Friday, May 22, 2009

घराला घरपण देणारी माणसं

माझं डोकं खाऊ नकाऽऽऽ!!!
सहधर्मचारिणीचे निर्वाणीचे बोल कानावर पडले आणि बंडू शांत बसला.

बंड्‌याला मागच्या आठवड्‌यात झालेला भयंकर प्रसंग आठवला.

त्याची बायको त्याच्यावर ओरडली होती, " तुझ्या डोक्यात शेण भरलंय शेण!"

बंड्‌याची विनोदबुद्धी नको त्या प्रसंगी जागी झाली. तो बायकोला म्हणाला,"आता मला कळलं, तू माझं डोकं का खात असतेस ते!"..

आणि बंडोबाचे पुढील चार-पाच दिवस हाल झाले हे वेगळे सांगायला नको.


परस्परांचे डोके खाण्यासाठी लग्न करतात हे शाश्वत सत्य आहे.

"नातिचरामि" (अतिरेक करणार नाही) हे वचनसुद्धा बिचारा नवराच लग्नात स्त्रीला देत असतो. अशी प्रतिज्ञा स्त्रियांना घेण्याची कल्पना त्या काळी कुणाला सुचली नाही हे आश्चर्यच आहे.

सॉक्रेटिस एकदा म्हणाला होता. "लग्न जरूर करा. कारण जर पत्नी समजदार मिळाली तर तुम्ही चांगले नागरिक बनाल आणि जर भांडणारी मिळाली तर तुम्ही चांगले तत्वचिंतक बनाल".
तर निष्कर्ष काय? तर तत्वज्ञानाचा प्रांत सुसमॄद्ध करणाचे थोर्थोर कार्य नवरा-बायकोच्या भांडणाने आजवर केले आहे.

असं म्हणतात की नवरा बायकोच्या भांडणात ब्रम्हदेवसुद्धा पडत नाही.
बुद्धीचं देणं माणसानं नीट वापरलं नाही की बोंबाबोंब झालीच संसाराची.

शिकल्या सवरल्या लोकांपेक्षा अडाणी लोकांचे संसार नेटके होतात त्याला कारण बुद्धीचा फाजील अहंकार नसतो तिथे. बुद्धी हे तो देणे ईश्वराचे. पण परस्परांच्या बुद्धीचे अन्‌ कर्तॄत्वाचे कौतुक न वाटता अभिमान आड आला की मग सारेच मुसळ केरात !

माउलींची ओवी आठवली.
नवल अहंकाराचिये गोठी । न लगे अज्ञानाचिया पाठी ।
सज्ञानाच्या झोंबे कंठी । नाना संकटी नाचवी ॥
अहंकाराच्या गोष्टीचे नवल कसे विलक्षण ! अज्ञानी, आडाणी माणसाला नसतोच मुळी अहंकार.. पण सज्ञान माणसाच्या कंठात नेकटाय सारखा लोंबतो आणि अनेक संकटांना आमंत्रण देतो.

बंड्‌याच्या बायकोचे उद्या स्त्रीमुक्ती चळवळींसमोरील आव्हाने या विषयावर व्याख्यान आहे.
त्याला जावं की नाही हा प्रश्न पडलाय? बघू या !!!
आधी जेवतो पोटभर मग त्यावर विचार करेन म्हणतो.
सी या. बायऽऽऽ !!

No comments: