प्रसंगी क्रांतीकारी विचारांनी पेटलेला, महाराष्ट्राचा तमाम युवा कार्यकर्ता वर्ग रचनात्मक असे काही करू लागेल..
अथवा येखादे समयी पाकिस्तानात अथवा स्वात खो-यात झरदारीदादा अर्धोन्मिलीत नेत्रांनी शांतीच्या शोधात जातील..
अथवा मुशर्रफकाका झेन कथांवर व्याख्याने देतील....
प्रसंगी साखरेचे आणि तुरीचे भाव प्रचंड घसरतील....
शक्य आहे की देशाचा कानाकोपरा वीजेने उजळून निघेल...
कदाचित तब्बल दोन महिने मुंबईवर ढग प्रचंड पाऊस पाडत रहातील...
परंतु आमचे कुटुंंब सुधारेल तर शप्पथ!
तर प्रसंग असा बाका की आमच्या नेहमीच्या स्वभावास अनुसरून आम्ही स्वगत व्यक्त करत होतो.
आम्ही प्रचंड निर्भीड आहोत हे जरी त्रिवार सत्य असले तरीही कुटुंबकबीलेवाले आहोत.
आमची जीभ सुद्धा फक्त खाण्यासाठी नाही तर "ब्र" म्हणण्यासाठी कधीकधी पुढे येत असते.
तथापि कोणाला तरी प्रत्यक्ष बोलावे अथवा त्याचे प्रबोधन किंवा उद्बोधन करावे असा बाणेदार विचार डोक्यात येतो न येतो तोपर्यंत आमच्या औकातीचे आम्हास तीव्र स्मरण होते आणि कसेबसे हसून आम्ही चिंतनात मग्न होवून जातो.
प्रचंड महागाईच्या काळातसुद्धा नमनलाच घडाभर तेल ओतण्याचे कारण एक की आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनसुद्धा आम्ही स्वगतावर भागवत असतो.
लोक नीट सांगितलेले ऐकत नाहीत म्हणून मुल्ला नसरूद्दीन गाढवाशी बोलायचा.
आम्ही मात्र स्वतःशीच बोलत असतो.
येकूण येक तेच ते. गाढवाचा एक विशेष गुण असा की ते विनातक्रार जगतं.
आम्हाला पण कोणाविषयीच कसलीच तक्रार नाही.
फक्त स्वतःशी बोलत असलो की कुटुंब भडकते.
येखाद्या दुष्ट ग्रहाची दशमस्थानी तेवढी वक्री नजर नसेल,जेवढी आमच्या कुटुंबाची आमच्या खाण्यावर आणि बोलण्यावर म्हणजेच जीभेवर असते.
या तमाम लेखनप्रपंचाचा गोषवारा असा की आम्हाला स्वतःसोबत बोलण्यापुरतेसुद्धा अभिव्यक्तिस्वातंत्र्य उरले नाही.
खरंच "मी" कोणीही नाही..
फक्त एक गॄहीतक..
एका मित्राने ऐकवलेली गोष्ट आठवली.
एकदा मुल्ला नसरुद्दीन त्याच्या गाढवाबरोबर राजवाड्यात गेला आणि सरळ सिंहासनावर बसला.
राजसिंहासनावर बसलेला मुल्ला पाहून पहारेकरी चमकला.
तो मनाशीच म्हणाला कदाचित् हा खूप मोठा किंवा राजाच्या मर्जीतला असला पाहिजे.
त्याने मुल्लास नम्रतेने सवाल केला ..
आपण कोणीतरी मोठी हस्ती दिसता.
त्यावर मुल्लाने मान हलवली.- होय़.. आहे.. मी मोठाच आहे.
पहारेकरी- म्हणजे कोण सेनापती का?
मुल्ला- नाही त्याहून मोठा आहे मी.
पहारेकरी- मग तुम्ही प्रधान असणार..
मुल्ला- नाही.. त्याहून मोठा!
पहारेकरी- मग तुम्ही राजे आहात? वेष बदलून आलेले???
मुल्ला- नाही. मी त्याहून मोठा आहे.
पहारेकरी यावर हसत हसत म्हणाला- राजापेक्षा मोठा कोणीही नाही.
त्यावर मुल्ला लगेच उसळून म्हणाला...
होयऽऽ बरोब्बरऽऽ तेच ते.. मी "कोणीही नाही" आहे.
जोपर्यंत "मी कोणीतरी आहे असे वाटत असते तोपर्यंत खरे मोठेपण नाही जेव्हा मी कोणीही नाही असे वाटते तेव्हा मात्र राजाहून मोठेपण सहजच येते."
चलाऽऽ तर मग आपण कोणीही नाही असे रहावे...
माउलींची ओवी आठवली-
येथ जाणीव करी तोचि नेणे ।
आथिलेपण मिरवी तेचि उणे।
आम्ही झालो ऐसे म्हणे ।
तो काहीचि नव्हे ॥
असो...
हॅप्पी गाढव. हॅप्पी नसरुद्दीन.. !!!
Tuesday, January 12, 2010
Thursday, November 19, 2009
मातॄके वो माये
कठीण आहे मास्तर.
मोठेपणाचा सोस आवरणं म्हणजे महाकर्मकठीण.
लहान होता येणं महा कठीण.
आयुष्य अवघं पाण्यावर रेघा ओढत जातं निघून.
अवघ्या अडचणींचं कारण जीभ अन् तिचे चोचले.
हे चोचलेच संपत नाहीत.
गोडानंतर तिखट अन् पुन्हा मग गोड...
चोचल्यांच्या नित्य नूतन मागणीनं वेडावलेला मी सुसाट मनाच्या गाभा-यात शिरलो.
माउलीला म्हणालो. तू संसारश्रांतांची साउली... तूच सांग या चोचल्यांचे काय करू? मी अडाणी प्रापंचिक. तुझ्यासारखा काही योगी नाही आणि पावन मनाचा तर त्याहूनही नाही.
कैवल्यमौक्तिकांचा चारा वेचणा-या परमहंसांची तू जननी.
माझ्यासारख्या कावळ्यांच्या तोंडीसुद्धा दहीभाताची उंडी लावणं तुलाच जमतं. उगाच तुला माउली म्हणत नाही सारे.
माउलींची मुर्ती नेहमीप्रमाणे प्रसन्न आणि आश्वस्त. काहीच बोलली नाही. नुसतीच हसली आणि एका अभंगाची गुणगुण कानावर पडली.
रसने वोरसु मातॄके वो माये । रमणिये माये रमणिये ॥
रसने वोरसु मातॄके वो माये । रामनामामॄत पी जिव्हे ॥
निवॄत्तीदासा प्रिय । जिव्हा मातृके माय रमणिय ॥
मोठेपणाचा सोस आवरणं म्हणजे महाकर्मकठीण.
लहान होता येणं महा कठीण.
आयुष्य अवघं पाण्यावर रेघा ओढत जातं निघून.
अवघ्या अडचणींचं कारण जीभ अन् तिचे चोचले.
हे चोचलेच संपत नाहीत.
गोडानंतर तिखट अन् पुन्हा मग गोड...
चोचल्यांच्या नित्य नूतन मागणीनं वेडावलेला मी सुसाट मनाच्या गाभा-यात शिरलो.
माउलीला म्हणालो. तू संसारश्रांतांची साउली... तूच सांग या चोचल्यांचे काय करू? मी अडाणी प्रापंचिक. तुझ्यासारखा काही योगी नाही आणि पावन मनाचा तर त्याहूनही नाही.
कैवल्यमौक्तिकांचा चारा वेचणा-या परमहंसांची तू जननी.
माझ्यासारख्या कावळ्यांच्या तोंडीसुद्धा दहीभाताची उंडी लावणं तुलाच जमतं. उगाच तुला माउली म्हणत नाही सारे.
माउलींची मुर्ती नेहमीप्रमाणे प्रसन्न आणि आश्वस्त. काहीच बोलली नाही. नुसतीच हसली आणि एका अभंगाची गुणगुण कानावर पडली.
रसने वोरसु मातॄके वो माये । रमणिये माये रमणिये ॥
रसने वोरसु मातॄके वो माये । रामनामामॄत पी जिव्हे ॥
निवॄत्तीदासा प्रिय । जिव्हा मातृके माय रमणिय ॥
Saturday, November 14, 2009
प्रौढत्वी निज शैशवास जपणे
" एवढे ताडमाड वाढलात. पण तुमचं लहानपण काही गेलं नाही. "
प्रातःसमयो तो पातला आणि आमच्या सुब्बालक्ष्मीचा खणखणीत सुप्रभात कानावर कडाडला.
घर आवरता आवरता माझ्या नाकी नऊ येतात पण तुम्हीऽऽ ??? तुम्ही सुधाराल तर शप्पथ... :X
मी म्हणालो.. "हे बऽऽघऽऽ, शपथ हा शब्द मराठी भाषेतला संवेदनशील असा शब्द आहे. हे शपथ सारखे शब्द जरा हळू बोल. आपण सामान्य माणसं. पोरंबाळं आहेत आपल्याला...केशवसुतांच्या तुतारीची परंपरा सांगणारे बोरुकुशलदेखील हा शब्द ऐकून हल्ली टरकतात... आपण आपला सुखेनैव प्रपंच करावा आणि राज्य परिवहन मंडळाच्या एस. टी. प्रमाणे सहनशील असावं."
आंदोलनाचा पवित्राच नेहमी घेणारे आमचे अर्धांग हे ऐकेल तर शप्पथऽऽ ! (जीभ चावतोय.. क्षमस्व)
केशवसुतांच्या तुतारीचा प्राण जरी आजकाल क्षीण होत असला तरी प्रौढत्वी निज शैशवास जपणे या बाण्याचे मात्र मला विस्मरण झाले नाही. पोकळ मानसन्माच्या आणि तकलादु मॉडेस्टीच्या नाटकांमध्ये बालपणीचा सुखाचा काळ हरवून गेला.
लहानपण दे गा देवा..
म्हणत आर्त जागवणारे तुकोबा असं का म्हणतात ते खरोखर जाणवू लागलं.
हे लहानाहून लहान झाल्याशिवाय कसं कळेल?
माउलींची ओवी आठवली.
"तेथ व्युत्पत्ती अवघी विसरिजे । थोरपण जगा सांडिजे । जै जगा धाकुटे होईजे। तया जवळिक माझी ॥"
विद्वत्तेच्या आणि मोठेपणाच्या फाजील कल्पना फेकून देऊन जो जगासमोर धाकुटा झाला त्याला देवाचे सानिध्य लाभते.
वाळूत वेचून आणलेल्या शंख शिंपल्यांची, पोहे खाताना त्यातून वेचून खाल्लेल्या शेंगदाण्यांची, पहली तारीख पर मिळणा-या चॉकलेटपेक्षा चवदार असणा-या लेमन ऑरेंज गोळ्यांची, चिखल उडवत..घसरून धप्पकन्न पडत चिंब झेललेल्या पावसाच्या मौजेची आठवण पुन्हा पुन्हा येत रहाते.
चलो निघतो आता.
हॅप्पी बालपण आणि हॅप्पी बाल दिन"..
जाता जाता रहावत नाही म्हणून सांगतो..
आंदोलनं करताना आपण फेकलेला दगड सहन करणारी एस. टी. सर्व ठिकाणी असेल असं नाही.
मुठीत गोळ्याबिस्कीटांची दौलत घेऊन जाणारे बाळगोपाळ त्याच चिमुकल्या मुठीत त्यांचा इवलासा जीव घेऊन शाळेपर्यंतचा प्रवास करत असतात.
चलो सी. या.
Sunday, October 25, 2009
इंटेलेक्चुअल लाईफची पॅराडॉक्सिकल डेस्टिनी
थो.प.त.(थोर्थोर पर्यावरण तज्ञ) अंतूकाकांच्या घरचा फराळ माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा. :)
शुद्ध तुपाचं लेणं घेऊन येणारा एकेक लाडू असा चीनच्या विस्तारासारखा.
त्यावर तिबेट आणि तैवानसारखे सुक्यामेव्याचे तुकडे.
हा लाडू तोंडात "माओ अथवा न माओ", मी मात्र फराळासाठी पाच सहा किलोमीटर चा "लॉंग मार्च" करून जात असतो.
अंतूकाका घरीच भेटले.
येणारा काळ हा मानवजातीसाठी कसा असेल या विवंचनेने अंतूकाकांचा मुखचंद्रमा मलूल झाला होता.
काकूंना मात्र यातले काही कळत नाही.
आल्यागेल्यांचं आतिथ्य करावं, पोराबाळांच्या सुखी संसाराच्या बातमीनं भरून पावावं, दरवर्षी फक्त दीवाळीच्या सुट्ट्य़ांमधे भेटायला येणारी चिमणी पाखरं !
त्या नातवंडांच्या आठवणींचं गोकुळ आणि परत नव्या सुट्टीची वाट पहाणं यात या माउलीचं कालक्रमण होत असतं..
"दीवाळीच्या सुट्टीतच भेटायला येतात रे.
उन्हाळ्यात येवू शकत नाहीत कारण कुठंतरी ट्रीपला जातात.
पुन्हा वर्षभर त्यांची वाट पहायची ...
आणि यांचं काहीतरी जगावेगळंच असतं...
यंदा दीवाळीत नवीनच खुळ..
नातवांना म्हणाले की फटाके आणायला नकोत.
पर्यावरण बिघडतं म्हणे त्यामुळं.
मुलं हिरमुसली होवून गेली.
मीच सुबोधला म्हणाले, जा घेऊन ये त्यांच्यासाठी फटाके.
मी समजावेन ह्यांना.. "
काकू म्हणजे अंतूकाकांच्या इंटेलेक्चुअल लाईफची पॅराडॉक्सिकल डेस्टिनी आहेत.
त्यांना अंतूकाकांचा वैचारिक दॄष्टीकोन उमजत नाही. :O
एक मात्र खरं की या काकूंच्या हातचा फराळ अमॄतातेही पैजा जिंके असा..
अंतूकाकांच्या पर्यावरणाच्या लंब्याचौड्या बाता ऐकत ऐकत मी काकूंनी दिलेला फराळ संपवला आणि निरोप घेतला.
हॅप्पी पर्यावरण !
Subscribe to:
Posts (Atom)