Friday, July 16, 2010

हॅप्पी वारी !

आधी होता पाग्या | 
दैवयोगे त्याचा झाला वाघ्या |
त्याचा येळकोट राहीना | 
अन मुळ स्वभाव जाईना ||

खरंच आमचा येळकोट जाणार कधी ?
काळजी पडली ना बाप्पा !!!!!

तुकोबांनी अवघ्या जणांना उपदेश केला होता -
काया ही पंढरी , आत्मा हा विठ्ठल !

सात पाच तीन दशकांचा मेळा घेऊन चित्तवृत्तीचे प्रस्थान आत्मराजाकडे कधी हो होणार ???

आमची दिंडी अशी निघाली कि
जीभ आडवी येते ...

रसना जिंकली त्याने सर्व जग हो जिंकले .. 
पण आमचा येळकोट राहीना ...
मुळ स्वभाव जाईना !

खरंच या जिभेने घात केला आमचा !

हृदय देशी " सावळा सकंकणु बाहो पसरुनी वाट पहातो ! "
पण आमचा जीव क्षेमालागी उतावीळ नाही !!!!!
कारण एकच - चोचल्यांना चटावलेली जीभ !

साधू संतांनी या जिभेला किती समजाऊन सांगितलंय !

जिव्हे सदैवं भज सुंदराणि !
नामानि कृष्णस्य मनोहराणि ...
समस्त भक्तार्ती विनाशाणानी !
गोविंद दामोदर माधवेति !!!

सप्तधातूंनी आणि पंचाकोशांनी बनलेला हा त्रिगुणाचा वारकरी दशेंद्रीयांना घेऊन आत्मराजाच्या दर्शनाला निघाला ....
सात पाच तीन दशकांचा मेळा !
विठोबा तेथ वाट पाहे ...
हे जिव्हे , हे रसने ... हे मातृकेच्या माये .. तू पण हो या दिंडीत सामील !

खरंतर जीभ पण काही सामान्य नाही .
आमचे तुकोबा म्हणतात -
जिव्हा जाणे फिके मधुर क्षार | 
येर मास परि हातासि नकळे ||

जीभ आणि हात एकाच मांसाचे बनलेले आहेत ...
पण भल्या मोठ्या हाताला रसाची ओळख नाही ! 
पण बत्तीस दातांनी वेढलेल्या जिभेला मात्र मधूर , खारट आणि फिके कळते !

मन बुद्धीसह अहंकाराचे स्फुरण | श्वासांचा उगम जेथोनि रे ||
जाईन मी प्रेमे , तिथे माय माझी | भक्तजन वत्सल विठू माई ||
चित्तवृत्ती होवू दे , सरळ निर्मळ | परपीडा गरळ , टाकी वेगी ||
जिव्हेचे रमण रामरंगी होवो | स्मरण जनार्दनाचे सर्वकाळ || 


चला निघतो आता !

पुंडलिक वरदे हरी विठ्ठल | श्री ज्ञानदेव तुकाराम || 
पंढरीनाथ महाराज कि जय !!!!

हॅप्पी वारी!!!

Wednesday, February 17, 2010

डब्बा

प्रचंड खर्च होवूनही अमूक येका निर्मात्याचा चित्रपट डब्ब्यात गेला असा शब्दप्रयोग करणे समयोचित नव्हते..
त्यास यथायोग्य कारण असे की डब्बा ही कोणीही जिव्हा उचलून तालुकेस स्पर्श करावा अशी भौतिक वस्तू अजिबाऽऽऽऽऽत नाही असे आमचे ठाम मत आहे!!!!!!!!!!

डब्बा हा स्थूलरुपाने एक धातूजन्य आकार जरी असला तरी त्याच्याबरोबर अनेक जीवांचे भावबंध जोडलेले असतात!!!

डब्बा ऐनवेळी न सापडल्यामुळे अनेक अनर्थ प्रातःसमयी ग्रामीण जीवनात घडतात असे ऐकून आहे..असोऽऽऽ!
येक मात्र सोळा आणे सत्य की डब्बा ही काही सामान्य वस्तू नव्हे.

महाजालावरील समस्त प्रज्ञावंतांच्या निदर्शनास मी नम्रपणे आणू इच्छितो, की आंग्लदेशीचे युवराज भारतभेटीवर आले असताना त्यांनी "डब्बेवाल्यास" व्यवस्थापनविश्वाचे वैश्विक आश्चर्य असे संबोधले होते!
त्यास कारण तो डब्बा सामान्य डब्बा नव्हता..
तो आहे"खाण्याचा" डब्बा.

लहानपणी शाळेच्या दप्तरातील एक महत्वाचा घटक म्हणजे खाउचा डब्बा!
कुणाच्या डब्ब्यात काय आहे हे निरागसपणे पहात शाळांमधून बाळगोपाळांच्या झडणा-या पंगती हा कालत्रयातीत असणारा चिरंतन प्रकार आहे. कधीकाळी या डब्ब्यांनी भाजीपोळी असायची तिथं आता जास्त ब्रेडचे प्रकार किंवा सॅंडविचेस दिसतात पण शेअर करुन खाण्याची वॄत्ती हे बालपणाचे खरे वैभव आहे.हे कदाचित कधीच नाहिसे होणार नाही.

डब्बा हा एकट्याने खाण्याचा प्रकार मुळीच नसतो असे सखोल चिंतनानंतर मला उमजले.
जातिवंत आणि अभिजात सुवर्णकारांच्या डबीशी डबा तुलना करून पहाण्यासारखा आहे.
दोन्हींमध्ये कलावंतांची कलाकुसर पहावयास मिळते.

थोडेफार गांभीर्याने मी डब्ब्यावर चिंतन केले.
ते यासाठी की आमचे खटले {सहधर्मचारिणीस मराठवाड्यात केला जाणारा शब्दप्रयोग} आमच्या लघूसंगणकास { आंग्लभाषेत लॅप्टॉप} डब्बा असे म्हणत असल्यामुळे मी हे चिंतन करण्यास प्रवॄत्त झालो.

डब्बा हा खरोखर इतका निषेधास आणि उपरोधास पात्र आहे का असा गहन प्रश्न मला पडला आणि मी "डबडबलेल्या" नयनांनी डब्बा हा विषय चिंतनासाठी घेतला.

विनोदी नट मेहमूदने कुठल्यातरी चित्रपटात

"खाली डब्बा खाली बोतल, लेले मेरे यार, खाली से मत नफरत करनाखाली सब संसार! "

असे चिंतनास पुरवलेले खाद्य स्मॄतीच्या डब्ब्यात कोप-यात होते ते अचानक या निमित्तने वर आले.

जीवशास्त्र शिकवत असताना मला अपरिहार्यपणे मेंदू आणि ह्रदय हे दोन अवयव शिकवावे लागतात.
मेंदू "ब्रेन बॉक्स" नावाच्या डब्ब्यात असतो तर ह्रदयात शाळेतील खाऊच्या डब्ब्याप्रमाणे चार कप्पे असतात असे जाणवले.
खरेच डब्बा ही सामान्य गोष्टच नव्हे!

बालपणीचा काळ सुखाचा असे म्हणतात.
त्या वयात डब्बा म्हणजे बचतीचे बाळकडू होते.
त्यात पैसे साठवून मोठ्ठं व्हावं असं वाटायचं.
पण मोठेपण हे त्या पोकळ डब्ब्याप्रमाणं असतं, आत पैसा खुळखुळला की विवेकाचा डब्बा रिकामा होतो असं कळतंय पण वळत नाही! असोऽऽऽऽऽ...फक्त एक डब्बा माणसाला कूठल्या कुठे घेऊन जातो. चिंतनाचा हा प्रवाह कूठे कुठेऽऽऽ?? असो...

बाकी चित्रपट व्यवसायास " डब्बा कार्यालय" आंग्लभाषेत "बॉक्स ऑफिस" असे म्हणतात.
सार हे की डब्ब्यास सामान्य समजू नये!!!!!!!!!!!!

माझ्यासारख्या उदयोन्मुख साहित्यिकाच्या अभिजात रचनांना कित्येक संपादकांनी अक्षरशः डब्ब्यात टाकले.
"डब-डबलेल्या" नयनांनी मी कुटूम्बास काल म्हणालो की "पहा आमच्या लघूसंगणकास आपण डब्बा म्हणून हिणविता हे खरे पण या डब्ब्यामुळे हे साहित्य मी रसिकांपर्यंत पोहोचवत आहे!"

काहीही असो "गृहलक्ष्मीच्या हातचे(पदार्थ) खाताना, मला साहित्य स्फुरण होवू लागते.
कार्यालयात बसून दूपारचा डब्बा खात खात, कित्तीऽऽऽऽऽऽऽ कित्तीऽऽऽऽऽऽऽऽऽ लिहू असं होवून जातं!

भातातील स्पॅम्स विसरून जावे, पुन्हा चवीने खावे, जीवन-खाणे खातच जावे, असे एक विचारप्रवर्तक काव्य सध्या सूचत असल्यामुळे मी माझ्या कार्यालयात रोजचा डब्बा संपवून त्या काव्यनिर्मीतीचा आनंद घेणे ठरविले आहे.. हॅप्पी डब्बा.. ...
C ya..

Monday, February 1, 2010

कुणी पुरस्कार देता का पुरस्कार ???

क्या इतना बुरा हुं मै मेरी मां ...
मेरी मां...
मेरी मां... ???

कातर आवाजात आणि जड अंतःकरणाने मी आईस प्रश्न केला !

जीवनावर शतदा प्रेम करणं म्हणजे काय गुन्हा आहे काय ?
माझ्यासारखा आनंदयात्री या हौसिंग सोसायटी च्या पदाधिका-यांना अजून दिसू नये ?
मी गावाला काय गेलो आणि इकडे या लोकांनी पुरस्कार वाटून पैसे संपवले???

तसे माझे आकाशस्थ ग्रहगोलांपासून ते गवताच्या पात्यावर प्रेम.
एकदा असे झाले ...

फुले कळ्यांना पाहून कशी लाजतात आणि त्यांच्यावर त्यांचे हळवे प्रेम कसे आहे यावर स्वतःच्या वहीत भावगर्भ असे लिहित असताना आमचे गणिताचे फुले मास्तर आले आणि आमच्यावर शारीरिक अंगाने शिस्तीची कडक कारवाई केली. अश्याच काही घोर नतदृष्ट अरसिक हितशत्रुंमुळे दुर्दैवाने महाराष्ट्र एका थोरथोर साहित्यिकाला मुकला हे मात्र आवर्जून नमूद करावे लागेल. (तो थोर साहित्यिक म्हणजे मी आहे हे ओघाने आलेच परंतु हे माझ्या विनयशील स्वभावास अनुसरून मी हे कंसात लिहिले आहे.)

सहजीवनास तब्बल एक तप उलटले असतानादेखील कुटुंबाने कधीच एखादा नयन-कटाक्ष पुरस्कार अथवा एखादा " इश्य " पुरस्कार तरी द्यावा परंतु छेछेछे .. आमचे अर्धांग सुद्धा अरसिक आणि करारी बाण्याचे.
आम्ही आमच्या जीवाचे डोळे करून वाट पहातो पण हातात येतात किराणामालाच्या पिशव्या !!!

साखर , तुरडाळ , दुध इत्यादी वस्तूंचे भाव ऐकून आमच्या तरल कर्पुरीत काव्यभावनेचे त्वरित संप्लवन होवून जाते पण असो..

लहान असताना मी एकदा आईला मी विचारलं होतं, आई गं तू राब राबतेस, कष्ट सोसतेस , रोज एवढं छान छान खाऊ घालतेस ...
तुला कधी पुरस्कार हवा वाटतो का गं ?

आई सोज्वळ हसली ! अगदी सात्विक सात्विक म्हणतात तशीच हसली !!!
आणि म्हणाली देवबाप्पानं दिलाय की पुरस्कार...
माझ्या घराच्या वृंदावनाला अक्षय सौभाग्याचं लेणं आहे. बाजूला अंगणात तुम्हा चिमण्यान्चा चिवचिवाट आहे.
अजून काय हवं ?

माझी आई खरोखर आनंदयात्री आहे.
खोटी खोटी नाही !!!

Tuesday, January 12, 2010

मी बिचारा आणि माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य..

प्रसंगी क्रांतीकारी विचारांनी पेटलेला, महाराष्ट्राचा तमाम युवा कार्यकर्ता वर्ग रचनात्मक असे काही करू लागेल..
अथवा येखादे समयी पाकिस्तानात अथवा स्वात खो-यात झरदारीदादा अर्धोन्मिलीत नेत्रांनी शांतीच्या शोधात जातील..
अथवा मुशर्रफकाका झेन कथांवर व्याख्याने देतील....
प्रसंगी साखरेचे आणि तुरीचे भाव प्रचंड घसरतील....
शक्य आहे की देशाचा कानाकोपरा वीजेने उजळून निघेल...
कदाचित तब्बल दोन महिने मुंबईवर ढग प्रचंड पाऊस पाडत रहातील...
परंतु आमचे कुटुंंब सुधारेल तर शप्पथ!

तर प्रसंग असा बाका की आमच्या नेहमीच्या स्वभावास अनुसरून आम्ही स्वगत व्यक्त करत होतो.

आम्ही प्रचंड निर्भीड आहोत हे जरी त्रिवार सत्य असले तरीही कुटुंबकबीलेवाले आहोत.
आमची जीभ सुद्धा फक्त खाण्यासाठी नाही तर "ब्र" म्हणण्यासाठी कधीकधी पुढे येत असते.
तथापि कोणाला तरी प्रत्यक्ष बोलावे अथवा त्याचे प्रबोधन किंवा उद्बोधन करावे असा बाणेदार विचार डोक्यात येतो न येतो तोपर्यंत आमच्या औकातीचे आम्हास तीव्र स्मरण होते आणि कसेबसे हसून आम्ही चिंतनात मग्न होवून जातो.

प्रचंड महागाईच्या काळातसुद्धा नमनलाच घडाभर तेल ओतण्याचे कारण एक की आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असूनसुद्धा आम्ही स्वगतावर भागवत असतो.

लोक नीट सांगितलेले ऐकत नाहीत म्हणून मुल्ला नसरूद्दीन गाढवाशी बोलायचा.

आम्ही मात्र स्वतःशीच बोलत असतो.
येकूण येक तेच ते. गाढवाचा एक विशेष गुण असा की ते विनातक्रार जगतं.
आम्हाला पण कोणाविषयीच कसलीच तक्रार नाही.
फक्त स्वतःशी बोलत असलो की कुटुंब भडकते.

येखाद्या दुष्ट ग्रहाची दशमस्थानी तेवढी वक्री नजर नसेल,जेवढी आमच्या कुटुंबाची आमच्या खाण्यावर आणि बोलण्यावर म्हणजेच जीभेवर असते.

या तमाम लेखनप्रपंचाचा गोषवारा असा की आम्हाला स्वतःसोबत बोलण्यापुरतेसुद्धा अभिव्यक्तिस्वातंत्र्य उरले नाही.
खरंच "मी" कोणीही नाही..
फक्त एक गॄहीतक..

एका मित्राने ऐकवलेली गोष्ट आठवली.
एकदा मुल्ला नसरुद्दीन त्याच्या गाढवाबरोबर राजवाड्यात गेला आणि सरळ सिंहासनावर बसला.
राजसिंहासनावर बसलेला मुल्ला पाहून पहारेकरी चमकला.
तो मनाशीच म्हणाला कदाचित्‌ हा खूप मोठा किंवा राजाच्या मर्जीतला असला पाहिजे.

त्याने मुल्लास नम्रतेने सवाल केला ..
आपण कोणीतरी मोठी हस्ती दिसता.
त्यावर मुल्लाने मान हलवली.- होय़.. आहे.. मी मोठाच आहे.

पहारेकरी- म्हणजे कोण सेनापती का?
मुल्ला- नाही त्याहून मोठा आहे मी.
पहारेकरी- मग तुम्ही प्रधान असणार..
मुल्ला- नाही.. त्याहून मोठा!
पहारेकरी- मग तुम्ही राजे आहात? वेष बदलून आलेले???
मुल्ला- नाही. मी त्याहून मोठा आहे.

पहारेकरी यावर हसत हसत म्हणाला- राजापेक्षा मोठा कोणीही नाही.

त्यावर मुल्ला लगेच उसळून म्हणाला...
होयऽऽ बरोब्बरऽऽ तेच ते.. मी "कोणीही नाही" आहे.

जोपर्यंत "मी कोणीतरी आहे असे वाटत असते तोपर्यंत खरे मोठेपण नाही जेव्हा मी कोणीही नाही असे वाटते तेव्हा मात्र राजाहून मोठेपण सहजच येते."

चलाऽऽ तर मग आपण कोणीही नाही असे रहावे...

माउलींची ओवी आठवली-

येथ जाणीव करी तोचि नेणे ।
आथिलेपण मिरवी तेचि उणे।
आम्ही झालो ऐसे म्हणे ।
तो काहीचि नव्हे ॥

असो...
हॅप्पी गाढव. हॅप्पी नसरुद्दीन.. !!!