एकदा असं झालं...
अतिप्राच्यवस्तू खरेदी विक्री केंद्रात (अज्ञ जीव त्याला भंगाराच्या दुकानात,असा शब्द देखील वापरतात) काही कलात्मक पहावयास मिळते का हे पहावे म्हणून मी गेलो.
तिथं एक सुंदर दिवा पाहिला.
घरात येणारे पाहुणे माझ्या कलात्मक दॄष्टीकोनाचे कौतुक करतात.
पण मी मॉडेस्टी सोडत नाही. मी कुटुंबाकडे बोट दाखवतो..म्हणतो हे सर्व श्रेय़ आमच्या अर्धांगाचे!!! असो..
कुटुंबाच्या मुखातून कौतुकाचे आणि दुर्मिळ असे चार शब्द कानावर पडावे हा एक उदात्त हेतु.
संसार म्हणजे कसा डाय़लॉग हवा, मोनोलॉग नसावा... असा आमच्या मनाचा प्रांजळ मोनोलॉग आहे. पण असो...
तो दिवा मी घरी आणला.
घरी आल्या आल्या मी तो स्वच्छ करावयास घेतला.
कुटुंबाच्या एका "प्रेमळ दॄष्टीसाठी" आम्ही तो दिवा स्वच्छ करावयास घेतला.
कदाचित् आपत्कालेषुsssss आमच्या भांडी घासणा-या काकू आल्या नाहीत की त्यांची उणीव मी आमच्या संसाराला कधीच भासू देत नाही.
"वर्षाव पडो" भांड्याचा, एक क्षण पुरे प्रेमाचा.." अशी एक स्वगत कविता ती भांडी घासताना आम्हाला सुचली होती. असो..
मुख्य मुद्याकडे वळतो. दिवा घासल्याबरोबर त्यातून एक आक्राळविक्राळ देह विकट हास्य करीत प्रकट झाला.
हुकूम मेरे आकाऽऽऽऽ. त्याचा आवाज आसमंतात गरजला ..
मी त्याला फरमान सोडले "जावऽऽ स्वयपाकघर के कट्टेपर जितने भांडे है वो धुउन पुसून जागचे जागी रख दो."
पुढच्या क्षणी तो हे सर्व आटोपून हजर..
म्हणाला हुजूरऽऽ कुछ और हुक्म?
मी त्याला म्हणालो, जाव पोटमें कावळे कोकल रहे हैं, कुछ खानेको लावऽऽ (आमचे खाण्यावर प्रेम) ..
पुढच्या क्षणी जिन्न हातात मॅक्डॊनाल्ड चे पार्सल घेवून हजर. आय ऍम लव्हींग इट ( हे वाक्य एरवी कुटुंबासमोर म्हणताना सुद्धा माझी फॅ फॅ उडते ).. पर जमाना बदल रहा है..
मला त्या जिन च्या मल्टी-टास्कींग चे हसू आले.
मी त्याला विचारलं, "तू इतकं मल्टी-टास्कींग कसं करू शकतोस?"॥ किंबहुना त्यामुळंच तू जिन्न झाला असशील।
एरवी अक्राळ विक्राळ भासणारा जिन्न रडवेला झाला.
कातर आवाजात मला म्हणाला.. " माझी बायको मानसशास्त्राची प्राध्यापिका होती.. तिच्य़ा टॅलेंटचं मला कौतुक भारी..
ती मला नेहेमी म्हणायची, " संसार म्हणजे मोनोलॉग नको, डायलॉग हवा.
तिच्या या शब्दाला होकाराची मान हलवत हलवत तो पुन्हा कधी मोनोलॉग झाला हे मला कळलंच नाही...
फक्त मी बोलायचो तेही स्वगत...
लग्नाच्या वाढदिवशी एकदा तिच्यासाठी गजरा आणि पैठणी घेवून आलो. ती कॉलेजातून परत येण्याआधी घर मस्त फुलांनी सजवलं.."
मी जिन्न ला म्हणालो "त्यात काय अवघड. तू ते क्षणार्धात् केलं असणार... तू बोलून चालून जिन्न" ..
तो माझ्या अज्ञानाला वैतागून म्हणाला.." नाहीऽऽ आकाऽऽ [:x}तेव्हा मी जिन्न झालो नव्हतो, जीवंत होतो.. उगाच माझं बोलणं तोडू नका".
तर झालं असं की लग्नाच्या वाढदिवशी मी गजरा आणि पैठणी घेवून आलो.
ती घरी परत येण्यापूर्वी मी सारं घर फुलांनी सजवलं.
डायनिंग टेबलवर कॅंडल-लाईट ची तयारी केली.
ती घरात आली .. मी केलेल्या सा-या तयारीकडे तिने एक कटाक्ष टाकला.
म्हणाली तुझं मल्टी-टास्कींग हल्ली वाढत चाल्लंय.. दाखवून घे कुणाला तरी.."
घराच्या गॅलरीत गेलो..
आफाट पसरलेल्या आभाळाकडे नजर टाकली. पडणा-या ता-याकडे पाहून म्हणालो "देवा, या पढतमूर्खांच्या संगतीतून सोडव. अगदी भूत झालो तरी चालेल पण जिन्न बनव, कुणाला उपयोगी तरी पडू शकेन"..
आपला मोनोलॉग ऐकवून जिन्न केव्हा दिव्यात निघून गेला हे कळलंच नाही.
माझ्या पण डोळ्याच्या कडा नकळत पाणावल्या..
No comments:
Post a Comment