Saturday, November 10, 2007

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म,

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म, असे भक्तिभावाने म्हणून अन्नब्रह्माची उपासना करणा-या लोकांविषयी मला उपजत प्रेम वाटते. मागे एकदा एका मित्राला म्हणालो पण-- विकीपेडिया जोपर्यंत आयडियल बुक डेपो जवळचा बटाटेवडा आणि सांगलीची भेळ हे पदार्थ सामाऊन घेत नाही तोपर्यंत तो अपूर्ण रहाणार. त्या ज्ञानकोषाच्या संकलकाला नांदेड भाग्यनगर कॉर्नरची पाणीपुरी, लातूरच्या जहागीरदारचे पोहे, बीड ला जाताना मस्साजोगचा पोहे मिश्रीत चिवडा, उजनी आणि नरसोबावाडीची बासुंदी,सातारचे कंदी पेढे, बेळ्गावचा कुंदा, नागपूरच्या चर्च समोरील तिखट रस्सा टाकलेले पोहे खाऊ घातले, म्हणजे जाणवेल की आपला या प्रांतातील व्यासंग फारच अपूर्ण आहे बुवा!

शाकाहार उत्तम आहार असे मी म्हणतो त्यामागे एक अनुभवांनी समॄद्ध असे एक व्यापक निरीक्षण आणि चिंतन आहे. पाकशास्त्रीय निरीक्षण फक्त चक्षुरिंद्रियाचा विषय नाही, तर खमंग फोडणीचा खुणावणारा सुगंध, वेलची घातलेल्या श्रीखंडावर सहज गेलेली दॄष्टी ,चटका बसत असताना ऊत्तम कढीला झालेला पाच एकात्म बॊटांचा स्पर्श आणि मग रसनेवर त्या अन्नब्रम्हाची तन्मयतेने केलेली प्राण-प्रतिष्ठा, कानांनी ऐकलेले आग्रहाचे गॊड आवाहन, हे पाहून दिव्यत्व म्हणतात ते हेच काय याचा साक्षात्कार होतोच होतो. गीतेच्या पंधराव्या अध्यायात भगवंतानी सांगितले आहे की सर्व इंद्रियांमधून घेतले जाणारे भोग मीच घेतो, हे पाकशास्त्रीय निरीक्षणात पटू लागते. उपनिषदे आत्म्याला रसो वै सः का म्हणतात ते उपवास करून देह वृथा शीणवणारा बापडा जीव कसे जाणणार?

पूरणपोळी हा पूर्णान्न-पोळीचा अपभ्रंश आहे. पोळी सा-या रंगात रंगून पण कशी वेगळी, नाही का? शिमग्याला साहेबाच्या *** वर बंदूकीची गोळी म्हणताना पोळीचा उल्लेख तर, सणासुदीला देवाचं स्मरण करत तुपात भिजवलेल्या पोळीचा घेतलेला आस्वाद, कधी खव्याच्या सहवासाने कळी खुललेली पुरणपोळी, तर कधी दुधाशी मैत्री जोडून रुक्षपणाचे जोखड झुगारणारी पोळी, पोळीचे अक्षरशः अनेक अवतार आहेत. चोचलासुराचे मर्दन लीलया करणारी पोळी, वारी वारी जन्म मरणाते वारी अशीच..

अगदी सकाळचं उदाहरण घ्या. भारतीय जीवनशैलीची सकाळ, आहाराच्या वैविध्यापासून होते. वैविध्य उत्क्रांतीचे कारण आहे आणि उत्क्रांतीच्या शिखरावर देखील आढळते. एखादा उत्क्रांत फलंदाज तो, ज्याच्या भात्यात सर्व फटके असतात. उत्क्रांत गाणारा तोच जो अनेक शैलींचा खुबीने वापर करतो. अन्यथा मग त्याचा हिमेश रेशमिया होतो. उत्क्रांत प्रजातींमध्ये पराकोटीचे जैविक वैविध्य आढळते असा जीवशास्त्रीय नियमच आहे. तोच नियम पाकशास्त्राला लागू आहे. शास्त्रीय संगीतात आळवल्या जाणा-या रागांच्या ठराविक वेळा असतात. त्या वेळी त्या रागाचा अप्रतिम अविष्कार होतो तसेच खाण्याचे आहे. काही पदार्थ सकाळी, तर काही संध्याकाळी, विशेष भावतात. सकाळी वर्तमान-पत्र आणि चहा, स्नानानंतर आन्हिक आणि मग जिव्हासुखोपनिषदाची संथा. उपाहार किंवा प्राकॄतात नाष्ता, आसेतुहिमाचल भारतात, अनेक शैलींनी व्यक्त होतो. शास्त्रीय संगीत जरी एक असले तरी त्यात घराण्यांचा विशिष्ट बाज आढळतो. बनारस, ग्वाल्हेर यासारखे उत्तर भारतीय प्रकार, आणि दक्षिणेकडील संगीतचा अलगच बाज, तसेच इडली, दोसा, वडा, उत्तप्पा, गुंटपांगळू इत्यादि, दक्षिण भारतीय पदार्थ.

महाराष्ट्रात पोहे हा प्रकार प्रभात-समयीचा ठरलेला उपाहार. इंदोर सारख्या मराठी भाषिक भरपूर असलेल्या भागात पण महाराष्ट्राच्या या पोह्यांनी आपला शिरकाव केलाच ना! गुजराथच्या पोरबंदरचे आणि पोह्यांचे ऋणानुबंध श्रीकॄष्ण- सुदाम्याच्या मैत्रीला एक ऐतिहासिक भाव-संदर्भ देऊन गेले. गुजराथी उपाहाराने एक सुंदर उपहार, शाकाहारी लोकांना दिला. तो म्हणजे, खमण-ढोकळा. फाफडा, भावनागरी शेव आणि पापडी, हे जवळचे गुजराथी नातेवाईक, पण वैविध्यातून उत्क्रांतीचा मूलमंत्र, या तिघांनी स्वीकारला आहे.

उत्तम भोजन स्वतः करणारा आणि तॄप्त होईस्तोवर .... "इंग्रजीत टू मेक बोथ एन्ड्स मीट"... असे खाऊ घालणारा, हे दोन्ही महामानव मानवी संस्कॄतीचे आदर्श आहेत असे माझे व्यक्तिगत चिंतन आहे. मंचुरिअन हा पाकशास्त्रातील काव्यप्रकार आणि स्वीट कॉर्न सूप या अजरामर देणग्या चीन ने भारताला दिल्या या पलिकडे माझे आंतरराष्ट्रीय नातेसंबंधावर चिंतन नाही..आफ़गाणिस्तान च्या अफ़ाट प्रदेशात चक्क ज्वारीचे पीक घेऊन हुरडा करावा.. मग जॉर्ज काका आणि लादेन मामा यांचे सुर पुन्हा जुळण्या साठी त्यांना भाजलेली मक्याची कणसे आणि हुरडा मनसोक्त खाऊ घालावा...उत्क्रांतीचा नियम डॉर्विनला कसा सुचला असावा याचे उत्तर मराठवाड्याच्या माकड-चिवडा या प्रकारात असावे असे मला राहून राहून वाटते. फॊडणी ना देता अपरिपक्व अवस्थेत कच्चा चिवडा तो माकड चिवडा आणि उत्क्रांत हॊऊन फॊडणी ने समॄद्ध असा चिवडा तो पक्का मानव चिवडा हे माझे पाक-जीवशास्त्रीय चिंतन आहे. भौतिकशास्त्रातील "लॉ ऑफ़ कॉंझर्व्हेशन ऑफ़ मास " लॅव्हासिये " तेव्हाच मांडू शकला जेव्हा त्याने शिळ्या भाकरीचे पुन्हा फॊडणी दिलेले तुकडे मन लावून खाल्ले असे मला का वाटते कॊणास ठाऊक..?पण उत्तम खवय्ये आणि उत्तम गवय्ये मला अंतःअकरणात खोलवर भिडून जातात.

2 comments:

snehal said...

zakkas!khanyavar ani marathi bhashevar tumche prem ani pakad shabda-shabdatun oghaltiye,kharech khup divasani kahitari apratim vachayala milale.thank you.

रमण ऒझा said...

Dhanyawaad..