Thursday, November 19, 2009

मातॄके वो माये

कठीण आहे मास्तर.
मोठेपणाचा सोस आवरणं म्हणजे महाकर्मकठीण.
लहान होता येणं महा कठीण.
आयुष्य अवघं पाण्यावर रेघा ओढत जातं निघून.
अवघ्या अडचणींचं कारण जीभ अन्‌ तिचे चोचले.
हे चोचलेच संपत नाहीत.

गोडानंतर तिखट अन्‌ पुन्हा मग गोड...
चोचल्यांच्या नित्य नूतन मागणीनं वेडावलेला मी सुसाट मनाच्या गाभा-यात शिरलो.

माउलीला म्हणालो. तू संसारश्रांतांची साउली... तूच सांग या चोचल्यांचे काय करू? मी अडाणी प्रापंचिक. तुझ्यासारखा काही योगी नाही आणि पावन मनाचा तर त्याहूनही नाही.
कैवल्यमौक्तिकांचा चारा वेचणा-या परमहंसांची तू जननी.
माझ्यासारख्या कावळ्यांच्या तोंडीसुद्धा दहीभाताची उंडी लावणं तुलाच जमतं. उगाच तुला माउली म्हणत नाही सारे.

माउलींची मुर्ती नेहमीप्रमाणे प्रसन्न आणि आश्वस्त. काहीच बोलली नाही. नुसतीच हसली आणि एका अभंगाची गुणगुण कानावर पडली.

रसने वोरसु मातॄके वो माये । रमणिये माये रमणिये ॥
रसने वोरसु मातॄके वो माये । रामनामामॄत पी जिव्हे ॥
निवॄत्तीदासा प्रिय । जिव्हा मातृके माय रमणिय ॥

Saturday, November 14, 2009

प्रौढत्वी निज शैशवास जपणे

" एवढे ताडमाड वाढलात. पण तुमचं लहानपण काही गेलं नाही. "
प्रातःसमयो तो पातला आणि आमच्या सुब्बालक्ष्मीचा खणखणीत सुप्रभात कानावर कडाडला.

घर आवरता आवरता माझ्या नाकी नऊ येतात पण तुम्हीऽऽ ??? तुम्ही सुधाराल तर शप्पथ... :X

मी म्हणालो.. "हे बऽऽघऽऽ, शपथ हा शब्द मराठी भाषेतला संवेदनशील असा शब्द आहे. हे शपथ सारखे शब्द जरा हळू बोल. आपण सामान्य माणसं. पोरंबाळं आहेत आपल्याला...केशवसुतांच्या तुतारीची परंपरा सांगणारे बोरुकुशलदेखील हा शब्द ऐकून हल्ली टरकतात... आपण आपला सुखेनैव प्रपंच करावा आणि राज्य परिवहन मंडळाच्या एस. टी. प्रमाणे सहनशील असावं."

आंदोलनाचा पवित्राच नेहमी घेणारे आमचे अर्धांग हे ऐकेल तर शप्पथऽऽ ! (जीभ चावतोय.. क्षमस्व)

केशवसुतांच्या तुतारीचा प्राण जरी आजकाल क्षीण होत असला तरी प्रौढत्वी निज शैशवास जपणे या बाण्याचे मात्र मला विस्मरण झाले नाही. पोकळ मानसन्माच्या आणि तकलादु मॉडेस्टीच्या नाटकांमध्ये बालपणीचा सुखाचा काळ हरवून गेला.

लहानपण दे गा देवा..
म्हणत आर्त जागवणारे तुकोबा असं का म्हणतात ते खरोखर जाणवू लागलं.
हे लहानाहून लहान झाल्याशिवाय कसं कळेल?

माउलींची ओवी आठवली.
"तेथ व्युत्पत्ती अवघी विसरिजे । थोरपण जगा सांडिजे । जै जगा धाकुटे होईजे। तया जवळिक माझी ॥"
विद्वत्तेच्या आणि मोठेपणाच्या फाजील कल्पना फेकून देऊन जो जगासमोर धाकुटा झाला त्याला देवाचे सानिध्य लाभते.

वाळूत वेचून आणलेल्या शंख शिंपल्यांची, पोहे खाताना त्यातून वेचून खाल्लेल्या शेंगदाण्यांची, पहली तारीख पर मिळणा-या चॉकलेटपेक्षा चवदार असणा-या लेमन ऑरेंज गोळ्यांची, चिखल उडवत..घसरून धप्पकन्न पडत चिंब झेललेल्या पावसाच्या मौजेची आठवण पुन्हा पुन्हा येत रहाते.

चलो निघतो आता.
हॅप्पी बालपण आणि हॅप्पी बाल दिन"..

जाता जाता रहावत नाही म्हणून सांगतो..

आंदोलनं करताना आपण फेकलेला दगड सहन करणारी एस. टी. सर्व ठिकाणी असेल असं नाही.
मुठीत गोळ्याबिस्कीटांची दौलत घेऊन जाणारे बाळगोपाळ त्याच चिमुकल्या मुठीत त्यांचा इवलासा जीव घेऊन शाळेपर्यंतचा प्रवास करत असतात.
चलो सी. या.

Sunday, October 25, 2009

इंटेलेक्चुअल लाईफची पॅराडॉक्सिकल डेस्टिनी

थो.प.त.(थोर्थोर पर्यावरण तज्ञ) अंतूकाकांच्या घरचा फराळ माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा. :)
शुद्ध तुपाचं लेणं घेऊन येणारा एकेक लाडू असा चीनच्या विस्तारासारखा.
त्यावर तिबेट आणि तैवानसारखे सुक्यामेव्याचे तुकडे.
हा लाडू तोंडात "माओ अथवा न माओ", मी मात्र फराळासाठी पाच सहा किलोमीटर चा "लॉंग मार्च" करून जात असतो.

अंतूकाका घरीच भेटले.
येणारा काळ हा मानवजातीसाठी कसा असेल या विवंचनेने अंतूकाकांचा मुखचंद्रमा मलूल झाला होता.

काकूंना मात्र यातले काही कळत नाही.
आल्यागेल्यांचं आतिथ्य करावं, पोराबाळांच्या सुखी संसाराच्या बातमीनं भरून पावावं, दरवर्षी फक्त दीवाळीच्या सुट्‍ट्य़ांमधे भेटायला येणारी चिमणी पाखरं !
त्या नातवंडांच्या आठवणींचं गोकुळ आणि परत नव्या सुट्‍टीची वाट पहाणं यात या माउलीचं कालक्रमण होत असतं..

"दीवाळीच्या सुट्‍टीतच भेटायला येतात रे.
उन्हाळ्यात येवू शकत नाहीत कारण कुठंतरी ट्रीपला जातात.
पुन्हा वर्षभर त्यांची वाट पहायची ...
आणि यांचं काहीतरी जगावेगळंच असतं...
यंदा दीवाळीत नवीनच खुळ..
नातवांना म्हणाले की फटाके आणायला नकोत.
पर्यावरण बिघडतं म्हणे त्यामुळं.
मुलं हिरमुसली होवून गेली.
मीच सुबोधला म्हणाले, जा घेऊन ये त्यांच्यासाठी फटाके.
मी समजावेन ह्यांना.. "

काकू म्हणजे अंतूकाकांच्या इंटेलेक्चुअल लाईफची पॅराडॉक्सिकल डेस्टिनी आहेत.
त्यांना अंतूकाकांचा वैचारिक दॄष्टीकोन उमजत नाही. :O

एक मात्र खरं की या काकूंच्या हातचा फराळ अमॄतातेही पैजा जिंके असा..
अंतूकाकांच्या पर्यावरणाच्या लंब्याचौड्‍या बाता ऐकत ऐकत मी काकूंनी दिलेला फराळ संपवला आणि निरोप घेतला.
हॅप्पी पर्यावरण !

Thursday, October 15, 2009

ओबामा लाईटेड ऑईल लॅम्प्स

माझ्या जीवनातील फर्स्ट आणि लास्ट लेडीसमोर मी अत्यंत पडिक चेहरा करून म्हणालो.
तुला अमेरिकेची फर्स्ट लेडी कोण हे ठाऊक आहे का? :)
कुटुंब कडाडले, "कधी लातूरच्या बाहेर नेऊन माहीत आहे का?" :X
मी मक्ख्ख चेहरा करून म्हणालो.. "तसं नाही गं!"
आपल्या मिशेल वहिनी आहेत नं, ओबामाच्या मंडळीऽऽऽ... त्यांनी किनई ओबामाभाऊला दिलेला फराळ दीडशे जणांना व्हाईट हाऊसात वाटला म्हणे !
"तुम्ही बातम्या सुद्धा फराळाच्याच वाचा फक्त"। :X
ओबामा लाईटेड ऑईल लॅम्प्स असे वाचले आणि धन्य झालो.
चला ओबामाभाऊ ने "तेलाचे दिवे लावले एकदाचे !"
आखाताच्या तेलाचा दिवा आजवर या व्हाईट हाऊसच्या काळोखाला उजळत आलाय.

ओबामाभाऊने आता दीवाळीनिमित्ताने एक करावे ...
दिवाळीत आता फटाके आफगाणिस्तान आणि इतर ठिकाणी वाजवायचे सोडून पाकिस्तानात वाजवावे.
आणि महत्वाचे म्हणजे ते "चीनी फटाके " नसावेत.
असो.. निघतो आताऽऽ
हॅप्पी ओबामा॥ हॅप्पी व्हाईट हाऊस आणि हॅप्पी दीवाळी !!! :)

Wednesday, October 14, 2009

मोहीम - फराळ २००९

आता गडावर आमचा हककानु चालणार नाही हे मनी समजोन आम्ही प्रपंचात गुमान रुजू आहोत. :(((
परि झगडियात उगाच गनिमासी भिडणे होवो नये ऐसा विचार मनासीच करोन गुमान राहणे. :|
आम्हासिवाय का कोणी विवाह नाही केला काय ??? :O
कैसे त्यांचे घरधनीणीचे सलगी देणे !!!! >>>>:)<<<<<
कैसे मीठे मीठे बोलणे !!!! >:)<
पण अफसोस...
आम्हास त्यांचा हेवा वाटतो।

आमचा गनिम म्हणिजे आमचे खटले...
कधी आमच्या चवदा वरुषांचे इमानदारीस, पाईकगिरीस अथवा चाकरीस स्मरण करून गनिम एक लफ्ज सीधा बोलत नाही. असोऽऽ


तैसीयात हा सणासुदीचा काळ..
आपले चाकरास गुबारून गोमटे गोमटे येक दोन फराळाचे पदार्थ द्यावे अन्‌ नाचीज जिंदगीभरचा गुलाम करोन ठेवावा ऐसे मनी बहोत वाटते. पण अफसोसऽऽऽऽ

एक बहुतही खास चीज माणसला नियतीने दिली आहे.
ती म्हणजे नींद..
गनिमास नींद येताच सैपाकगडावर मोहीम आहे.
मग सरनौबत, बारगीर, शिलेदार, जुमलेदार आणिक सुभेदार अवघियांना चकवा देऊन लूट करणार आहोत.
अलबत्‌ सी या.. हॅप्पी मोहीम..

Friday, October 9, 2009

फराळ् २००९

एकवार डब्ब्यामधुनि फिरो तुझा हात :)
शेवटचा तो लाडू मजला देई तू प्लेटात :) :) :)

असा भावपूर्ण स्वर लागला होता की काय सांगावं :)

परि व्यर्थ मास्तरऽऽऽ व्यर्थ ... (स्वगत)
खटले कडाडले - खबरदार जर टाच मारुनी याल पुढे...
हा फराळ बनवून संपेपर्यंत इथे पाऊल टाकायचे नाही :। बाहेर व्हा सैपाकघरातून आधीऽऽऽऽऽऽ... :।

असोऽऽऽ
संयम आणि समजूतदारी यामुळेच आजवर आमच्या गृहस्थजीवनाची युती टिकुन आहे .... :)
युती म्हणा अथवा आघाडी...
श्रेष्टींचा (पक्षी- अर्धांग) शब्द मी झेलत असतो...
त्यामुळे पक्षात थोडीतरी किंमत आहे....
काय करणार ??
मजबूरी का नाम ...... :)
असोऽऽऽ
बंडखोरीची भाषा करायचे मनात येते हो कधी कधीऽऽऽ पण
मग खायला मिळणार नाही... :)
म्हणून टोकाची भूमिका घेऊन कसे चालेल ?
चला निघतो आता ...
रात्री गुपचुप डब्यावर डल्ला मारायचा आहे।
चला निघतो आता .... :) :) :)
हॅप्पी डल्ला ऽऽऽ ! सी या।

Monday, September 21, 2009

लोकसेवेचं व्रत

Bold

दोन ठिकाणं अशी आहेत की जिथं माणसानं लाज गुंडाळून ठेवावी.
एक डॉक्टर कडे गेल्यावर आणि दुसरे देवाचे नाम गाताना.

तुका लाज सांडोनि नाचे किर्तनी.. हेच कळाले नाही तर मराठदेशाची ओळख कशी होणार भाऊ?

या लिस्ट मध्ये एक नांव अजून येणे आहे.
माणसाने रोगोपचार करून घेताना आणि किर्तनात लज्जा बाळगू नये हे तर खरेच
पण ऽऽऽ होय बरोब्ब्ब्बऽऽऽरऽऽऽ.. खाताना सुद्धा मुळीच लाजू नये.

पक्ष-पंधरवडा सरला की मी दसरा दीवाळीची वाट पहात असतो.

माझे पेपरवर्क सुद्धा तयार असते.
आज आपणास दुपारी कोणा(कोणा)कडे आणि संध्याकाळी कुठे(कुठे) सदिच्छा भेट द्यायची आहे याचे वेळापत्रक "प्लॅन--> एक्झीक्यूट ---> अचिव्ह " असे परफेक्ट तयार असत्ये !

ठरल्याप्रमाणे मी काल बंडूकाकांकडे गेलो.

आनंदवनात एक बाबा आमटे होवून गेल्ये होत्ये.
त्यानंतर आमच्या बंडूकाकांनी लोकसेवेचं व्रत घेतलं.

काकू कुणाशी तरी फोनवर बोलत होत्या
" होय .. सायंकाळी येतोय आम्ही..
.....
यावर्षी फोटोग्राफर विसरू नका....
आणि फराळाच्या पाकीटांसह मुलं सुद्धा दिसली पाहिजेत फोटोत.. आमच्या सोबत..
.....
काय म्हणालात?
मुळीच नाही... त्यांना कपडे नवीन घालू नका..
त्यांचे अंगावरचेच असू द्या...
ऍम्बियेन्स क्रिएट झाला पाहिजे नंऽऽ ऍम्बियेन्स!..

काकूंनी फोन ठेवला..

ओशाळं हसत बंडूकाका म्हणाले " आमच्या सेवाभावी संस्थेचं दशकपूर्ती वर्ष आहे यंदा ! "
या बरं फराळाला..

माझ्या समोर फराळाचं एक पाकीट बंडुकाकांनी पुढं केलं..

मी म्हणालो..
"असू द्या बंडूकाकाऽऽऽ , मला देण्या-ऐवजी एखाद्या गरजूला द्या ..
फोटोत एखादा मुलगा जास्तीचा असला, तर आणखी चांगला ऍंबियेन्स क्रिएट होईल " ..
निघतो आताऽऽ !
हॅप्पी ऍम्बियेन्स !!! सी या...

Monday, September 7, 2009

दंभेचि असतो मेलो

मॅन इज हिडन इन हार्ट ऍन्ड नॉट हेड असे कुणीतरी म्हटले होते.
पण जगातील काही विचारवंतांचे मत याबद्धल भिन्न आहे.
हे विचारवंत कोण असे कुतुहल आपणास असेल..
पण असो. मॉडेस्टीने आमचे तोंड बांधून ठेवले आहे. (पहा ते विचारवंत आम्हीच आहोत हेसुद्धा आम्ही कंसात लिहत आहोत.)
आमचे आपले क्षुल्लक मत असे की "मॅन इन नायदर हिडन इन हेड नॉर हार्ट बट हिडन इन टेस्ट बड्स"..
चव जशी किंवा अभिरुची जशी तसा माणूस.

मला एक सज्जन म्हणाला, मित्रा तू सारखे सारखे ओव्य़ा आणि अभंग लिहीत असतोस ब्लॉगात...
मित्रा, याचा तुला नसेल तरी इतरांना वात येत असेल. काय या ओव्यांमधे असं?

काय बोला आता?

असते एखाद्याची आपापली टेस्ट.
बाकी आमचे एक बरे आहे. आडाणी आहोत म्हणून वाचलो.
तुकोबा ज्ञानोबांचे उरलो तरी.
आमचे तुकोबा म्हणतात-
बरे झालो देवा कुणबी केलो! नाहीतरी दंभेचि असतो मेलो ||

आडाणी आहोत, हेपण आमचे बरे आहे अन्यथा मनाच्या गाभा-यात सावळा नाद गुंजला नसता.

मराठी भूमीची..संतभूमीची ती आर्त आहे.
टाळचिपळ्य़ांच्या संगतीत गगनाला भिडणारा हरिनामाचा घोष हे या मातीचे वैभव.
या मातीनं जीवनाला खरी चव आणली.

परत तुकोबा आठवले.
खादलेचि खावे वाटे । भेटले भेटे आवडी ॥
वीट नाही पांडुरंगी । वाटे अंगी आर्त ते ॥
तुका म्हणे पोट भरे । परि ते उरे भूक पुढे ॥

चला, निघतो आता. हॅप्पी भूक

Wednesday, August 26, 2009

हॅप्पी गणेशोत्सव

शेवटी झाले.
गणराय पावले आणि दुष्काळाचे सावट दूर झाले.
देशातील तमाम नेते जन आणि आम्ही स्वतः सचिंत होतो की कसे व्हावयाचे?
कसे व्हावयाचे?कसे व्हावयाचे?

नेते असो अथवा आम्ही.. आम्हा दोघांनाही खाण्यास मिळेल की नाही ही चिंता असते. असोऽऽ
पाऊस जर पडलाच नाही तर, पिकणार काय अन्‌ खाणार काय?
पहा फिरून फिरून विषय तेथेच येतो.ते म्हणजे खाणे!!

खाण्याचा गंभीर प्रश्न उद्भवणार असल्यामुळे आम्ही गणरायास साकडे घातले.

गणरायाचे उदर विशाल.
अनेक अपराध पोटात घालून पुन्हा वरदहस्त तयार.
अहो तो तर मुलाधारस्थित बाप्पाऽऽ !
तो जर हलला की सारेच कोसळेल की..

तसे गणपतीचे आम्ही सर्व भक्त जरी एकमेकांशी भांडत असलो तरीही गणराय दयाळू!
त्याला सर्व सारखेच.

दुष्ट आणि सुष्ट !सारखेच
चोर आणि साव किंवा सावपणाचा आव ! सारखेच

आस्तिक आणि नास्तिक ! "धार्मिक" आणि "सुधारक" ! सारखेच
गणरायाला सारे सारखेच.

त्यामुळे आमच्या तमाम गाढवपणाला गणरायाने माफ करून टाकले.

कुटुंबाची नजर चुकवून त्या मंगलमूर्तीला मी ऐकवून टाकले...
बा गणराया ऐकऽऽ...
एरव्ही तरी मी मुर्खू । जरी जाहला अविवेकु । तरी तवकॄपादीपकु । सोज्वळु असे ॥

बाप्पांचा राग निवळला अन्‌ शेवटी बरसला बाबाऽऽ !
बाप्पांच्या कॄपेचे मेघ बरसले !

त्या वर्षावात चिंब होत होत बाप्पांना घरी आणले.

आता मात्र धीर धरवेना .
गुरुजींनी यथासांग पूजा सांगितली.
"प्रियन्ताम्‌ न मम " म्हणून झाले..
श्रीकॄष्णार्पणमस्तु झाले.. पण मजसी धीर धरवेना ..

अथर्वशीर्शाचे एक आवर्तन झाले... तरीही धीर धरवेना ऽऽ !!!

माझी चुळ्बुळ पाहून कुटुम्बाने डोळे वटारले.
डोळे मोठ्ठे मोठ्ठे करून मज निष्पापाकडे पाहिलं.. पण तरीही धीर धरवेना!!

कसा-बसा धीर धरला आणि तो प्रसंग आला..
ज्याची इतक्या अधीरपणे मी वाट पहात होतो.
"मोदक"
मोद करोति इति मोदक.. आनंद देतो त्यास म्हणावे मोदक..
तुम्हाला सांगतो .. "जीभेवर मोदक ठेवताना कळते की यास मोदक का म्हणतात".
आमचे खाण्यावरील प्रेम असे बेभान होते की बालपणी आम्ही तीर्थरूपांचे मारास सुद्धा मुष्टीमोदक अथवा धम्मकलाडू असे म्हणत असू...
आम्ही मात्र श्रद्धा आणि सबूरी या दोन्हीचे पालन करत बाप्पांसमोरचा मोदक गुरुजींच्या हातून रीतसर स्वीकारला।

बाप्पांची प्रतिष्ठापना झाल्यानंतर सर्वजण तिथून हलेपर्यंत आम्ही बराच वेळ वर्तमानपत्र चाळण्यात घालविला.
आता मात्र धीर धरवेना.
तिथं कोणीच नव्हतं .
मी आणि फक्त बाप्पाऽऽ !
दोन मोदक गुपचुप उचलून आम्ही दीवाणखान्यातून पसार झालो.

ज्ञानेश्वरी ची ओवी ऑठॉवॉली.. ऑयकॉ .. थॉम्‌बॉ.. थोडं..
हॉ तॉन्डॉतॉलॉ sss मॉदॉख्ख खॉवूऽऽन घेतोऽऽ ऑssधी..

ह्म्म्मऽऽ संपला एकदाचा..

hmmओवी सांगतो. ऐका नीट...

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळे नेणती ।
तैसी परी आहे सेविती । ग्रंथी ईये ॥

-कठीण काष्ठालाही भेदणारा भ्रमर कमलदलातील पराग अलगद वेचून नेतो..
पत्ता लागू देत नाही कुणाला..

तसाच जो खरा जिज्ञासू आहे तो ग्रंथाचे गूढतम सार घेऊन जातो.
ज्यांना ते उमजत नाही ते मात्र भांडत बसतात..
असोऽऽ

आम्ही मात्र हा मोदक भ्रमराने पराग अलगद वेचावा तसाच अलगद उचलून नेतौत.
आमच्या कुटुम्बास कृपया सांगू नका.
अन्यथा गणरायासमोर नस्ता कार्यक्रम व्हायचा. असोऽऽ..

निघतॊ आता. जय गणराय.
सी या.. हॅप्पी गणेशोत्सव !
सी या. बाय ..

Saturday, July 4, 2009

सुशीला

रविवारचा कार्यक्रम एकंदरीत ठरलेला असतो.
अगदी सकाळी लोकसेवा कटींग सलून मध्ये वर्तमानपत्राचे वाचन होते.
तिथेच जवळ पडलेला फिल्मफेअर व त्यावरील पदुकोणांच्या कन्येचे चित्र त्याकडे दुरूनच एक तुच्छ कटाक्ष टाकून मी पेप्रात डोके घालून सांप्रत परिस्थितीचे आकलन करून घेत असतो.

या कटींग सलूनचे प्रोप्रा.बाबूराव यांच्या खुर्चीत बसून दाढी होईपर्यंत कॉलिनीतील अनेक ब्रेकींग न्यूज कळून जातात.

त्यानंतर बाबूराव आमचे डोक्यावर झपताल धरतात.
लय द्रुत होत गेली की अस्सा काही तन्मय होतो की काय म्हणावं म्हाराजाऽऽ !
सिंगापूरच्या स्पा मध्ये अथवा मसाजाच्या पारलरांमध्ये उधळपट्‌टी करण्याऐवजी महिंद्राच्या हॉलिडे पॅकेजातून एखादा कॉर्पोरेट बंधू या सलूनात आला तर त्याचा हॉलिडे कृतकॄत्य होऊन जाईल याविषयी शंका नसावी.

आय. पी. आर. प्रांताच्या अनेक कल्पना क्रिएटिव्ह गुरुज ना इथे सुचतील.
सर जो चकराये अथवा दिल डुबा जाये.. या सर्व लाख दुखोंकी एकच दवा.. लोकसेवा कटींग सलून !

नंतर घरचे वेध लागतात.
कारण स्नानानंतर एक महत्वाचे कर्म असते ते म्हणजे रविवारचा नाश्ता !

या उपाहारात आमच्या वामांकाचे ( पक्षी- खटल्याचे, सहधर्मचारिणीचे..इ.) पाककौशल्य आणि त्याचे अस्मादिकांनी सहकुटुंब केलेले रसग्रहण.
या दिनी पुत्रद्वयांची प्रातःसमयी शाळेची घाई नसते आणि त्या कार्यास उरकणे नसल्याने कुटुंब चिडलेले नसते.
याचा अपरोक्ष परिणाम त्या दिवसाच्या स्वयंपाकावर होत असतो.

चुरमुरे भिजवून त्यांना पोह्यासारखी फोडणी देणे यास आमच्या मराठवाड्‌यात एक मस्त नाव आहे.
त्याला सुशीला म्हणतात.
कृती-
चुरमुरे पोह्यांसारखे भिजवा.
(विष्णू मनोहरांचे इकडे जर लक्ष गेले तर तेवढेच फुटेज मिळेल असे भाबड्‌या जीवास उगाच वाटते )
गॅसच्या मंद आचेवर कढई ठेवा.
त्यात तेल तापवून जिरे, मोहरींची फोडणी द्या.

कढीपत्ता हा पदार्थ भारतीय दुतावासाने चीनच्या अन्नविभागास कळवला पाहिजे.
असे जर नीट करता आले तर आपण चवीच्या प्रांतात सर्वश्रेष्ठ आहोत असा त्यांचा भ्रम नाहीसा हॊइल तो हॊइलच पण तिबेट मध्ये सुख नांदेल आणि कढीपत्त्याच्या एक्स्पोर्ट स्ट्रॅटेजीज ठरवता येतील.

कांदा आणि इतर मसाला या फोडणीत टाकून आता चुरमु-यांकडे वळा.
त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट तीनास एक या प्रमाणात टाका.

फोडणीत हे सारे टाकून झाले की की उत्तम ढवळून घ्या.

मुख्य महत्वाचे हे..की ते प्लेटात येईपर्यंत संयम बाळगा.
मग हा पदार्थ रविवारच्या व्रताचा प्रसाद म्हणून आदरपूर्वक ग्रहण करावा.
यावर थॊडी बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून सजवू शकता पण त्यास थोडा वेळ लागतो.
हा प्रकार मराठवाडा आणि सीमाभागात सुशीला नावाने ओळखला जातो. याला पुण्या मुंबईत मुरमुरे-उसळ, मुरमुरे खिचडी किंवा चुरमु-यांची उसळ असे संबोधले जाते.

असो..
चोचले पुरवणार त्याला देव देणार !
निघतो आता.
हॅप्पी संडे इन ऍडव्हान्स ! सी या..