स्वशुरगॄही करी वास, तो येक मूर्ख।
असा दासबोधाचा अभिप्राय असोनही आम्ही आत्यंतिक नाईलाजाने कधी कधी जात असतो तेथे.
मुख्य म्हणजे मला त्या परिसराची ओढ आहे.
वाडी आणि औदुंबर आहेच आहे.
कृष्णामाईच्या कुशीत बहरलेला रम्य परिसर पहाण्याची मौज वेगळीच आहे.
परंतु या सर्वांपेक्षा अति-महत्वाचे व अतिगोपनीय म्हणजे तिथे खाण्याची चंगळ असते.

सांगलीच्या भोरे बंधूंचे आमचे विश्वबंधुत्वाचे नाते आहे.

"भडंग" हा प्रकार जर आपणास माहिती नसेल तर आपले जीणे व्यर्थच नाही तर "भणंग" होय असे आमचे निश्चयात्मक आणि निःसंशय मत आहे.

एकट्या सांगली शहरात भडंग बनवणारे अनेक उद्योजक आहेत.
पण भोरे आणि गोरे हे दोन तिथले सर्वेसर्वा...पैकी "भोरे-भडंग" आम्ही जिव्हाळ्याने खात असतो. सांगलीचा आणखी एक उत्तम पदार्थ म्हणजे तिथली भेळ..

भेळ म्हणजे या विश्वाच्या पसा-यासारखी.
हे विश्व तसे विश्वकर्म्याच्या अनेक रचनांची भेळ आहे.
हॅल्डेन नांवाचा वैज्ञानिक होवून गेला.
तो म्हणाला होता की हे विश्व नुसतेच भासते तितके अजब नाही तर आपण कल्पना करू शकू त्याहीपेक्षा अधिक अजब आहे.


निसर्गाशी मैत्री केली तर ती जास्त फलदायी!
डॉर्विनसारखा अत्यंत निरीश्वरवादी वैज्ञानिकसुद्धा म्हणालाय "निसर्गाशी अनुकूल व्यवहार करावा तर जीवन उत्क्रांत होते"..त्या विश्वात्मक शक्तीला तुम्ही देव म्हणा अथवा निसर्ग म्हणा किंवा चार शिव्या द्या. तिला काय फरक पडतो? एक मात्र खरे की त्या शक्तीला प्रेमानं वंदन केलं तर ती वात्सल्याचा वर्षाव करते. "


हे विश्व प्रचंड अजब आहे, हे हॅल्डेनचं म्हणणं तसं खरं आहे.
पण जरा भारतीयतेच्या जाज्वल्य अस्मितेने बघा मग दिसेल की विश्वाकडे पहाण्याचा ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टीकोन कसा स्वच्छ आहे..
"हे विश्व नव्हे रे माया, ही तर प्रभूची काया"...
माउलींच्या ओव्यांमध्ये पदोपदी ही ओळ येते.. "विश्वात्मके देवे..... सर्वात्मका ईश्वरा... वगैरे वगैरे.."
साक्षर असलेल्या पण संकुचितपणा न सोडणा-या बुद्धीजीवी लोकांचा हा भ्रम असतो की धर्म वाटोळे करतो.
यूरोपचे वाटोळे जीझस ने केले नाही.
प्रेमाची मूर्ती होता ख्रिस्त.
येशू ख्रिस्ताच्या "कार्यकर्त्यांना" तो कळाला नाही.
कानडा राहिला ख्रिस्त..पंढरीच्या राजासारखा..
Queerer to understand..
difficult to percieve...
आपली चर्चेस मधून थाटलेली दुकानं कशी चालणार या भयापोटी गॅलिलीओ सारख्या निष्पाप लोकांना चर्च ने त्रास दिला. पण तो ज्यानी दिला त्यांना ख्रिस्त कळाला नाही. बायबल उमजले नाही.
ख्रिस्ताचे चरित्र फक्त दोनच शब्दांत लिहीता येते..
"लव्ह" आणि "फर्गिव्हनेस"..
धर्म कुणाचेच वाईट करत नाही. फक्त आमचा दुराग्रह वाईट असतो.


मेंडेल सारखा वैज्ञानिक उपेक्षित राहिला आणि हे जग अज्ञाताचे वस्त्र पांघरुन सोडून गेला. त्याला कारण वैज्ञानिकांचे दुराग्रह!!!!!!!!!!!!!!!!!!!! नॅगेली ने विनाकारण केलेला मेंडेलचा द्वेष आणि डॉर्विनची प्रसिद्धी यामुळे मेंडेल दुर्लक्षित अवस्थेत मेला. त्याच्या मृत्य़ूच्या सतरा वर्षांनंतर तो जगाला माहिती पडला. वैज्ञानिक दुराग्रहाचा हा सगळ्यात मोठा "बळी" आहे.
मॅक्स प्लॅंक चे एक वाक्य मला खूप आवडते....
Science is what "it"is.. and Religion is what "it "should be!!"
विज्ञान म्हणजे वास्तवाचे प्रकट दर्शन होय, आणि ते वास्तव कसे असावे याचे मार्गदर्शन मात्र धर्म करतो"..
विज्ञानाला स्वतःची चव नाही.

भेळेतल्या चुरमु-यासारखी विज्ञानाला स्वतःची चव नाही ....
पण महत्वाचा घटक चुरमुरेच असतात. त्यात जीवन-रसाचा आत्मरसाचा मसाला टाकून मस्त भेळ बनवावी.. आणि चव घेऊन खावी..


सी या..