Saturday, December 20, 2008

भिन्नरुचीरसिका..


जवळपास दीड तप लोटलं असेल. परळच्या दामोदर हॉल मध्ये , रंगमंचावर ठळक लिहिलेल्या कालिदासाच्या ओळी आठवल्या. "भिन्नरुचीरसिका नाटक देई पूर्ण समाधान"...


अभि"रुची" चा अभिजात आणि खानदानी साज, इतका अप्रतिम बाकी कुठल्या रंगभूमीला मिळाला नसेल.
संस्कॄत भाषेच्या रसवैभवानं सुसमृद्ध, शाकुंतल, मेघदूत सारख्या सुरेख रचना असतील किंवा मग वासवदत्तेचं उपगुप्तावर प्रेम सांगणारं बौद्धकाळातलं विरागी नाट्य असेल, या भूमीला अभिजात परिमलाचं अखंड वरदान आहे.

नटराजाची पूजा करून त्या परंपरेला स्मरून इथला "रंगमंच की कठपुतलीयों का खेल सुरु होतो".

॥ यत क्रौन्च मिथुनादॆकम शोकम अवधीम काम मॊहितम ॥
असं कळवळून उच्चारणारे वाल्मिकी ..
क्रौंचपक्ष्याच्या विद्ध ह्रदयाचा वेध घेणा-या बाणातून "सृष्टीचं पहिलं महाकाव्य" जन्माला आलं !!!

प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट..
काय नाही रामायणात???
शिवाची आराधना करून गाणारा, वैभवाच्या राशींवर लोळणारा पण आसक्त रावण आहे.
प्रारब्धयोगनं राक्षसाच्या कुळातच जन्मलेला पण शाश्वताची ओढ असलेला विभीषण आहे.
श्यामल लावण्य असलेल्या रामावर आजीवन प्रेम करणारी जानकी असेल किंवा आपल्या दैवताला उत्तम चवीची खाता यावीत म्हणून उष्टी बोरं घेऊन वाट पहाणारी भाबडी शबरी असेल..
एकेक पात्र कसं "लार्जर दॅन लाईफ"..
बरं नाटककार पण कसा वाल्मिकींसारखा..
निष्पाप लोकांचा दिड-दमडीसाठी वध करणारा वाल्या पण नारदाच्या उपदेशानं अमुलाग्र बदललेला..

रामायणाची सुरुवात करताना तुलसीदासांनी एक सुंदर रुपक वापरले आहे.
" भवानी शंकरौ वंदे, श्रद्धा- विश्वास रुपिणौ..
जगन्माता पार्वती "श्रद्धा" तर आशुतोष भोलेनाथ "विश्वासाचं" प्रतीक आणि मग येते ओळ..

"
स्वान्तःसुखायः तुलसी रघूनाथगाथा..."
या रचनेचा हेतु, स्वान्तःसुख एवढाच आहे.


एखाद्या पाकसिद्ध गृहीणीसारखा. उत्साहानं खाऊ घालते. त्यात भिन्नरुची-रसिकाच्या चोचल्यांचं भान आहे आणि चवीनं खाणारे उजळलेले चेहरे बघून ती कशी तृप्त !!

तिला खायला मिळो अथवा न मिळो, इतरांच्या आनंदात तृप्त असते.. "या इतरांच्या आनंदासाठी जगणा-या हळुवार जीवांना आनंदघन भेटून जातो"..

आरती प्रभू म्हणतात..

"परसातील वॄक्षलतांना तू घालीत जावे पाणी..
सुचतील वेडे तुजला, मग सरणावरती काही गाणी.."

भक्तीशास्त्रात कीर्तन हा एक नाट्याचा आकृतीबंध असणारा प्रकार आहे.
समर्थांसारखे विरक्तच ख-या अर्थाने अभिजात कलांचे रसिक असतात.
" लेखन कसं असावं पासून विमळ-कवित्व कसं असावं आणि त्यावर मुकूट म्हणजे, धन्य ते गायनी कळा.."

या सगळ्यांचा वेध दासबोधात घेता घेता समर्थ आपला साक्षेप जागा करून जातात.

संसार हाचि दीर्घस्वप्न। लाभे ओसणती जन।
पुत्र कांता धन, म्हणती माझे॥

मूर्खामाजी परम मूर्ख। जो संसारी मानी सुख।
संसार-दुःखायेवढे दुःख। जगी नाही॥

किर्तनाला त्यांनी "करुणा-कीर्तन" हा शब्द वापरला आहे.
वरचेवर या कलेचं अभिजातपण लोप पावत आहे.
करुणाकीर्तन, नाहीसे होत होत, आता ते "ग्लॅमर-किर्तन-इव्हंट" बनत आहे.

नाट्यात सुद्धा पुल, मतकरी, तेंडुलकर य़ांच्यासारखी "भिन्नरुची-रसिका नाटक देई पूर्ण समाधान" चा नियम अंगिकारणारी रंगभूमी ज्या मातीत आहे, त्या मातीची ओढ माझ्या चोचलेबाज जीभेला का नसावी??

..इथल्या पिंपळपानावरती अवघे विश्व तरावे...

आदि शंकराचार्यांच्या ओळी आठवल्या

" नटित- नटार्ध नटी नट नायक, नाट्य ननाटित नाट्यरते।
जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते"...

चलो निघतो आता..
हॅप्पी नटराज.. सी या..

2 comments:

यशोधरा said...

झकास एकदम! खूप छान वाटलं वाचायला, धन्यवाद.

रमण ऒझा said...

Mana:Purvak Dhanyavaad Yashodharaji.
:)