Monday, February 1, 2010

कुणी पुरस्कार देता का पुरस्कार ???

क्या इतना बुरा हुं मै मेरी मां ...
मेरी मां...
मेरी मां... ???

कातर आवाजात आणि जड अंतःकरणाने मी आईस प्रश्न केला !

जीवनावर शतदा प्रेम करणं म्हणजे काय गुन्हा आहे काय ?
माझ्यासारखा आनंदयात्री या हौसिंग सोसायटी च्या पदाधिका-यांना अजून दिसू नये ?
मी गावाला काय गेलो आणि इकडे या लोकांनी पुरस्कार वाटून पैसे संपवले???

तसे माझे आकाशस्थ ग्रहगोलांपासून ते गवताच्या पात्यावर प्रेम.
एकदा असे झाले ...

फुले कळ्यांना पाहून कशी लाजतात आणि त्यांच्यावर त्यांचे हळवे प्रेम कसे आहे यावर स्वतःच्या वहीत भावगर्भ असे लिहित असताना आमचे गणिताचे फुले मास्तर आले आणि आमच्यावर शारीरिक अंगाने शिस्तीची कडक कारवाई केली. अश्याच काही घोर नतदृष्ट अरसिक हितशत्रुंमुळे दुर्दैवाने महाराष्ट्र एका थोरथोर साहित्यिकाला मुकला हे मात्र आवर्जून नमूद करावे लागेल. (तो थोर साहित्यिक म्हणजे मी आहे हे ओघाने आलेच परंतु हे माझ्या विनयशील स्वभावास अनुसरून मी हे कंसात लिहिले आहे.)

सहजीवनास तब्बल एक तप उलटले असतानादेखील कुटुंबाने कधीच एखादा नयन-कटाक्ष पुरस्कार अथवा एखादा " इश्य " पुरस्कार तरी द्यावा परंतु छेछेछे .. आमचे अर्धांग सुद्धा अरसिक आणि करारी बाण्याचे.
आम्ही आमच्या जीवाचे डोळे करून वाट पहातो पण हातात येतात किराणामालाच्या पिशव्या !!!

साखर , तुरडाळ , दुध इत्यादी वस्तूंचे भाव ऐकून आमच्या तरल कर्पुरीत काव्यभावनेचे त्वरित संप्लवन होवून जाते पण असो..

लहान असताना मी एकदा आईला मी विचारलं होतं, आई गं तू राब राबतेस, कष्ट सोसतेस , रोज एवढं छान छान खाऊ घालतेस ...
तुला कधी पुरस्कार हवा वाटतो का गं ?

आई सोज्वळ हसली ! अगदी सात्विक सात्विक म्हणतात तशीच हसली !!!
आणि म्हणाली देवबाप्पानं दिलाय की पुरस्कार...
माझ्या घराच्या वृंदावनाला अक्षय सौभाग्याचं लेणं आहे. बाजूला अंगणात तुम्हा चिमण्यान्चा चिवचिवाट आहे.
अजून काय हवं ?

माझी आई खरोखर आनंदयात्री आहे.
खोटी खोटी नाही !!!

7 comments:

Snehit Baheti said...

mast

रमण ओझा said...

Thanks. :)

आनंद पत्रे said...

सुंदर लिहिले आहे.....

रमण ओझा said...

धन्यवाद !

Amol Gowande said...

'सलाम' न मिळालेल्या पुरस्काराला

Amol Gowande said...

'सलाम' न मिळालेल्या पुरस्काराला

रमण ओझा said...

अमोल, सरस्वतीचा उपासक नम्र असला पाहिजे.
तू पु.लं .ची भूमिका बघ , आभाळाएवढा माणूस पण किती साधा..
मला हा सलाम मुद्दाम "ठोकावा" वाटला म्हणून लिहिलं !
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद ! :)