Tuesday, December 16, 2008

आजोबा

दोन दिवसांपासून पहातोय...
आजोबा शांत शांत आहेत.
गावाला जाणार आहेत आता.
डोळ्याच्या डॉक्टरानं त्यांना प्रवासाला होकार दिलाय.
अन सांगू नका त्यांना... मी पण त्यांना टाळतोय.
तासभर वाचनासाठी समोर.. ते परत जाणार म्हटलं की मी पण कावरा बावरा होवून जातो.

आजोबा म्हणजे हटटी प्रकरण.
त्यांची पण रास धनू.
.
आता ते पैठणला जाणार आणि तिथून भावाकडे..

पैठण आजोबांचं आवडतं स्थान.
त्यांचे अत्यंत आवडते संत, एकनाथांचं ते स्थान आहे.
मी पण जात असतो तिकडे, नाही असं नाहीऽऽ.

पण नाथसागर जलाशयावर येणारी परतीची, तमा नसणारी, देशोदेशीची पाखरं पहावी म्हणून!
ज्ञानेश्वर गार्डन मध्ये फोटो काढलेत आम्ही फुलांच्या झाडाजवळ बसून.. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला...

आजोबांच्या सोबत मी एकदा, गावातील एकनाथ महाराजांच्या घरी गेलो होतो...

जेव्हा जेव्हा आम्ही तिथे जातो तेव्हा तेव्हा मी आजोबांकडे , शांतपणे पहात असतो..
आजोबांचे थरथरते हात काठीवरून सरकतात आणि सद्भावांची ओंजळ धरून उभे रहातात त्या एकनाथांच्या रांजणासमोर...

डोळ्यांच्या खाचा चिंब चिंब..
मला अजूनही कळालं नाही...
आजोबा हे असं का करतात?
काय आहे त्या एकनाथांच्या वास्तूत तसं?
आणि रडून काय मिळतं?
आपल्याला नाही बाबा हे कळत..

मी पण "श्वास" पहात असताना असाच रडलो होतो.
परसु चे प्रेमळ आजोबा आणि त्यांची घालमेल पहाताना मला माझे आजोबा आठवले..
"व्वा व्वा, चित्रपट असावा तर अस्सा, अशी बडबड करणारे लोक..त्यांचे डोळे दुष्काळाने गांजलेले, बरसत नाहीत..कधीच.. असे लोक आमच्या आजोबांना भेटले पाहिजेत एकदा आणि तेही पैठणला, नाथांसमोर स्तब्ध उभे असताना..भावमग्न..

होतं ना असं कधीतरी, प्रत्येकाचं आपलं आपलं भावविश्व असतं.
माणूस होवून जातो हळवा..

लग्नाला एक तप उलटल्यावर देखील...
सांगली( सासरवाडी आमची) सोडताना... माझी एरवी माझ्यावर भयंकर भडकणारी, कणखर पत्नी सुद्धा खिडकीतून कॄष्णेच्या पात्राकडे पहात, असंच डोळ्यांच्या कडा टिपत असते..

पण मी शांतपणे ड्रायव्हींग करत असतो...
रडून काय मिळतं?
आपल्याला नाही बाबा हे कळत..

आजोबांना वाचून दाखवण्याचा माझा हा शेवटचा दिवस..

मी गाथा घेवून हजर झालो.
आजोबा म्हणाले, " ठेव ते पुस्तक बाजूला.अरे वाचनाचा व्यासंग असावा पण ते नीट उमजले पाहिजे ना.. त्यासाठी वेळ द्यावा, आपण.पैठणला आणखी दोन संत होवून गेले.. अमॄतराय आणि श्रीकॄष्ण दयार्णव ".

अमॄतरायांचं एक पद सांगतो..ऐक नीट..हे संत म्हणजे या मातीचं वैभव आहेत, बेटा..
या देशात जन्म मिळण्यासाठी जन्मोजन्मीचं भाग्य लागतं..

समर्थांच्या चरणी विनटलेले शिवबा असोत वा रामकॄष्ण परमहंसाचे भक्त स्वामी विवेकानंद,
योगी अरविंद असो वा भर सभेत गजानन महाराजांचे आशीर्वाद मिळालेले लोकमान्य टिळक..
आनंदमयी मां ची करुणादॄष्टी असलेल्या कमला नेहरु असोत वा स्वामी चिदानंदांचे आशीर्वाद मिळालेले अब्दूल कलाम.. या देशाच्या कणाकणात संतकॄपेचा परिमळ दरवळतो.


मी म्हणालो, "आजोबा, तो अमृतरायांचा अभंग कोणता, सांगत होता तुम्ही..
मी विचार केला, कदाचित त्यात खाण्याचे काही मिळून जाईल, एखादेवेळ...."

आजोबांनी अभंग ऐकवला..
होता गुरुकॄपा वरदान। तेणे प्राप्त जाले ब्रम्हज्ञान। तेथे संसाराचे भान। आहे आहे, नाही नाही॥
गुरुकॄपेचं वरदान झालेला माणूस, देवदर्शना मुळं परितॄप्त होवून जातो.

मग मी म्हणालो आजोबा, गुरुचं पूजन म्हणजे व्यक्तिपूजन नाही का???? हे चूक आहे ना????

आजोबा शांतपणे म्हणाले- गुरु हा शब्द तुमच्या पिढीनं बिघडवून ठेवलाय खरं तर.. मॅनेजमेंट गुरु, केटरिंग गुरु, डान्स गुरु.. काय काय विचित्र..
मराठी व्याकरणात हा शब्द लघू शब्दाचा विरुद्ध आहे.
म्हणजे जे सर्व व्यापक चैतन्य आहे, ज्यामुळं प्रत्येकाचं अस्तित्व ते तत्व गुरु-तत्व.
ज्ञानोबा, तुकोबा, एकनाथांसारख्या अनेक महापुरुषांमध्ये हे तत्व व्यक्त होत असतं..

ते तत्व सीतेच्या जाज्वल्य पातिव्रत्यात आहे तर वारांगना असलेल्या कान्होपात्रेच्या आर्त आलापात सुद्धा आहे..

शाश्वत सुखाच्या ओढीनं जेव्हा क्षणिक सुखांची क्षितीजं नजरेआड होतात त्या आत्म-मग्न आनंदी वॄत्तीचं बहारदार वर्णन आहे या अभंगात..
आहे आहे, नाही नाही.. म्हणजे आहे तरीही छान, नसले तरीही छान.. पुढची ओळ ऐक..

तुटली संसाराची झेल। भक्ती वाढलीसे वेल। सांजे दिव्यासी तेल। आहे आहे, नाही नाही॥

सेविता सदगुरुंचे कुळ। अवघे त्रैलोक्य गोकुळ। तेथे दास, पुत्र अनुकूल। आहे आहे, नाही नाही॥

को-या घोंगडीचे छीट। मुठभर भिक्षेचे ते पीठ। तेथे भाकरीला मीठ। आहे आहे, नाही नाही॥

पोटी लागलीसे भूक। न म्हणे शिळे साजूक। तेथे पूरणपोळी नाजूक। आहे आहे, नाही नाही॥

अमॄतराय बोले परमार्थन करी कोणासी वादार्थ। समयी लागला पदार्थ। आहे आहे, नाही नाही॥

मी आजोबांना भाबडेपणाने म्हणालो
आजोबा, हाच अभंग असा असला असता तर????

भारी भारीचे व्हेईकल। त्यामध्ये पेट्रोल। अथवा अन्य ते डिझेल। आहे आहे,आहे आहे॥
पोळी नाजूक नाजूक। त्यावरी तूप ते साजूक ।पोटी सदोदित भूक | आहे आहे आहे आहे॥

आजोबा हसले.. तुझं खाण्याची ओढ काही जाणार नाही..

असोऽऽऽ.. आजोबांची बॅग भरायची आहे.. ते जाणार आहेत गावाला...

चलो , सी या.. टेक केअर..
हॅप्पी केअर..

आता हॅप्पी असं म्हणणं माझा यु. एस. पी. बनणार बहुतेक.. असोऽऽऽ
हॅप्पी यू एस पी..

No comments: