Monday, September 29, 2008

शिरा

वर्गात बॉटनी शिकवताना चुकून एकदा व्हेन्स म्हणजे "पानातल्या शिरा"म्हणण्याऐवजी, "पानातला शिरा" असं बोलून गेलो.पर्याय नाही...काय करणार..एकतर तूपावर असणारे विलक्षण प्रेम आणि मग तूपाला आत्मसात करून जीभेला घायाळ करणारा हा प्रकार...

शिरा शक्यतो हॉटेलात खाऊ नये हा सल्ला मी अनेकांना निव्वळ प्रेमापोटी देत असतो. हॉटेलांचं तुपाशी प्रेम कदाचितच जमतं... एखादा महापुरुष असतो, कुठेतरी बाजीराव रोडवर जो उकडीच्या मोदकावर तूप ओतून प्रतिक्रियेसाठी डोळ्यात प्राण आणून पहातो.. बाकी हॉटेल्स या पाकशास्त्राच्या वजीराचा घोर अपमान करतात. शिरा तसा सोज्वळ असला तरीही वैविध्याचं लेणं हासुद्धा हौसेनं स्वीकारतो. बदामाचा शिरा हा त्यातला मुकुट. बाकी रव्याचा किंवा मैद्याचा असे सर्वसाधारण प्रकारसुद्धा आहेतच. प्रसादाचा शिरा रव्याचा तर जावायासाठीचा शिरा बदामाचा हे एक पारंपारिक सत्य आहे. शिरा एकदा तोंडात "शिर"ला की मीसुद्धा आस्वादाचा हात धरून रसनारसाच्या डोहात खोल बुडी मारतो.

Tuesday, September 9, 2008

असावे सुंदर तूपाचे तळे

असावे सुंदर तूपाचे तळे ! अशी एक लहानपणी मी कविता केल्याचे आठवते. तूप हा आपला जिव्हाळ्याचा विषय! चार्वाकासारखा निरीश्वरवादी तत्वचिंतक "ॠणं कॄत्वा घॄतं पिबेत" असं म्हणतो, तर वैदिक वाङमय तूपाचा संबंध मेधा म्हणजे बुद्धीशी जोडतं! थोडक्यात, आस्तिक असो वा नास्तिक, दोघांचापण तूप हा जिव्हाळ्याचा विषय आहे.

चिऊकाऊचे घास खाताना, तूपसाखरेचा जीवनात झालेला प्रवेश, बालपणीच्या भावविश्वाला जणू स्निग्धतेचा स्पर्श देतो. माकडा माकडा हुप्प!! तुझ्या शेपटीला तूप! ही बालवाडीतील कविता तूपाचं श्रेष्ठत्व पटवून देते! चांदोबा चांदोबा भागलास का? असं विचारत विचारत, त्याला तूप-पोळी खाण्याचं आमंत्रण दिल्यावर चांदोबाला काय वाटत असेल ते "नील आर्मस्ट्रॉंग" ला सुद्धा कळणार नाही! बोलीभाषेत, मिशीला तेल लावणे अश्या म्हणी नाहीत, तर तिथं तूपाला प्राधान्य! खाईन तर तुपाशी, नाहीतर राहीन उपाशी अश्या विचारप्रवर्तक म्हणी म्हणजे मानवी जीवनात तूपाला असणारं असाधारण महत्व सांगून जातात! तूप-पोळी, तूपसाखर, तूप-भात, नुसतंच रवाळ तूप, जिव्हासुखोपनिषदात, तूपाला अनन्यसाधारण स्थान आहे!

मिठाई शुद्ध तूपात बनवलेली असावी हा आग्रह धरणा-या चार हलवायांनीच मिठाईचा गोडवा जपून ठेवला आहे!आमच्या लातूरात, इडली सेंटर्स वर रविवारी शुद्ध तूपाची जिलेबी हा एक घायाळ करणारा प्रकार असतो! प्रसन्न चेहेरे घेऊन सकाळी सकाळी आमंत्रण ची ईडली आणि शुद्ध तूपाची जिलेबी झोडणारा कुटुंबवत्सल महामानव बघितला की रविवार जणू कॄतार्थ झाल्यासारखा वाटतो.

आयुर्वेदिक डॉक्टरांबरोबर माझे जरा कमी पटते, कारण तूप हा वास्तविक फक्त जीभेवरच टाकण्याचा प्रकार आहे असे माझे भाबडे वाटले तरीही प्रामणिक मत आहे!ते नाकात, कानात टाकण्याचा सल्ला देणे हे खाद्यसंस्कॄतीच्या आचारसंहितेत बसत नाही! असो...तूपाचा आणि अध्यात्माचा अगदी निकटचा संबंध आहे. देवासमोर तेलवात जरी लावलेली असली तरी ओवाळणी मात्र निर्विवाद तूपाच्या दिव्यानेच करायची. पंचामॄताचा महत्वाचा घटक म्हणजे तूप! तेदेखील एक अमॄतच आहे ना!!!