Saturday, November 29, 2008

ग्रेसफुल घासांचा तो आठव

आहारमग्न पुरुषाची लक्षणे, रसनामाधवीच्या प्रदेशात, ही माझी खाण्याच्या अमूर्त शैलीत लिहीलेली आणि प्रकाशनाच्या वाटेवर असलेली पुस्तके!... त्यातल्या कांही ओळी तुमच्यासोबत प्रकाशन-पूर्व कार्यक्रमात आमचे प्रकाशकांच्या परवानगीने शेअर करत आहे.

कु.चिंकी हे ऐकून मला म्हणाली, काकाऽऽऽ, तुम्ही कित्ती, कित्ती "ग्रेसफुल" लिहीता? असोऽऽ

त्या पुस्तकातील हा निवडक आणि वेचक भाग...

अवकाशाच्या पाटाभोवती नक्षत्रवेलींची भावरांगोळी..
प्राक्तनाच्या चंद्रताटात झडती नित्य जेवणावळी!
घेतो गोड घास सुखाचा,पण कंठातून उतरत नाही..
चवविहीन त्या घासांचा तो आठव जातच नाही.. ...

बस्स्स्स.. प्रकाशकाची यापेक्षा अधिक लिहीण्यासाठी परवानगी नाही.

समूर्त असो वा अमूर्त सौंदर्य सगळीकडेच आहे. सौंदर्य पहाणा-याच्या दॄष्टीत असते... अन चव खाणा-याच्या जीभेत ! मला ऐकू येतंय बरं तुम्ही माझ्या या शब्दफराळाला दुर्बोध म्हणताय ते.. असोऽऽऽ चलतो मग... प्रकाशन समारंभाला यायचं हं!निमंत्रण पत्रिका आली नाही तरीही..

"नसे राउळी वा नसे मंदीरी, जिथे राबती हात तेथे हरी!

"नसे राउळी वा नसे मंदीरी, जिथे राबती हात तेथे हरी!
तुम्हाला सांगतोऽऽ, बाबूजींचे गाणे ऐकले की प्रेरणा, स्फुर्ती या सगळ्या भगिनी मिळून भेटायला येतात..
हेच गाणे का ???????? [:O] असा तुम्हाला प्रश्न पडला असेलच! स्वयंपाकघरात आज भांडी जास्त आणि भांडीवाल्या काकू आल्या नाहीत, त्यामुळे माझे हात राबत असून तेथे हरी आहे अशी स्वतःच्या आवाजात आणि बाबूजींच्या गीताने मी स्वतःची समजूत घालत आहे!जिथे राबतीऽऽ हात तेथेऽऽऽ हरी!!!

हा तवा, नुसता नावापूरता निर्लेप... पण किती बरे घासावा लागतो??आज अचानक मला दास कॅपिटल ची आठवण झाली. पॄथ्वी ऍटलसच्या मानेवर उभी नसून ती श्रमिकांच्या बाहूंवर उचललेली आहे असे वाटत आहे कारण एकच, आज हा तवा स्वच्छ करायचा असे ठरविले आहे. तसा मी निर्धाराचा पक्का आहे. भारतीय पद्धतीने आपली रास "धनू!" त्यामुळे तव्यावर चिकटलेले खरकटे जितके चिवट त्यापेक्षा अस्मादिकांचा स्वच्छतेचा प्रयत्न जास्त! प्रापंचिकाची वॄत्ती तव्यासारखी, काळी कुळकुळीत, परत वैश्वानराच्या आगीने ती तापत रहाते.अनुभवाच्या आचेवर हाताला चटके बसतात आणि नंतर मिळते भाऽऽकर! पण ज्या तव्यावर या भाकरी तयार होतात तो खरकटा होवून जातो. नित्यानित्यवस्तूविवेकाचा बार घासावा लागतो मग. बघाऽऽ भांडं कसं चमकत आहे, नऽऽई!! :)
हुश्शऽऽ.. Thats all at my end... ..हॅप्पी मोलकरीण.

Wednesday, November 26, 2008

"नाष्ता माझा"

चिरणार असेल कांदे कोणी तर भजी तळण्यात अर्थ आहे.. नसेल मिळत जर पाव तर मात्र वडा ही व्यर्थ आहे... अशी एक चारोळी मी "नाष्ता माझा" नांवाच्या काव्यसंग्रहाच्या पहिल्याच पानावर टाकणार आहे. बघाऽऽऽ.. असा निष्पाप मनाने मी आपल्याला बौद्धिक संपदेच्या गुप्त गोष्टी सांगत असतो आणि त्या कुठूनतरी लीक होतात.. असोऽऽ
नशीब ज्याचे त्याचे.. .
मुंबईत पाव-ला पाव-ला वर वडापाव मिळतो. वडा या विषयाचे इतिहासाच्या अनुषंगाने चिंतन केले तर जाणवेल की हा पदार्थ बेसन आणि बटाटा यांचा मध्य-अर्वाचीनकाळात प्रादुर्भाव झाला आणि जेव्हा वन-मानव नुकताच शेती करू लागला होता आणि त्याला तळणे या क्रियेचा अपघाताने शोध लागला होता, त्या काळी मानवाच्या जीवनात आला. पाकशास्त्राच्या शोधनिबंधासाठी या माहितीचा उपयोग करणे असेल तर विनासंकोच संपर्क करावा. बटाटे-वडा या प्रकाराचा पहिला भूगर्भातील अवशेष, मुंबईजवळच आढळला होता असे पण माझ्या व्यासंगी वाचनात आलेले असून मी नम्रपणे तुमच्या सोबत ते शेअर करीत आहे.
कल्पना करा की एक वडा आपल्यापासून दोन प्रकाश-वर्षे दूर आहे आणि तो दुर्बिणीत दिसला तर प्रकाशाच्या वेगाने गेल्यास आपण दोन वर्षांनी तिथे पोहोचू ...... अर्थात दुर्बिणीत आज दिसणारा , या उदाहरणातला वडा दोन वर्षांपूर्वीचा असून पॄथ्वीवर आज दिसतो, तात्पर्य तो शिळा आहे. असेच कांही प्रयोग आता चंद्रावर करून पहाण्याने मानवजातीचे दुःख हरण होईल असे आमचे वि, नि. का.(विज्ञाननिष्ठ काका)म्हणतात.. असोऽऽ .तूर्तास त्यांच्या व्याख्यानाला जायचे आहे .. हॅव अ टेस्ट्फूल वडा.. C YA..

Tuesday, November 25, 2008

आपण करु शुद्ध रसपान रेऽऽ!

खादी ग्रामोद्योग मंडळाचे मधूघट रिकामे पडेपर्यंत दरेक हिवाळ्यात मी थेंब ना थेंब स्वच्छ करत असतो....
थंडीच्या महिन्यात मधावर जीव जडणारे आम्ही दोघेच.
मी आणि मधमाशी!

आपण करु शुद्ध रसपान रेऽऽ!!! असं स्वतःला म्हणत मधून मधून आम्ही कविताशाखेच्या कुसुमांवर फेरी मारत असतो. >:D< ..... अभिरुचीच्या परिमळाची धाव दूरपर्यंत मनाच्या भ्रमराला साद घालते अन मग रुणुझुणू रुणुझुणू करत हा भ्रमर शेवटी कविताशाखेच्या कुसुमांवर येवून गुंजारव करत असतो. सकाळी सकाळी मधाळ चमचा तोंडात धरताना "गॄहलक्ष्मी" च्या डोळ्यात मला कल्पना चावलाचा दुर्दम्य आत्मविश्वास दिसतो. :P चलाssssss मधानं तरी माझा भूभार काही उतरेल या तिच्या भाबड्या अपेक्षांना फार अर्थ नाही हे मलाच माहिती असतं. :D .. माझ्याप्रमाणे कुणाला थंडी गुलाबी वाटते तर कुणाला तिच्या अंगावर काटा आणण्यामुळं गोरगरीबांचं काय होत असेल असं वाटत असतं.
पण बेगडी सत्कारांमध्ये झुलीसारखी अंगावर चढवलेली शाल अश्याच उघड्या देहावर टाकण्यासाठी मन कसं मधासारखं असलं पाहिजे ना! गोऽऽड!!!

Monday, November 24, 2008

देस में निकला होगा चांद

हम तो हैं परदेस में , देस में निकला होगा चांद... जगजीतसिंगच्या खर्जात या ओळी ऐकताना आमच्यासारख्या कधीच परदेशात न गेलेल्यांचं ह्रदयसुद्धा गलबलून जातं. मग जे प्रत्यक्ष तिथं रहातात त्यांचं काय म्हणावं!

मेस वाला जेवढं रद्दी जेवायला घालतो तितकं घरचं जेवण प्रकर्षानं जाणवतं. तसंच परक्या भूमीत या मातीची ओढ अनिवार होवू लागते. पंकज उधासचं " चिठ्ठी आयी है" ऐकताना "पहले जब तू खत लिखता था, कागज में चेहरा दिखता था".. या ओळी याहू आणि व्हीडीओ चॅटमुळं कालबाह्य झाल्या परंतु आईनं आग्रहानं वाढलेल्या आणि तुपात चिंब भिजलेल्या पुरण-पोळीचं ऑनलाईन स्ट्रीमींग कै होत नै राव!

इ-फराळ आजकाल परदेशात घरपोच पाठवता येत जरी असला तरी, भरल्या डोळ्यांनी आपलं पोट भरलंय की नाही हे बघणारी माणसं तिकडं भेटणं यासाठी जन्मोजन्मीचं बहु पुण्य लागत असणार..

Saturday, November 22, 2008

सच्च्या रेसीपीज

लहान मुलं कशी, मनापासून जगतात!
खेळणं मनापासून..
भांडणं मनापासून..
रुसणं मनापासून आणि हसणं सुद्धा मनापासून!!!!!

चित्त कसं निर्मळ.. भांडणं विसरून, रुसवा विसरून, पुन्हा दंगामस्ती!!!

बच्चे-कंपनीचा आणखी एक सदगुण शिकण्यासारखा, तो म्हणजे एखादा पदार्थ खाताना आवडला नाही की सरळ सरळ त्याला नकार असतो आणि एखादा पदार्थ खूप खूऽऽऽऽप आवडला हे पण कित्त्तीऽऽऽऽ कित्त्तीऽऽऽ मनापासून सांगतात! शाळेच्या मध्यंतरात शाळेबाहेर एखादं पॉपिन्स किंवा च्युईंग गम घेउन बेस्ट फ़्रेंड सोबत शेअर करायचं आणि त्यातल्या स्टीकर्स आणि टॅटूज चं मस्त कलेक्शन करायचं!! अपनी दुनिया के सिकंदर असतात बच्चा-पार्टी!

कधी हॉटेलात त्यांना घेउन जावं तर त्यांचं खाणं ते किती? पण मेनू कार्ड चं अक्षरशः R & D चालू असतं, मुलांचं! क्षणिक प्रतिमांच्या भ्रमात सापडलेले आपण मात्र या "सच्च्या रेसीपीज ना मुकतो" ... निरागस बालपणाचं, फाकिरचं शब्दचित्र उगाच मनाला भावत नाही!! "...भरी धूप में, चल के घर से निकलना , वो चिडिया वो बुलबुल, तितली पकडना , वो गुडिय़ा की शादी में लडना झगडना...!!!"

hmm.. तोंडात एखादं, चॉकलेट टाकलं की कसं बालपण आठवायला लागतं ना!!!

Friday, November 21, 2008

गंपूकाकांच्या कल्पनाची मला खाऊ घालण्याची अनिवार इच्छा असते!!! मग ती एखादी डिश करुन वाढते सुद्धा! पण तो पाकशास्त्राचा विनोद काही केल्या जीभेला झेपत नाही! ती एकदा मला चिडून म्हणाली सुद्धा!!! की तुमची अज्ज्जूऽऽऽन टेस्ट डेव्हलप झाली नाऽऽऽऽऽही!!!! काय करणार? आपला स्वभाव भिडस्त, उगाच खावं निमूट... हौसेनं बोलावून वाढलंय तर! पण राव कधी मनात येतं की सरळ स्पष्ट म्हणावं - तूझी टेस्ट बिस्ट घाल तिकडे "ओव्हन" मध्ये... :P चोचलेबहाद्दरांना हे कचकड्याचे पदार्थ पचणार कसे? असोऽऽऽ
पण जेवू घालतीये नाऽऽऽ :) :) ... फरगेट अदर मॅटर्स.. बी अ स्पोर्ट !!!!!!!!!! (हे आमचे स्वगत :P )
इथं जेवणाचा विषय चाल्लाऽऽय़ अन आम्हाला माउली आठवणार नाय??????? कसं शक्य आहे??????
ओवी आठवली माउलीची-
"कुमुद दलाचेनि ताटे। जो जेविला चंद्रकिरणे चोखटे।
तो चकोरु काई वाळवंटे। चुंबितु असे?"

एकदा चोचल्यांची ओढ लागली की बेचव कै आवडत नाय राव !!!!!!! कल्पनाला एकदा सांगायचंय- माझ्या माउलीच्या हातचं एकदा जेऊन बघ!!! चव जीभेवरनं उतरणार नाही!!!! पऽऽण जाउ दे, तीची अज्ज्जून काय टेस्ट डेव्हलप झाली नाय!!!

Wednesday, November 19, 2008

खावयाऽऽऽऽऽऽ कधी गं देशील तू??

दिवसामागुनि दिवस चालले ऋतू मागूनि ऋतू, खावऽऽऽऽया, कधी गं देशील तूऽऽऽऽ? खावऽऽऽऽया, कधी गं देशील तूऽऽऽऽ? खावऽऽऽऽया, कधी गं देशील तूऽऽऽऽ??????????

एकांतात स्वरसाधना करताना या गीताचा षड्ज अस्स्सा लागतो, की काय म्हणावं, म्हाराजा!!! हा षड्ज भूक, चव, सुगंध, जीभ, मेंदू आणि ह्रदय या सहा स्थानांवरून जन्मतो म्हणून तो षड+ज हे सुद्धा सांगितिक दॄष्टीकोनातून मी आपणास सांगत आहे( न विचारले तरीही.. :P) ...... आता समेवर येतो, या गाण्याचा या प्रसंगी संदर्भ घेण्याचे कारण एकचि असे ते म्हणजे ही आमची "स्वतःची रचना" !!!!!!!!!!!!!!!!!!! hmmm... हसलात ना कुत्सितपणेऽऽऽ???????????????????? माझ्या या भाबड्या पण सरळ वचनांवर विश्वास नाही नं तुमचाऽऽऽ?????????????????? पुन्हा एकदा जीभेस साक्षी ठेवून सांगतो की हे गीत माझे "स्वरचित" असे काव्य आहे!!!!!!!!!

माझी फार पंचाईत होते आजकाल... स्वगत असे काही लिहावयाचे असे म्हटले की तुम्ही लगेच म्हणता की दिवाकरांची नक्कल केली! बरे, भावगर्भ चिंतन काही लिहो गेल्यास म्हणता की वपुंच्या घरची चोरी केली! बरे, सेवटीं बखर प्रमाण मानोनिया कलम दौतीत बुडवावी ऐसे म्हणता तुमचे जासुद आम्हाकडे इतिहासकारांची सनद चोरलेप्रमाणे पाहतात!
"तेव्हा म्या बापुड्या जीवे! नेमके काय करावे???"... पहा सहज लिहो गेले तरी कविता प्रसवली! आता इथे कविता या शब्दाचा श्लेश नाही हे तरी माझे बापुडवाणे बोल आपण स्वीकाराल की नाही??????? असोऽऽऽ

भारतीय संस्कॄती असं म्हणते की असा एकही साहित्यप्रकार नाही किंवा असं एकही पात्र नाही जे "महाभारताच्या महानाट्यात व्यासांना सुचलं नाही!" व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं असं आमच्या संस्कृतच्या आचार्यांनी आम्हास शालेय जीवनात अध्यापिले होते. त्यामुळे कुठलेतरी साहित्य कुठेतरी वाटते एकसारखे? पण याचा अर्थ असा आहे काय की आपण आम्हावर चक्क साहित्यचौर्याचा आरोप करावा?????? प्राक्तनाच्या ताटात नेहेमीच कार्ल्याची भाजी जरी असली तरी एक गोष्ट खरी की चव भाजीत नाही तर जीभेत असते!!!!!!!!!!!!!!!! असोऽऽऽ
सध्या तरी रियाज करायचा आहे.. मला गावू द्यात. तुम्हास नंतर ऐकवतो..
"खावयाऽऽऽऽऽऽ कधी गं देशील तू?"खावयाऽऽऽऽऽऽ कधी गं देशील तू??"खावयाऽऽऽऽऽऽ कधी गं देशील तू????

Tuesday, November 11, 2008

लठ्ठ होतोय, पण तरीसुद्धा लोणी खातोय ! तुपालोण्यावर आपलं भाऽरी प्रेम.... बटर नं माखलेल्या पिज्झाचा आपण सन्मान करतो.. पण काकडारतीच्या लोण्यावर जीव जडलाय.. काय करणार? तुकोबा आठवले परत.. "मॄदू सबाह्य नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त !" परदुःखानं वितळून जातं ह्रदय त्याचं "लोण्य़ाऽऽऽप्रमाणं"..

हा पदार्थ एकतर इरिव्हर्सिबल आहे.. एकदा शहाणा झाला की पुन्हा काही केल्या दुधात मिसळत नाही..स्निग्ध..मॄदू..

आमच्या उजनीत उत्सव सुरु आहे, कार्तिकी पौर्णिमेचा.. गणेशनाथांचा काकडा सुरु झाला की डोक्याऽऽत अश्या रेसिपीज चमकून जातात..कोप-यात हरिपाठाचा घोष ऐकू येतोऽय.. मंथूनि घे नवनीता, तैसे घे अनंता.. :)...

Monday, November 10, 2008

आता मी मोठ्ठा झालोय! .......................!!!! आईकडे जात नाही.. !!!!!! पण लहानपणी कुण्णी एव्वढस्संऽऽ "कडू" बोललं की मी आईकडे जायचो.... एकदा आईनं माझ्या हातावर आवळा ठेवला. तुरट आंबट आवळा खाउन मी तोंड कस्संऽऽनुसंऽऽ करायचो.. त्यात "जीवनसत्व" असतं हे तेव्हा ठाउक नव्हतं. मग आई म्हणाली, आता पाणी पी... "मग ते पाणी, गोड लागायचं!" आई म्हणायची "जीवनात सत्व" पण अस्संच येतं बाळा...तुरट खारट पदार्थ दैवाच्या ताटात वाढून ठेवलेले असतात.. ते निमुटपणे खाऊन पाणी प्यालास की ते"गोऽऽऽऽड" लागतं!अन म्हणायची.. "शहाणं माऽझं बाऽऽळ.."..!!!!!!!
वेडीच अस्ते नाही का "आई"..?..... :) :)

बाय द वे, काकांसाठीऽऽ आवळ्याचा मुरब्बा आणि नवीन स्वेटर घेऊन जायचा आहे.. हिवाळा सुरु होतोय... आता बलवर्धक रेसीपीज कडे लक्ष द्यावे लागेल.. ... Bye.. Happy Winter... :)

Sunday, November 9, 2008

बेटा टिंकूऽऽऽ, गिव्ह हिम दॅट पार्सल..एन विश हिम हॅऽऽऽप्पी दीवाली.. कमॉऽऽऽऽऽन.. से इट! ...

सालाबादप्रमाणे चिंतोबा आपल्या चिरंजीवांना घेऊन अनाथालयात गेले...
"यू अंडरस्टॅंड नऽऽ बेटाऽऽऽ, दिस पुअर गाय इस ऑर्फऽऽन ना!!!"

टिंकू ने तीर्थरुप चिंतोबांना प्रश्न केला "कॅन वी टेक हिम विथ अस टू होम??" ...
हा अल्गॉरिदम चिंतोबांना नवीन होता! त्यांनी सौ. कडे एक प्रश्नार्थक कटाक्ष टाकला..??? काय समजायचं ते समजले..म्हणाले.."नोऽप, कॉज वी आर प्लॅनिंग टू गो टू ट्रीप नऽऽऽऽ.. !"

एव्हाना ते पार्सल उघडून त्यातला "फराळ" ते"पिटी ऑर्फन चाईल्ड" शांतपणे खात होतं.. अश्या बिगर-मीठाच्या फराळाची त्याला सवय झालीयऽऽ!!...
बाळोबांसारखा संशोधक मागच्या दहा हज्जार वर्षात झाला नाही अन पुढे ही नऽऽ होणेऽऽऽ!!!
शेवटचा फराऽऽळ करु बॉ तिथं म्हणून मी तिकडे गेलोऽऽ.. >:))))))))))<

बाळॊबा मला पाहून म्हणाले, "तुझं फराळ आणि आनंद हे प्रकरण मला वेगळंच वाटतंय.. :O
तुझ्या डोपामाईन लेव्हेल्स तपासल्या पाहिजेत!!"

मनातच म्हणालो.. :) परहॅप्स पप्पू मे, बट धिस गाय कॅन नेव्हर डान्स स्स्साऽऽला!.. :X......... :X ...

मी सटकलो आणि सरऽऽऽऽळ मावशीकडे आलो.. "कित्ती वाळलास रे?" (वास्तविक मी जाड झालोय..)फराळाचं "ताट"(!) समोर.. माझे डॊळे पाणावले.. काय वाटलं ते बाळ्याला अन "त्याच्या हॉवर्ड गॉर्डनरला पण कळणार नाही".. मनात म्हणालो, बाळ्या, "तुळशीच्या लग्नाला येणार असशील तर चार मंगलाष्टकं पाठ करुन येऽऽ !!!!तुझ्यासाठी पण फटाके आणलेत, एक्स्ट्रा.. :)

Saturday, November 8, 2008

गाणं ऐकतोयऽऽऽऽ ! गुलाब-जामून खाऊ या.. मम्माच्या गावाला जाऊ याऽऽऽऽऽ.. काऽऽय म्हणालात?? शब्द चुकला??? तेच ते.. मामाचे गाव म्हाणजेच मम्माचे माहेर!!! असोऽऽऽ.. हे गाणे तल्लीन होउन ऐकत होतो.. तेवढ्यात बंड्या मला म्हणाला..हे "गावोगाऽव" फिरुन नुस्तं फराऽळ फराऽळ!! संयम नाहीऽऽऽऽ??? बंड्या शिस्तीत वाढलेलं पोर! :).. असोऽऽऽ कुणी काहीही म्हणो, आम्ही "साखरेचेहे खातो बॉऽऽ!!!!

तुकोबांचा एक अभंग आठवला- "अंगी ज्वर, तया नावडे साखर..जन तो इतर गोडी जाणे"..नारळीपाक असो वा वेगवेगळे लाडू आपल्याला त्यातील गोऽडव्याचे देणे घेणे! परत तुकोबांचे शब्दरत्न आठवले-"अंतरीची घेतो गोडी।पाहे जोडी भावाची॥देव सोयरा, देव सोयरा। देव सोयरा, दीनांचा। आपुल्या वैभवे।देव शॄंगारावे निर्मळ । तुका म्हणे जेवी सवें। प्रेम द्यावे प्रीतीचे॥..
चला तुळशीच्या लग्नासाठी(Marraige of Ocimum sanctum :P) फटाके आणायचे आहेत!आणि लाडू सम्राट मधून पार्सल पण.. चाऽऽऽऽऽव..सी..याऽऽऽ...

Friday, November 7, 2008

मला ओबामा भाऊला दोनच गोष्टी(फक्त!) सांगायच्या आहेत...... >:)< १)राष्ट्रं उभी रहाण्यासाठी लिंकन सारखी चारित्र्यसंपन्न माणसं, बुद्धीजीवी वर्गाला संरक्षण आणि शस्त्रांच्या व्यवसायातून उभा"न" राहिलेला पैसा लागत असतो..२)आणि दुसरे महत्वाचे- हॅम्बर्गर आणि कॅन पॅक्ड जंक फूड पेक्षा अन्नपूर्णेप्रती कॄतज्ञता व्यक्त करुन खाणे जास्त बलदायी!

राष्ट्राची उभारणी असो अथवा उत्तम रेसिपीज ची निर्मीती "इथे कॉस्ट पेक्षा व्हॅल्यू चे महत्व जास्त आहे". ज्या राष्ट्रात कॉस्टली सर्व मिळते पण व्हॅल्यू हरवत जाते तिथे अराजकाची नांदी असते तर ज्या स्वयंपाकघरात कॉस्टली वस्तूंची रेलचेल असते पण आस्थेचा व्हॅल्यू ऍडेड पॅक नसतो तिथे चव नाही..ओऽऽ.केऽऽ. निघतो पट्कन ..आमचे काका इलेक्षन टुर संपवून "मॅक्केन काकूंकडचा फराळ" घेउन येताहेत अस्से कळाले..! :D अमेरिकेत तुळशीच्या लग्नाला काय बरं म्हणत असतील? डिड यू नो धिस?????????????

Thursday, November 6, 2008

मा.सो.पं.त.बबडू(टीप-मा.सो.पं.त. हे मानसोपचार तज्ज्ञ चे लघूलेखन, मराठीत शॉर्ट फ़ॉर्म) कडे फराळासाठी गेलो होतो. अजून तुळशीचे लग्न व्हावयाचे असल्यामुळे मी आप्तेष्टांना फराळ आणि आत्मीयता यांचे स्मरण करून देत असतो. >:))))))))< ..... बबड्यानं प्रेमानं विचारलं, तू काय खाणार? चकली? चिवडा?? लाडू??? गुलाबजाम ????अनारसे????? .... I was cherished , you know ssssssss !!!!!! मी त्याला म्हणालो, हे सर्व पदार्थ "एकानंतर एक" किंवा "एकासोबत एक" !!!!!!!!!!असोऽऽऽ! !!!! मी हे सर्व पदार्थ खाणार म्हटल्यावर बबड्या किंचाळून म्हणाला :x ..... I am sorry to say this but तुला "मल्टीपल रेसीपी सिंड्रोम झालाय".. मी चकीत झालो .. :O .... म्ह्टलं well ... मित्राऽऽ तू फराळाला दे अथवा न दे, जे म्हणतोय ते लक्षपूर्वक ऐक.. साहित्य नवरसांच्या वैविध्यातून जन्माला येतं, संगीत सप्तस्वरांच्या वैविध्यातून अवतरतं तसंच जीवन विविधांगी नातेसंबंधांच्या भावानुभवातून विणलं जातं.. पदार्थ कितीही चांगला झाला तरी मिठाशिवाय अळणी तसंच जीवन कितीही समॄद्ध असले तरी अनपेक्षितपणे भेटणारी वेदना त्याला भावसमृद्ध करते.. मोठेपणाची ही लक्तरं फेकून दे आणि भेट मित्रांना..ऑनलाईन नाही, तर घरी जाउन.. एकेक व्यक्ती एकेक पुस्तक आहे.. युंग, फ़्राईड पेक्षा जास्त प्रगल्भ आणि सोऽऽप्पं! आणि हो, त्यांच्या सोबत थोडा थोडा फराळ पण कर.. :)

Wednesday, November 5, 2008

माझा एक मित्र विद्रोही आणि पुरोगामी साहित्यिक आहे. शिरा, श्रीखंड, पुरणपोळी इत्यादि बुरसट आणि जुनाट आवडीनिवडी असणारे लोक यांच्या उद्धाराविषयी तो कळकळीने बोलत असतो. बदामाची भजी, कोबीचा शिरा, याचे त्याने बायकोसाठी एक वर्कशॉप सुद्धा घेतले. जीवन जर एक आव्हान असेल तर जेवण सुद्धा आव्हान असले पाहिजे असे त्याने मला एकदा ठणकाउन सांगितले होते. त्याचे पुरोगामी विचार मी शांतपणे(दुसरे काय करणार?) ऐकत असताना वहिनींनी फराळाची डिश समोर आणली.आता तो कितीही आणि काहीही बोलला तरी चालेल..(तुळशीच्या लग्नापर्यंत चालतो फ़राळ याची पुन्हा आठवण करुन देतो..असोऽऽऽ) वहीनी रिलायन्स मध्ये कामाला आणि लाडू आणि चिवडा "इकॉनॉमी पॅक"चा?? How interesting na sss .खरं तर यांनी हो तो बिग होऽऽऽ असं म्हटलं पाहिजे.. असोऽऽऽ आर्थिक मंदी कडे दुर्लक्ष करुन ..आपल्याला फक्त फराळाशी देणे घेणे.. बाकी गोष्टी द्याव्या सोडून हेच बरे! धीरुभाईचं पर्सुएशन ऑफ़ गोल्स इन पिरिअड ऑफ ऍडव्हर्सिटीज" हे मी काय विसरलो नऽऽई... त्या गोल लाडूचं पर्सुएशन आर्थिक मंदीचं सावट असलेल्या फराळात सॉरी..काळात करणे आवश्यक असे स्वतःशीच म्हणत मी "करलो फराळ मुठ्ठी में असंच काहीतरी म्हणालो !"..

Tuesday, November 4, 2008

लीमन ब्रदर्सकडून न्यू.श.नि. बंडूस {टीप- न्यू.श.नि. म्हणजे न्यूयॉर्क शहर (अ)निवासी} जितक्या अपेक्षा होत्या त्यापेक्षा अधिक अपेक्षांचे निरागस ओझे घेऊन मी शिरुकाकांच्या घरी फराळास गेलो. (तुळशीच्या लग्नापर्यंत फराळ चालत असतो हे आपल्या माहितीस्तव)....पण माझा न्यू.श.नि.बंड्यापेक्षा अधिकच अन फार्फार भ्रमनिरास झाला. :((((( ...... आर्थिक मंदीत फराळाचा इंडेक्स एका प्लेटवरून चक्क एका इवल्याश्या लाडवावर यावा?????????? काय हे दिवस :(((((( असोऽऽऽ.... पण अश्या गोष्टींकडे मी लक्ष देत नाही ..शेवटी "ज्याचा त्याचा....." असतो ना! नशीबातला लिहिलेला तो लाडू खाता खाता, मला न्यू.श.नि. प्रमाणेच घराची ओढ लागली.. माझी गॄहलक्ष्मी "चीन"प्रमाणे फराळाची मोठ्ठी उत्पादक असून मी "अमेरिके"प्रमाणे मोठ्ठा कंज्युमर आहे! पण कच्च्या मालावरील वाढता खर्च पहाता खरोखर्च मी पण ओबामा प्रमाणे अनेक इच्छा बाजूला ठेवून दिल्या!असोऽऽ वित्तीय वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत चांगले पदार्थ खायला मिळतील असे एका इ-दीवाळी अंकात इ-भविष्य वाचले आहे.. तोपर्यंत स्टॉक कडे लक्ष देतो.. हॅप्पी फराळ !!!