Saturday, December 6, 2008

धपाटे

आज काय बरं खावं??????? अश्या महत्वाच्या काळजीत मी पडलो होतो.माझं हे खाण्यावरील प्रेम पाहून माझा एक समाजवादी मित्र मला म्हणाला होता. " खायला काही मिळेल का या विवंचनेत अर्धपोटी जनता असताना तू मात्र काय खावं या काळजीत असतोस!!! शेम...शेम...शेम" पण तुम्हाला सांगतो ..या मित्राचे विचार कितीही क्रांतीकारी असले तरी स्वतः उपोषणाला बसताना सुद्धा ते चक्री उपोषण आहे याची खात्री करुन तो बसत असतो. असोऽऽऽ...

समर्थांनी सांगितलेलं असून सुद्धा मी राजकारणापासून चार नाही, चाळीस हात दूर असतो. एकतर आपल्याला अमर रहे, विजय असो... आवाऽऽऽज कुऽऽऽनाचा.. असे ओरडता येत नाही.

एकदा असं झालं.. काही तरुण कार्यकर्ते अचानक घरी!!...
गणपतीची वर्गणी मागितल्यावर मी लोकमान्यांना स्मरून त्या विधायक कार्याला देणगी दिली.
"गनेश मंडळाची वर्गनी, तुमच्या सारक्या लोकावान्नी येवडी कमी दिउन कशी चालंल???" या देशातील तरूण पीढीसमोर असलेल्या महत्वाच्या समस्येचं निराकरण करत होतो. चहा "सुद्धा" पाजला. फक्त त्यात साखर कमी असल्यामुळं मी साखर कपात टाकून कुटुंबास हाक मारली... " अगं, एक चमचा हवाय..."तेवढ्यात हा कार्यकर्ता बिथरला, म्हणाला, "ओऽऽऽऽ सायेऽऽब, तोंड सांबाळून बोला.. चमचा कुनाला मन्ताय? ऑऽऽऽ"...
तेव्हापासून मी चमचा हा शब्द वापरणं बंद केलं आहे. आता किचन मधल्या चमचाला सुद्धा कार्यकर्ता म्हणत असतो!!! ते सुद्धा ,आदराने... असोऽऽऽ

समाजवाद, साम्यवाद, आणि बाकी सर्व परिवर्तनाच्या उजव्या आणि डाव्या संकल्पना या माझ्या साबुला(सामान्य बुद्धीला) न कळाल्यामुळे मी राजकारणापासून चाळीस हात दूर असतो.. माझ्या अस्वस्थ मनाला काळजी एकच होती.. "आज काय बरं खावं?" तेवढ्यात खटल्याचा ( पुन्हा आठवण करुन देतो, मराठवाड्यात बेटर हाफ़ साठी वापरला जाणारा शब्द-खटले)आवाज कानावर आला.." आज धपाटे खाणार काऽऽऽ?" .

मी घाबरलो भयकंपित झालोकाळजाचा ठोका चुकला श्वास थांबला.. मज पामराकडून कडून असा काय बरं अपराध घडला असावा असं मी स्वगत म्हणत होतो.. स्वगतावरुन आठवले, आपल्याच घरात असा एकाकी पडलेल्या या अप्पा बेलवलकराला कुणी चहा देता का चहा??? हे स्वगत सुद्धा मी आजवर कितीतरी वेळा म्हणालोय.असोऽऽऽ

तेवढ्यात कुटुंबाचा आवाज पुन्हा कानावर आला, " अहोऽऽ धपाटे करु का खायला? लोणी आहे सोबत"....

हुऽऽऽऽश्शऽऽऽऽऽ... आता कुठं जीव भांड्यात पडला. I thought that was something else..

ज्या पामराला धपाटे आणि थालीपीठ या दोन पदार्थांची ओळख नसेल तर त्याला महाराष्ट्र कळाला नाही आणि शाकाहार जीवनावर शतदा प्रेम करायला शिकवतो हे ज्याला कळालं नाही त्याला हा देश कळाला नाही..

आमच्या मराठवाड्यात आणखी एक न्याहरी चा पदार्थ असतो.. " तो म्हणजे दुधाची दशमी!!!" दशम्या कमीत कमी, दहा पदार्थांसोबत खाता येतात म्हणून बहुतेक त्याला दशमी म्हणत असावेत. दशमी लोणचे, दशमी गोडांबा, दशमी कारळे चटणी.. वगैरे वगैरे.. बट, बेस्ट कॉंबिनेशन इज- दशमी विथ शेंगा चटणी ऍंड दुधावरची साय" दीज टू.. कालवलेलं टूगेदर...

कार्तिकी आणि आषाढी वारीला, "तुळशी हार गळा.." चे बरवे रुप पहावयास जाणारा वारकरी दशम्या बांधून घेतो. दशमी कमीत कमी २-३ दिवसांपर्यंत खाता येते अन असते छान.. गोड... बटर नान ची इंटरकॉंटीनेन्टल मान सुद्धा गुपचुप खाली झुकावी असे या पदार्थाचे मराठमोळे माधुर्य...

दशमीचा तिखट भाषेतला रीमेक म्हणजे धपाटे...

ओऽऽऽकेऽऽऽऽ फायनल....नाउ डिसिजन... फ़िनीश...
मी कुटुंबास फरमान सोडले " आज जहांपनाह धपाटे खायेंगे.. पेश किये जाय, और साथ में दो कार्यकर्ता मख्खन भी हाजिर होऽऽऽऽ!!!"

सी.. या.. चाव....हॅप्पी धपाटे...

No comments: