Wednesday, October 8, 2008

पनीर

पनीर हे नांव ऐकले, की माझ्या तोंडात नीर दाटून येते....

उत्तम पनीर बाजारात निवडता येणे, ही पण एक क्राफ़्ट आहे. तेथे पाहिजे जातीचे!

तुम्ही कधी क्राफ़्ट्स-उमन असं ऐकलंय का ? नेमका शब्द आहे "क्राफ़्ट्समॅन".. भाजी आणण्याचे सत्कर्म सुखी कुटुंबात पुरुषांना करावे लागते, हे सुद्धा क्राफ़्ट म्हणण्याचे एक कारण आहे..उत्तम पनीर ते "जे हाताल चिकटत नाही आणि थोडंसं चिमटित धरताच सहज मोकळं होऊन जातं"... या मुद्यावर अनेक दॄष्टीकोन असू शकतात परंतु, पनीर निवडणं एक क्राफ़्ट आहे हे निश्चित.. पनीर उत्तर भारतात नेमके दिल्लीच्या आसपास भरपूर आणि ताजे मिळते असे ऐकून आहे. अर्थातच तसा "योग" येण्याची मी वाट पहात आहे.पनीर फ़ेस्टीव्हल सारख्या अनेक कल्पना अजून मी लपऊन ठेवल्या आहेत कारण फ़क्त आय पी आर आणि परक्याच्या कल्पनेवर डोळा असणारे अनेक लोक मला अक्षरशः माहिती आहेत..असोऽऽऽऽ..

पनीर बटर मसाला, मी जवळपास भेटी दिलेल्या सर्व शहरांमधून चाखलाय आजवर..पण औरंगाबाद च्या "लाडली" सारखा कुणाला जमणार नाही, यावर आपली पैज.. बोलाऽऽऽऽ... सिडको मधलं हे तसं मध्यमवर्गीयांचं प्यारं हॉटेल.. पण पंजाबी डिशेस अश्या बनतात इथं की अक्खा पंजाब फिदा होऊन जाईल. आता हॉटेल औरंगाबाद चं म्हणून नाकं मुरडू नका.. अस्मिता अशी जपावी, खाण्यात सुद्धा.. माझ्या मराठवाड्यावर माझं प्रेम आहे.. इथल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या पदार्थांचा मला अभिमान आहे.. त्यांची चव किमान एकदा तरी घेण्याची पात्रता माझे अंगी यावी म्हणून मी प्रत्येकाशी सौजन्याने वागेन..असोऽऽऽऽ

धाबा आणि पनीर म्हणजे, ठुमरी आणि हिमेश.. न जमणारं गणित.. सर्व नियम धाब्यावर बसवून, धाबेवाले शिळ्या पनीराचे असे पदार्थ बनवतात की कडकडीत वैराग्य उत्पन्न व्हावे...

पनीर मंचूरिअन पासून थाय पनीर चिली पर्यंत या पदार्थाचा कॉस्मोपोलिटीअन संचार बघितला की अन्न हे पूर्णब्रम्ह आणि "स्थलःत्रयातीतः" असल्याची खात्री पटते. पनीर भुर्जी , पालक पनीर, पनीर टिक्का मसाला, एकापाठोपाठ एक पनीरच्या डिशेस ची नांवं घेणारा वेटर बघून मी एकदा एकाचं कौतुक केलं होतं. त्याला टीप देताच तो मला गहिवरुन म्हणाला, "गुरुजी मला पैसे नकोत.. फ़क्त जीभेवरती पनीर ठेवा आणि "वाऽऽह म्हणा"..

No comments: