Saturday, July 4, 2009

सुशीला

रविवारचा कार्यक्रम एकंदरीत ठरलेला असतो.
अगदी सकाळी लोकसेवा कटींग सलून मध्ये वर्तमानपत्राचे वाचन होते.
तिथेच जवळ पडलेला फिल्मफेअर व त्यावरील पदुकोणांच्या कन्येचे चित्र त्याकडे दुरूनच एक तुच्छ कटाक्ष टाकून मी पेप्रात डोके घालून सांप्रत परिस्थितीचे आकलन करून घेत असतो.

या कटींग सलूनचे प्रोप्रा.बाबूराव यांच्या खुर्चीत बसून दाढी होईपर्यंत कॉलिनीतील अनेक ब्रेकींग न्यूज कळून जातात.

त्यानंतर बाबूराव आमचे डोक्यावर झपताल धरतात.
लय द्रुत होत गेली की अस्सा काही तन्मय होतो की काय म्हणावं म्हाराजाऽऽ !
सिंगापूरच्या स्पा मध्ये अथवा मसाजाच्या पारलरांमध्ये उधळपट्‌टी करण्याऐवजी महिंद्राच्या हॉलिडे पॅकेजातून एखादा कॉर्पोरेट बंधू या सलूनात आला तर त्याचा हॉलिडे कृतकॄत्य होऊन जाईल याविषयी शंका नसावी.

आय. पी. आर. प्रांताच्या अनेक कल्पना क्रिएटिव्ह गुरुज ना इथे सुचतील.
सर जो चकराये अथवा दिल डुबा जाये.. या सर्व लाख दुखोंकी एकच दवा.. लोकसेवा कटींग सलून !

नंतर घरचे वेध लागतात.
कारण स्नानानंतर एक महत्वाचे कर्म असते ते म्हणजे रविवारचा नाश्ता !

या उपाहारात आमच्या वामांकाचे ( पक्षी- खटल्याचे, सहधर्मचारिणीचे..इ.) पाककौशल्य आणि त्याचे अस्मादिकांनी सहकुटुंब केलेले रसग्रहण.
या दिनी पुत्रद्वयांची प्रातःसमयी शाळेची घाई नसते आणि त्या कार्यास उरकणे नसल्याने कुटुंब चिडलेले नसते.
याचा अपरोक्ष परिणाम त्या दिवसाच्या स्वयंपाकावर होत असतो.

चुरमुरे भिजवून त्यांना पोह्यासारखी फोडणी देणे यास आमच्या मराठवाड्‌यात एक मस्त नाव आहे.
त्याला सुशीला म्हणतात.
कृती-
चुरमुरे पोह्यांसारखे भिजवा.
(विष्णू मनोहरांचे इकडे जर लक्ष गेले तर तेवढेच फुटेज मिळेल असे भाबड्‌या जीवास उगाच वाटते )
गॅसच्या मंद आचेवर कढई ठेवा.
त्यात तेल तापवून जिरे, मोहरींची फोडणी द्या.

कढीपत्ता हा पदार्थ भारतीय दुतावासाने चीनच्या अन्नविभागास कळवला पाहिजे.
असे जर नीट करता आले तर आपण चवीच्या प्रांतात सर्वश्रेष्ठ आहोत असा त्यांचा भ्रम नाहीसा हॊइल तो हॊइलच पण तिबेट मध्ये सुख नांदेल आणि कढीपत्त्याच्या एक्स्पोर्ट स्ट्रॅटेजीज ठरवता येतील.

कांदा आणि इतर मसाला या फोडणीत टाकून आता चुरमु-यांकडे वळा.
त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट तीनास एक या प्रमाणात टाका.

फोडणीत हे सारे टाकून झाले की की उत्तम ढवळून घ्या.

मुख्य महत्वाचे हे..की ते प्लेटात येईपर्यंत संयम बाळगा.
मग हा पदार्थ रविवारच्या व्रताचा प्रसाद म्हणून आदरपूर्वक ग्रहण करावा.
यावर थॊडी बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून सजवू शकता पण त्यास थोडा वेळ लागतो.
हा प्रकार मराठवाडा आणि सीमाभागात सुशीला नावाने ओळखला जातो. याला पुण्या मुंबईत मुरमुरे-उसळ, मुरमुरे खिचडी किंवा चुरमु-यांची उसळ असे संबोधले जाते.

असो..
चोचले पुरवणार त्याला देव देणार !
निघतो आता.
हॅप्पी संडे इन ऍडव्हान्स ! सी या..

2 comments:

श्यामली said...

ब-याच दिवसानी आले तुमच्याकडे आणि झक्कासपैकी सुशिला खाय़ला मिळाला :)

तिकडेच हो हा पदार्थ पुण्यामुंबईच्या लोकांना ठाऊक सुद्धा नसेल.

रमण ओझा said...

Dhanyawaad. :)