अंतरीचा भिन्न ॥
जळो प्रेमा तैसा रंग, जाय भुलोनि पतंग ॥

या प्रेमाचा एकमेव शत्रू म्हणजे आमचे अर्धांग.
ते आमचे खाण्याचे वेड पाहून वारकरी नेतॄत्व तापल्यासारखे तापते. ब-याच वेळा फराळाचे पदार्थ वाटेतच अडून बसतात. ताटापर्यंत पोहोचतच नाहीत.

अर्धांग आमच्या अंगावर खेकसत ओरडते..
हे खाण्याचे वेड सोडा. जरा त्याग शिकाऽऽ..

मी अर्धांगाच्या समोर अश्या प्रसंगी बोलणे टाळतो.
कारण उपवासाचे पदार्थ खाण्यास त्यामुळे प्रतिबंध होईल असे भय वाटत असल्यामुळे, मौनम्‌ सर्वार्थ साधनम्‌ असे मी स्वतःला समजावतो..

असा त्याग काय कामाचा..
जिभेला चोचल्यांची ओढ आणि त्यागाचे सॊंग काय कामाचे??

तुकोबाराय म्हणतात
त्यागिल्याचे ध्यान राहिले अंतरी । अवघी ती परी विटंबना ॥
असोऽऽ

चला निघतो आता..
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारामपंढरीनाथ महाराज की जय ॥

हॅप्पी आषाढी .. हॅप्पी फराळ !

No comments: