Thursday, November 19, 2009

मातॄके वो माये

कठीण आहे मास्तर.
मोठेपणाचा सोस आवरणं म्हणजे महाकर्मकठीण.
लहान होता येणं महा कठीण.
आयुष्य अवघं पाण्यावर रेघा ओढत जातं निघून.
अवघ्या अडचणींचं कारण जीभ अन्‌ तिचे चोचले.
हे चोचलेच संपत नाहीत.

गोडानंतर तिखट अन्‌ पुन्हा मग गोड...
चोचल्यांच्या नित्य नूतन मागणीनं वेडावलेला मी सुसाट मनाच्या गाभा-यात शिरलो.

माउलीला म्हणालो. तू संसारश्रांतांची साउली... तूच सांग या चोचल्यांचे काय करू? मी अडाणी प्रापंचिक. तुझ्यासारखा काही योगी नाही आणि पावन मनाचा तर त्याहूनही नाही.
कैवल्यमौक्तिकांचा चारा वेचणा-या परमहंसांची तू जननी.
माझ्यासारख्या कावळ्यांच्या तोंडीसुद्धा दहीभाताची उंडी लावणं तुलाच जमतं. उगाच तुला माउली म्हणत नाही सारे.

माउलींची मुर्ती नेहमीप्रमाणे प्रसन्न आणि आश्वस्त. काहीच बोलली नाही. नुसतीच हसली आणि एका अभंगाची गुणगुण कानावर पडली.

रसने वोरसु मातॄके वो माये । रमणिये माये रमणिये ॥
रसने वोरसु मातॄके वो माये । रामनामामॄत पी जिव्हे ॥
निवॄत्तीदासा प्रिय । जिव्हा मातृके माय रमणिय ॥

Saturday, November 14, 2009

प्रौढत्वी निज शैशवास जपणे

" एवढे ताडमाड वाढलात. पण तुमचं लहानपण काही गेलं नाही. "
प्रातःसमयो तो पातला आणि आमच्या सुब्बालक्ष्मीचा खणखणीत सुप्रभात कानावर कडाडला.

घर आवरता आवरता माझ्या नाकी नऊ येतात पण तुम्हीऽऽ ??? तुम्ही सुधाराल तर शप्पथ... :X

मी म्हणालो.. "हे बऽऽघऽऽ, शपथ हा शब्द मराठी भाषेतला संवेदनशील असा शब्द आहे. हे शपथ सारखे शब्द जरा हळू बोल. आपण सामान्य माणसं. पोरंबाळं आहेत आपल्याला...केशवसुतांच्या तुतारीची परंपरा सांगणारे बोरुकुशलदेखील हा शब्द ऐकून हल्ली टरकतात... आपण आपला सुखेनैव प्रपंच करावा आणि राज्य परिवहन मंडळाच्या एस. टी. प्रमाणे सहनशील असावं."

आंदोलनाचा पवित्राच नेहमी घेणारे आमचे अर्धांग हे ऐकेल तर शप्पथऽऽ ! (जीभ चावतोय.. क्षमस्व)

केशवसुतांच्या तुतारीचा प्राण जरी आजकाल क्षीण होत असला तरी प्रौढत्वी निज शैशवास जपणे या बाण्याचे मात्र मला विस्मरण झाले नाही. पोकळ मानसन्माच्या आणि तकलादु मॉडेस्टीच्या नाटकांमध्ये बालपणीचा सुखाचा काळ हरवून गेला.

लहानपण दे गा देवा..
म्हणत आर्त जागवणारे तुकोबा असं का म्हणतात ते खरोखर जाणवू लागलं.
हे लहानाहून लहान झाल्याशिवाय कसं कळेल?

माउलींची ओवी आठवली.
"तेथ व्युत्पत्ती अवघी विसरिजे । थोरपण जगा सांडिजे । जै जगा धाकुटे होईजे। तया जवळिक माझी ॥"
विद्वत्तेच्या आणि मोठेपणाच्या फाजील कल्पना फेकून देऊन जो जगासमोर धाकुटा झाला त्याला देवाचे सानिध्य लाभते.

वाळूत वेचून आणलेल्या शंख शिंपल्यांची, पोहे खाताना त्यातून वेचून खाल्लेल्या शेंगदाण्यांची, पहली तारीख पर मिळणा-या चॉकलेटपेक्षा चवदार असणा-या लेमन ऑरेंज गोळ्यांची, चिखल उडवत..घसरून धप्पकन्न पडत चिंब झेललेल्या पावसाच्या मौजेची आठवण पुन्हा पुन्हा येत रहाते.

चलो निघतो आता.
हॅप्पी बालपण आणि हॅप्पी बाल दिन"..

जाता जाता रहावत नाही म्हणून सांगतो..

आंदोलनं करताना आपण फेकलेला दगड सहन करणारी एस. टी. सर्व ठिकाणी असेल असं नाही.
मुठीत गोळ्याबिस्कीटांची दौलत घेऊन जाणारे बाळगोपाळ त्याच चिमुकल्या मुठीत त्यांचा इवलासा जीव घेऊन शाळेपर्यंतचा प्रवास करत असतात.
चलो सी. या.