Thursday, October 2, 2008

श्रीखंड


श्रीखंड बनवणे ही सहासष्टावी कला आहे याबाबत कुणाचेच दुमत नसेल. रेडीमेड श्रीखंड हा एक ऐनवेळेचा पर्याय झाला. पण श्रीखंडाची माझी स्वतःची रेसिपी मी थोडा भीत भीतच देतोय... लगेच कुणीतरी त्यावर बौद्धिक मालकी सांगायला येईल.. हा प्रांत तसा आय पी आर पासून दूर असलेला बरा. असोऽऽऽऽऽ.. रेसिपी सांगतो..

उत्तम दही घ्या. मातीच्या मडक्यात बनवलेले असले तर क्या बात है.. त्याला रात्री कापडात बांधून टांगा..(वाहन असा अर्थ येथे घेऊ नये) सकाळी त्यातील चक्का बाजूला काढा..अन आता त्याच्या आकारमानाच्या अर्धे किसमिस घ्या.. दगडावर वाटता आले तर उत्तम अन्यथा मिश्रणयंत्र(आंग्लभाषेत मिक्सर) चालेल. ती पेस्ट, चक्क्यात मिसळून चमच्याने २० मिनिटे घोटा.. त्यात थोडाफ़ार सुकामेवा टाका..आणि पुन्हा तेवढेच घोटा... श्रीखंड तयार!

महाराष्ट्राच्या श्रीखंडाचा जुळा भाउ तुम्हाला आढळेल बंगालमध्ये. ते त्याला मिष्टी दोही म्हणतात. बंगाल जादूसाठी प्रसिद्ध आहे. मिठाईचे विश्व हा देखील जादूचा प्रांत आहे. येथे अनेक लहान लहान ट्रीक्स असतात ज्या जिभेला चवीच्या विलक्षण वैविध्याने सुखाऊन जातात. मिठाई तीच, पण वेलची किंवा केशर यांच्या सहवासात अमुलाग्र बदलून जाते. श्रीखंड सुद्धा कधी आम्रखंड तर कधी व्हॅनिला, रास्पबेरीच्या संगे जुन्या युगाची कात टाकून "इंटरकॉन्टीनेन्टल" होऊन जातं. या पदार्थाची थोरवीच इतकी की देव सुद्धा संत एकनाथांच्या घरी या नांवानं वर्षानुवर्षे राहिला. नाथांघरी राबणारा श्रीखंड्या हे ईश्वराचं मनोहारी रुप, पूर्णयोगी श्रीएकनाथांना पण कळलं नाही..

दादर स्टेशनचा दादरा उतरून खाली येताच हसतमुखानं स्वागत करणारं कैलास मंदीर... तिथं चमच्यानं लस्सी "खातात".. सोनी वाल्यांनी "लस्सी जैसी कोई नहीं" बनवायला घेतल्यानंतर स्टॊरीत थोडासा चेंज झाला हे माझ्या एका मित्रानं मला सांगितलं होतं म्हणून शेवटी "ल चा ज केला" असोऽऽऽऽऽऽऽऽ.. पण मी ऐकलंय की कित्येक श्रीखंड विक्रेते तिथून लस्सी घेऊन जात आणि श्रीखंड म्हणून विकत असत. याच श्रीखंडावर अनेक माजघरातल्या "आर अँड डी" टीम्स राब राबल्या.. त्यातून जिव्हासुखोपनिषदातील अनेक रह्स्यं उलगडली. श्रीखंड पुरी चं नातं, हीर रांझा, लैला मजनू सारखं चिरंतन आहे.. दोघांना एकमेकांशिवाय अस्तित्वच नाही मुळी!

2 comments:

Asha Joglekar said...

वा रमण भाई मस्तच.

रमण ओझा said...

Manahpurvak Dhanyawaad Ashaaji. :)